Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 26 January 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २६ जानेवारी २०२४ दुपारी १.०० वा.
****
देशाच्या ७५ वा प्रजासत्ताक दिन आज सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे. नवी दिल्लीत कर्तव्य पथावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण झालं. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रॉ या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह इतर केंद्रीय मंत्री यावेळी उपस्थित होते. प्रजासत्ताक दिनानिमित्त झालेल्या पथसंचलनात देशाच्या सांस्कृतिक विविधतेचं, सामाजिक एकतेचं तसंच सामरिक कौशल्याचं दर्शन झालं. सर्व राज्यांच्या तालवाद्यांनी संचलनाला सुरुवात झाली, यामध्ये राज्याच्या ढोलताशाचं पथक सहभागी झालं होतं. यावेळी महाराष्ट्राच्या चित्ररथात छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा दाखवण्यात आला. लष्कर, नौदल आणि हवाई दलाची चित्तथरारक प्रात्यक्षिकं देखील यावेळी सादर करण्यात आली. यंदाचं पथसंचलन महिला केंद्रीत होतं. प्रत्येक क्षेत्रात महिलांचं योगदान यावेळी दाखवण्यात आलं. तत्पूर्वी पंतप्रधानांनी राष्ट्रीय युद्ध स्मारक इथं हुतात्मा सैनिकांना आदरांजली वाहिली.
****
मुंबईत शिवाजी पार्क इथं राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यावेळी उपस्थित होते. राज्यपालांनी यावेळी केलेल्या भाषणात, गेल्या वर्षभरात राज्य सरकारने केलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेतला. तसंच सर्व स्तरातल्या नागरिकांना न्याय देण्यासाठी शासनाने घेतलेल्या निर्णयांचं कौतुक केलं.
****
मुख्यमंत्री शिंदे यांनी सामाजिक माध्यमावर संदेश जारी करुन जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. भारताच्या प्रगतीची पताका डौलानं फडकवण्यासाठी आपली एकजूट महत्वाची असल्याचं ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांचे हस्ते वर्षा या शासकीय निवासस्थानी ध्वजारोहण झालं. नागपूर इथं कस्तुरचंद पार्क मैदानावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं.
****
मराठवाड्यात प्रजासत्ताक दिन सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे. ठिकठिकाणच्या शाळा, महाविद्यालयं, शासकीय निशासकीय कार्यालयांमध्ये ध्वजारोहणासह विविध कार्यक्रम पार पडले.
छत्रपती संभाजीनगर इथं पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी जिल्ह्याच्या विकासाचा आढावा घेतला. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात मुख्य प्रशासकीय न्यायमूर्ती रविंद्र घुगे यांच्या हस्ते, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कुलगुरु विजय फुलारी यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं.
धाराशिव इथं पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. जिल्ह्याच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी केलेल्या भाषणात दिली.
जालना इथं पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते, हिंगोली इथं पालकमंत्री अब्दुल सत्तार, लातूर इथं क्रिडा मंत्री संजय बनसोडे, बीड इथं पालकमंत्री धनंजय मुंडे, परभणी इथं जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते, नांदेड इथं जिल्हाधिकारी अभिजित राऊत ध्वजारोहण झालं.
नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात प्र-कुलगुरु डॉ. माधुरी देशपांडे यांच्या हस्ते, तर परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात कुलगुरु डॉ. इंद्रमणी यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं.
****
अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या संकल्पनेनं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त ३५० किल्ल्यावर भगवा आणि तिरंगा ध्वज फडकवण्यात आला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या अंतुर, वेताळवाडी आणि भांगसीगड इथं, नांदेड जिल्ह्यात नंदगिरी आणि कंधार किल्ल्यावर, बीड जिल्ह्यात धारुर किल्ल्यावर आणि जालना जिल्ह्यात रोहीलागडावर ध्वजारोहण करण्यात आलं.
****
नांदेड महानगरपालिकेने २०२३-२४ या आर्थिक वर्षात पाणीपट्टी दरामध्ये केलेली वाढ मागे घेतली आहे. आता घरगुती नळ जोडणीसाठी चार हजार ३०० ऐवजी साडे तीन हजार, तर व्यावसायिक जोडणीसाठी १७ हजार ७५० रुपये आकारण्यात येणार आहे..
****
हिंगोली जिल्ह्याच्या सेनगाव तालुक्यातल्या वटकळी इथल्या सरपंचाचे पती शेकूराव शिंदे याला पाच हजार रुपये लाच घेताना काल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतलं. ग्रामपंचायतीच्या वतीने अहिल्यादेवी होळकर सिंचन विहिरीसाठी ठराव घेतल्याचा मोबदला म्हणून त्याने ही लाच मागितली होती.
****
नांदेड इथं येत्या चार फेब्रुवारी रोजी होणाऱ्या संत नामदेव मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक प्रा.डॉ जगदीश कदम यांची निवड करण्यात आली आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष पंढरीनाथ बोकारे यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
****
लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यातल्या लोदगा इथं काल फिनिक्स फाउंडेशन आणि गोदरेज एसटेक या संस्थेमार्फत बांबू लागवड प्रोत्साहन कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांचं एकदिवसीय प्रशिक्षण घेण्यात आलं. बांबू तज्ञ संजीव करपे यांनी यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं.
****
No comments:
Post a Comment