Thursday, 25 January 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 25.01.2024 रोजीचे सकाळी: 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

संक्षिप्त बातमीपत्र

२५ जानेवारी २०२ सकाळी ११.०० वाजता

****

देशात आज १४ वा राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात येत आहे. हा दिवस भारतीय निवडणूक आयोगाच्या स्थापना दिवसानिमित्त साजरा करण्यात येतो. यानिमित्त मतदार जनजागृती,  निवडणूक प्रक्रीयेतील कार्य आणि मतदार याद्या अद्यावत करण्यात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांना नवी दिल्ली इथं आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते वर्ष २०२३ साठीचे पुरस्कार प्रदान करण्यात येतील.

****

नाशिक जिल्ह्यात निफाड इथं यंदाच्या हिवाळ्यातील सर्वात कमी चार पूर्णांक चार अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. राज्यात पुढील दोन दिवस थंडी आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

****

दिल्ली इथं होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य सोहळ्याला नाशिक शहराचे पर्यावरणदूत चंद्रकिशोर पाटील यांना निमंत्रित करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात मध्ये त्यांचा  स्वच्छाग्रही म्हणून यापूर्वी गौरव केला होता. पाटील हे गोदावरी नदी, नंदिनी नदी स्वच्छता तसंच शहर स्वच्छतेमध्ये अविरत कार्यरत आहेत.

****

नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाच्या वैद्यकीय अधिक्षक पदाचा पदभार डॉ. वाय. एस. चव्हाण यांच्याकडं सोपवण्यात आला आहे. महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. आर. वाकोडे यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.

****

क्रिकेटमध्ये, भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामन्याला हैदराबाद इथं आज सकाळी नऊ वाजेपासून सुरुवात झाली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना इंग्लड संघानं १ षटकांत ३ गडी बाद ७२ धावा केल्या आहेत. भारतीय संघानं गेल्या बारा वर्षांपासून आपल्या देशात एकही सामना गमावलेला नाही. .

****

दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या पुरुष हॉकी स्पर्धेत उद्या भारताचा सामना यजमान दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. दरम्यान, काल भारत आणि फ्रान्स यांच्यात झालेला सामना दोन-दोन असा बरोबरीत सुटला. तर सोमवारी २२ जानेवारीला झालेल्या पहिल्या सामन्यात भारतानं फ्रान्सचा, चार-शुन्य असा पराभव केला होता. येत्या रविवारी भारत आणि नेदरलँड्स यांच्यात सदिच्छा सामना होणार आहे.

****

 

No comments: