Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 24 January
2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २४ जानेवारी २०२४
सायंकाळी ६.१०
****
· प्रजासत्ताकाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 'आपलं संविधान, आपला
सन्मान' उपक्रमाला प्रारंभ
· तृणमूल काँग्रेसची लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा
· युवा मतदार नोंदणी अभियानाच्या यशस्वीतेसाठी नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत
यांचा गौरव
आणि
· छत्रपती संभाजीनगर महापालिका क्षेत्रात विकसित संकल्प यात्रेचा समारोप
****
भारतीय प्रजासत्ताकाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या
औचित्त्याने उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते आज 'आपलं
संविधान, आपला सन्मान'
या उपक्रमाचा शुभारंभ झाला. भारतीय राज्यघटनेत अंतर्भूत असलेल्या
तत्त्वांप्रती सामूहिक बांधिलकीची पुष्टी करणं आणि राष्ट्राला बांधून ठेवणारी समान
मूल्यांची जपणूक करणं हा या अभियानाचा उद्देश असल्याचं केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्रालयाने
म्हटलं आहे. विस्मरणात गेलेल्या लोकनेत्यांचं स्मरण करण्यात येत असल्याचं, उपराष्ट्रपतींनी
नमूद केलं. समाजातल्या तळागाळाच्या व्यक्तीपर्यंत कायदेविषयक सेवा पोहोचवण्यासाठी न्याय
सेतु अभियानालाही उपराष्ट्रपतींनी प्रारंभ केला. सबको न्याय-हर घर न्याय, नव
भारत-नव संकल्प तसंच विधीजागृती अभियान, आदी संकल्पना याअंतर्गत राबवल्या
जाणार आहेत.
****
यंदाचा ७५ वा प्रजासत्ताक दिन विशेष असून
यादिवशीचे पथसंचलन नारी शक्तिला समर्पित असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं
आहे. राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त आज नवी दिल्ली इथं चित्ररथातील कलाकार, राष्ट्रीय
छात्र सेना - एनसीसी तसंच राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांची पंतप्रधानांनी आपल्या
निवासस्थानी भेट घेतली,
त्यावेळी ते बोलत होते.
दरम्यान, परीक्षा पे चर्चा या
कार्यक्रमाच्या सातव्या भागासाठी माय जीओव्ही पोर्टलवर आतापर्यंत २ कोटी २६ लाख विद्यार्थ्यांनी
नोंदणी केली आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान विद्यार्थ्याशी संवाद साधतात.
यंदा २९ जानेवारीला हा कार्यक्रम होणार आहे.
****
राष्ट्रीय बालिका दिवस आज साजरा होत आहे.
देशातल्या मुलींना सक्षम बनवण्यासाठी मदत करणं आणि त्यांना नवीन संधी उपलब्ध करुन देण्याच्या
उद्देशानं हा दिवस साजरा केला जातो.
****
तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष तथा पश्चिम
बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची
घोषणा केली आहे. पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या ४२ जागा आहेत. यापैकी तृणमूलने २ जागा
काँग्रेसला सोडण्याची तयारी दर्शविली होती, तर काँग्रेसने १२ जागांवर
लढण्याची मागणी केली होती,
हा प्रस्ताव मान्य न झाल्यानं इंडिया आघाडीतून बाहेर पडत, स्वबळावर
निवडणूक लढवण्याचा निर्णय ममता बॅनर्जी यांनी घेतला.
दरम्यान, पंजाबमध्ये आम आदमी पार्टी
स्वबळावर लोकसभा निवडणूक लढणार असल्याचं वृत्त आहे.
****
महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात कामगार
भवन आणि राज्य कामगार विमा योजनेची रुग्णालये उभारण्यास प्राधान्य देण्याचे निर्देश
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. ते आज मुंबईत यासंदर्भात झालेल्या आढावा
बैठकीत बोलत होते. 'अटल पेन्शन'
सारख्या शाश्वत सामाजिक सुरक्षा देणाऱ्या योजनांचा जास्तीत जास्त
कामगारांना लाभ होण्यासाठी प्रयत्न करावा, उद्योगांसाठीच्या सोयी-सुविधा
आणि प्रोत्साहने याबाबतची माहिती 'मैत्री' कक्षाच्या
माध्यमातून संबंधितांपर्यंत पोहोचवावी, अशा सूचना पवार यांनी यावेळी
दिल्या.
****
२०२३-२४ मध्ये नांदेड जिल्ह्यात युवा मतदार
नाव नोंदणी अभियान यशस्वीपणे राबवल्याबद्दल जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना छत्रपती
संभाजीनगर विभागातून उत्कृष्ट मतदार जागृती पुरस्कार देण्यात आला. राज्याचे मुख्य निवडणूक
अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या हस्ते आज मुंबईत झालेल्या सोहळ्यात राऊत यांना गौरवण्यात
आलं. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, उप-जिल्हा निवडणूक अधिकारी
राहुल गायकवाड आणि रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी जीवन देसाई
यांना उत्कृष्ट मतदार जनजागृती पुरस्कार देण्यात आला.
****
छत्रपती संभाजीनगर इथं २३ जानेवारी २०२४
च्या अंतिम मतदार यादीमध्ये एकूण मतदारसंख्या २९ लाख ९३ हजार ४०३ इतकी आहे. यामध्ये
एक लाख २० हजार ६६० इतकी नवीन मतदार नोंदणी झाली, तर ६३ हजार २०७ मतदारांची
नावं वगळली गेली आहेत.
