Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date – 01 Dcember 2023
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०१ डिसेंबर २०२३ सकाळी ७.१० मि.
****
· राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज पुण्यातल्या सैन्य वैद्यकीय महाविद्यालयाला मानाचा ध्वज प्रदान करणार
· विकसित भारत संकल्प यात्रेचं देशव्यापी जनआंदोलनात रूपांतर-पंतप्रधानांचं प्रतिपादन
· जायकवाडी धरणावर तरंगत्या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी सामंजस्य करार-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
आणि
· अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे सुमारे चार लाख हेक्टर क्षेत्रावरील शेतपिकांचं नुकसान
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज पुण्यातल्या सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालयाला मानाचा ध्वज अर्थात प्रेसिडेंट्स कलर प्रदान करणार आहेत. त्यानंतर त्या नागपूरकडे रवाना होतील.
दरम्यान, पुण्याजवळच्या खडकवासला इथं, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी - एन डी ए च्या १४५ व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ काल राष्ट्रपतींच्या उपस्थितीत पार पडला. त्यानंतर त्यांनी अहमदनगर जिल्ह्यातल्या शनीशिंगणापूर इथल्या शनैश्वराचं दर्शन घेतलं.
****
विकसित भारत संकल्प यात्रेचं देशव्यापी जनआंदोलनात रूपांतर झाल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी काल संवाद साधताना त्यांनी या अभियानामागची भूमिका विशद केली. विकसित भारत संकल्प यात्रेला अवघे १५ दिवस पूर्ण होत असून, देशातल्या १२ हजारहून अधिक ग्रामपंचायती आणि ३० लाखांहून अधिक नागरिक या यात्रेशी जोडले गेले आहेत, असं पंतप्रधानांनी सांगितलं. देशाचा विकास नारी शक्ती, युवा शक्ती, शेतकरी बांधव आणि गरीब नागरिक या चार अमृत स्तंभांवर आधारलेला आहे, असं पंतप्रधान म्हणाले.
‘‘मेरे लिये देश की सबसे बडी चार जातीयां है। मेरे लिये सबसे बडी जाती है गरीब, युवा, महिला, किसान। इन चार जातीयों का उत्थान ही अगर भारत को विकसित बनायेगा और अगर चार का हो जायेगा ना इसका मतलब सबका हो जायेगा।’’
या कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते एम्स देवघर इथं दहा हजाराव्या विक्रमी जनौषधी केंद्राचं लोकार्पण झालं. त्याचप्रमाणे जनौषधी केंद्रांची संख्या दहा हजारांवरुन पंचवीस हजारांपर्यंत वाढवण्याच्या कार्यक्रमाचाही त्यांच्या हस्ते शुभारंभ झाला. याशिवाय महिला किसान ड्रोन केंद्राचा प्रारंभ देखील यावेळी झाला. पुढच्या तीन वर्षात महिला बचतगटांना पंधराशे ड्रोन्स पुरवले जाणार आहेत. महिलांना ड्रोन उडवण्याचं आणि वापरण्याचं प्रशिक्षणही दिलं जाणार आहे.
****
दरम्यान, केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये नियुक्त झालेल्या ५१ हजारांहून अधिक उमेदवारांना काल पंतप्रधानांच्या हस्ते दूरस्थ पद्धतीने नियुक्तीपत्रांचं वितरण करण्यात आलं. देशभरात ३७ ठिकाणी याअंतर्गत रोजगार मेळावे भरवण्यात आले होते.
****
रत्नागिरी जिल्ह्यातल्या लोटे- परशूराम औद्योगिक वसाहतीमध्ये नव्याने सुरू होत असलेल्या हिंदुस्तान कोका-कोला कंपनीच्या शाखेचं भूमिपूजन काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं. दोन हजार ५०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून उभ्या रहात असलेल्या या प्लांटच्या माध्यमातून दोन हजार लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.
दरम्यान, सिंधुदुर्ग किल्ल्यावर येत्या चार तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या नौदल दिन कार्यक्रमाच्या तयारीचा मुख्यमंत्र्यांनी काल आढावा घेतला.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणावर बाराशे मेगावॉट ऊर्जा निर्मितीचा तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प सुरु करण्यासंदर्भात राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळ आणि महाराष्ट्र शासन यांच्यात सामंजस्य करार करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. ते काल यासंदर्भातल्या आढावा बैठकीत बोलत होते. मुंबईत झालेल्या या बैठकीत केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड उपस्थित होते. छत्रपती संभाजीनगर इथं, दिल्ली - मुंबईत औद्योगिक मार्गिकेमध्ये इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरच्या कामाचा फडणवीस यांनी आढावा घेतला. शहराची वाढती लोकसंख्या आणि त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी या पार्श्वभूमीवर वाळूज ते शेंद्रा उड्डाणपुलाबाबत माहिती घेऊन ही विकास कामं तातडीने मार्गी लावण्याचा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
****
जलयुक्त शिवार अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात लोकसहभाग वाढवून मिशन मोडवर काम करण्याचे निर्देश मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी राज्यातल्या सर्व जिल्हाधिकारी आणि जिल्हा जलसंधारण अधिकाऱ्यांना दिले आहेत. ते काल मुंबईत याबाबतच्या आढावा बैठकीत बोलत होते. गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार अभियानाच्या कामामध्ये ‘अवनी ॲप’चा वापर त्वरित सुरू करण्यास देखील त्यांनी सांगितलं.
****
जागतिक एड्स दिन आज पाळला जात आहे. एड्स या आजाराबद्दल जगभर जनजागृती व्हावी हा यामागचा उद्देश आहे.
****
राज्यात २६ ते २८ नोव्हेंबर दरम्यान झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे तीन लाख ९३ हजार ३२५ हेक्टर क्षेत्राचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ४५ हजार ७८३ हेक्टर, हिंगोली ७९ हजार ४०२, परभणी एक हजार, बीड २१५, तर नांदेड जिल्ह्यात ५० हेक्टर क्षेत्रावरच्या शेतजमिनीचं नुकसान झाल्याची माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सिल्लोड, सोयगाव तालुक्यातल्या नुकसानाची पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी काल पाहणी केली. शेताच्या बांधावर जाऊन त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला. पंचनामे पूर्ण होताच, भरपाईबाबत निर्णय घेण्यात येईल, असं सत्तार यांनी यावेळी सांगितलं.
****
जालना जिल्ह्यात झालेल्या नुकसानाची काल पालकमंत्री अतुल सावे यांनी पाहणी केली. बदनापूर तालुक्यातल्या मोसंबी आणि डाळिंब फळबागेची सावे यांनी पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. संबंधित अधिकाऱ्यांना नुकसानग्रस्त पिकांचे तातडीनं पंचनामे करण्याचे आदेश सावे यानीं दिले.
****
विकसित भारत संकल्प यात्रा काल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वाळूज, इमामपूर, रांजणगाव, गणोरी, उपळा, आदी गावांमध्ये पोहोचली. या गावात यात्रेचं उत्साहात स्वागत करण्यात आलं.
****
जालना जिल्ह्यातल्या ढासला, बधापूर, रेवगाव, बेथलम, पिंपळगाव थोटे इथंही काल या यात्रेचं उत्साहात स्वागत करण्यात आलं. ढासला इथं झालेल्या कार्यक्रमात पालकमंत्री अतुल सावे, आमदार नारायण कुचे, यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देणारी चित्रफित दाखवण्यात आली.
****
लातूर तालुक्यातल्या नागझरी इथं देखील नागरीकांनी काल विकसित भारत संकल्प यात्रेचं स्वागत केलं. यावेळी आरोग्य विभागाकडून रक्तदाब, मधुमेह याची प्राथमिक तपासणी आणि आयुष्यमान कार्ड संदर्भातील माहिती देण्यात आली. 'आपला संकल्प, विकसित भारत' या एलईडी रथाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनाही सांगण्यात आल्या.
****
परभणी इथं विकसित भारत संकल्प यात्रेत लाभार्थी शिला कदम यांनी आपला अनुभव या शब्दात सांगितला,
****
धनगर समाजाचा अनुसूचित जमातीप्रवर्गात समावेश करण्याच्या प्रमुख मागणीसाठी काल धाराशिव इथं मोर्चा काढण्यात आला. शहरातल्या आर्य समाज लेडीज क्लब पासून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्चाच्या सुरुवातीला धनगर समाजाने आपल्या पारंपारिक व्यवसायाचं साधन असलेल्या मेंढ्या सोबत आणल्या होत्या. तसंच खांद्यावर घोंगडी आणि धनगर समाजाचा पारंपारिक पोशाख घालून ढोल वाजवत मोर्चेकरी या मोर्चात सहभागी झाले होते.
****
हिंगोली जिल्ह्यात सेनगाव ते हिंगोली मार्गावरील रिधोरा पाटीजवळ एस टी बस चालक मारोती नेमाणे यांचा हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला, मात्र मृत्यूपूर्वी त्यांनी एसटी बस रस्त्याच्या कडेला सुरक्षित उभी केल्यानं, प्रवासी सुखरूप राहिले.
****
आयकर विभागानं काल छत्रपती संभाजीनगर शहरातल्या ११ बांधकाम व्यावसायिकांच्या घर आणि कार्यालयांवर छापे टाकले. संशयास्पद व्यवहारांची कागदपत्रं यावेळी जप्त करण्यात आल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातल्या स्वच्छता आणि प्रलंबित कामांचा काल जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आढावा घेतला. या रुग्णालयात स्वच्छता आणि सुरक्षिततेबाबत तडजोड केली जाणार नाही, असं ते यावेळी म्हणाले.
****
धाराशिव इथं काल गर्भधारणापूर्व आणि प्रसुतीपूर्व गर्भलिंग निदान चाचणी प्रतिबंधक कायदा - पीसीपीएनडीटी जिल्हा सल्लागार समितीची बैठक झाली. जिल्ह्याचं लिंग गुणोत्तर प्रमाण वाढवण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं.
****
दक्षिण मध्य रेल्वेनं काचीगुडा-लालगढ, हैदराबाद-जयपूर आणि नांदेड-इरोड या विशेष गाड्यांना सुमारे दोन महिने मुदतवाढ दिली आहे.
दरम्यान, लाईन ब्लॉकमुळे दौंड ते निझामाबाद जलदगती गाडी ३ ते १६ जानेवारी दरम्यान तर निझामाबाद - पंढरपूर गाडी ४ ते १७ जानेवारी दरम्यान निझामाबाद ते मुदखेड दरम्यान अंशत: रद्द करण्यात आली आहे.
****
No comments:
Post a Comment