****
रायगड जिल्ह्यामध्ये विशेष संक्षिप्त पुनरीक्षण
कार्यक्रमाच्या माध्यमातून मतदारयादी तयार झाली असून जिल्ह्यात २३ लाख १६ हजार ५१५
मतदार आहेत. महिला बचत गट,
अंगणवाडी सेविका, गृहनिर्माण सोसायटी यांच्या
सहकार्यामुळे यंदा महिलांच्या मतदार नोंदणीत लक्षणीय वाढ झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी
डॉ. योगेश म्हसे यांनी दिली.
****
राज्य शिक्षण मंडळाच्या बारावी आणि दहावी
परीक्षेच्या एकूण कालावधीत गेल्या वर्षी दहा मिनिटे वेळ वाढवून दिला होता. यंदाही फेब्रुवारी-
मार्च २०२४ मध्ये होणाऱ्या दहावी- बारावी परीक्षेत हीच पद्धत कायम ठेवण्यात आली आहे.
राज्य शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी आज प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती
दिली.
****
छत्रपती संभाजीनगर महापालिका क्षेत्रात विकसित
संकल्प यात्रेचा समारोप झाला. ५३ दिवस चाललेल्या या यात्रेत १०४ ठिकाणी जनजागृतीपर
कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमांना सुमारे ८३ हजार नागरिकांनी उपस्थिती नोंदवली, तर
४६ हजार नागरिकांनी भारताला स्वयंपूर्ण करण्याची शपथ घेतली. 'मेरी कहानी मेरी जुबानीश या अंतर्गत
एकूण ३२० लाभार्थ्यांनी आपल्याला मिळालेल्या शासकीय योजनांच्या लाभाची माहिती दिली.
१२ हजार ८४३ जणांनी आयुष्यमान भारत कार्डसाठी, १२
हजार ७०८ जणांनी स्वनिधी योजनेसाठी, तर दोन हजारावर महिलांनी उज्ज्वला
गॅससाठी नावनोंदणी केल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली.
****
या यात्रेत मेरी कहानी मेरी जुबानी अंतर्गत
परभणीचे शिवदयाल साकळकर यांनी आपला अनुभव कथन केला.
बाईट - शिवदयाल साकळकर, परभणी
****
मराठा समाजाचं सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण
तपासण्यासाठी काल पहिल्या दिवशी नांदेड शहरातील सहा हजार २०० कुटुंबांचं सर्वेक्षण
करण्यात आलं. नांदेड शहरातील ९६ हजार मालमत्तांधारकांचं याअंतर्गत सर्वेक्षण करण्यात
येणार आहे. नांदेड महापालिका विहित मुदतीत हे काम हे सर्वेक्षण पूर्ण करेल अशी माहिती
आयुक्त महेशकुमार डोईफोडे यांनी दिली. नागरिकांनी आपल्या घरी येणाऱ्या प्रगणकांना आवश्यक
ते सहकार्य करावं,
माहिती द्यावी असं आवाहनही डोईफोडे यांनी केलं आहे.
****
बीड जिल्ह्यात गेल्या ऑक्टोबर ते डिसेंबर
अखेरपर्यंत तीन महिन्यात चौदाशे पेक्षा अधिक बाल विवाह प्रकरण उघडकीस आले आहेत. बालविवाह
निर्मूलन जिल्हा कृती दलाने जलद गतीने प्रकरणांचा निपटारा करावा तसेच बालविवाह रोखण्यासाठी
यंत्रणेने कठोर भूमिका घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी दिले
आहेत. या संदर्भातील मासिक आढावा बैठकीत त्या बोलत होत्या.
****
हिंगोली जिल्ह्यातील आशा स्वयंसेविका आणि
गटप्रवर्तकांनी आज आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं.
जिल्हा परिषद मैदानावरून प्रभात फेरी काढून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आलेल्या आंदोलक
महिलांनी अचानक रास्ता रोको केला. त्यामुळे पोलिसांनी त्यांना काही काळ ताब्यात घेतलं, त्यानंतर
सोडून दिल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
नांदेडमध्ये आज जिल्हा परिषद कार्यालयावर
आशा आणि गटप्रवर्तकानी धरणे आंदोलन केले. यामध्ये जिल्ह्यातील हजारो आशा कार्यकर्ती
सहभागी झाल्या होत्या. जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू असल्याने नियोजित मोर्चा आशांना
रद्द करावा लागला.
****
'श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपारिक क्रीडा
महाकुंभ'
येत्या २६ जानेवारीपासून मुंबईत सुरु होणार आहे. राज्यभरातून
जवळपास सव्वा लाख खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने
मुंबई शहरात आणि उपनगरात प्रथमच देशी खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन
करण्यात आलं आहे. स्पर्धेच्या अनुषंगाने उद्घाटन प्रसंगी राज्यातील २७ किल्ल्यांचं
प्रदर्शन उभारलं जाणार आहे, त्याचसोबत दांडपट्टा, लाठीकाठी
या सारख्या शिवकालीन युद्धकलांची प्रात्यक्षिके सुद्धा यावेळी सादर केली जाणार आहेत.
तसंच स्पर्धेसाठी रायगडावरून शिवज्योतिचे मुंबईमध्ये आगमन होणार आहे. या स्पर्धा १९
फेब्रुवारीपर्यंत चालणार आहेत.
****
चेन्नईत सुरु असलेल्या खेलो इंडिया युवा
क्रीडास्पर्धांमधे कलात्मक जिम्नॅस्टिक्स मध्ये महाराष्ट्राच्या आर्यन दवंडेनं सुवर्ण
पदक पटकावलं,
वॉल्टींग टेबल प्रकारातही आर्यननं सुवर्ण पदकाला गवसणी घातली, याच
प्रकारात महाराष्ट्राच्या सिद्धांत कोंडेला कांस्य पदक मिळालं.
पदकतालिकेत सध्या महाराष्ट्र अव्वल स्थानी आहे.
****
No comments:
Post a Comment