Tuesday, 30 January 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक:30.01.2024 रोजीचे सकाळी: 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 30 January 2024

Time: 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: ३० जानेवारी २०२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या 

·      स्पर्धा स्वत:शी करावी आणि प्रतिभावंतांकडून प्रेरणा घ्यावी-परीक्षा पे चर्चा संवादातून पंतप्रधानांचा सल्ला

·      राज्यसभेची ५६ जागांसाठी २७ फेब्रुवारीला निवडणूक;महाराष्ट्रातल्या सहा जागांचा समावेश

·      राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी निर्णय देण्यास विधानसभाध्यक्षांना १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

·      मराठा आरक्षणासंदर्भात छत्रपती संभाजीनगर इथं सव्वा लाखावर कुटुंबांचं तर लातूर इथं ७६ हजार कुटुंबांचं सर्वेक्षण पूर्ण

आणि

·      खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेच्या जलतरण प्रकारात महाराष्ट्राचं वर्चस्व

 

सविस्तर बातम्या

स्पर्धा स्वत:शी करावी आणि प्रतिभावंतांकडून प्रेरणा घ्यावी, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना दिला आहे. परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमातून त्यांनी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी काल संवाद साधला. कुटुंबातच नकळत कधीतरी स्पर्धेची, द्वेषाची बीजं पेरली जातात हे टाळलं पाहिजे, असं ते म्हणाले. मुलांना प्रोत्साहन देण्यात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असल्याचं सांगतानाच, शिक्षक-विद्यार्थी नातं दृढ असेल, तर तणाव निर्माण होणार नाही, असं ते म्हणाले. मोबाईल आणि इंटरनेटचा विवेकी वापर करण्यावर पंतप्रधानांनी भर दिला. पुण्यातले एक पालक चंद्रेश जैन यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने ते बोलत होते. जैन यांचा हा प्रश्न आणि त्यावर पंतप्रधानांनी दिलेल्या उत्तराचा हा संक्षिप्त अंश.

 

मेरा नाम चंद्रेश जैन हैं क्या आपको नही लगता हैं, आज कल के बच्चो ने अपने दिमाग का इस्तेमाल करना बंद कर दिया है? वे तकनिक पे अधिक निर्भर रहने लगे हैं क्योंकी सब कुछ उंगलीयोपर उपलब्ध है कोई इस युवा पिढी कों, कैसे जागृत कर सकता हैं, कि वे प्रौद्योगिकी का स्वामी बनना चाहिए, उसका गुलाम नहीं कृपया मार्गदर्शन किजिए

 

मोबाईल के उपर कितनेही चिजे आती हो, लेकिन कुछ तो समय तय करना पडेगा आपने देखा होगा, बहुत रेअर केस में कभी मोबाईल फोन मेरे हात में होता हैंक्योंकी मुझे मालुम है की, मेरे समय का मुझे सर्वाधिक उपयोग क्या करना है जब की मैं ये भी मान ता हुँ की, इम्फरमेशन के लिए मेर लिए, एक बहुत आवश्यक साधन भी हैं लेकिन उसका कैसा उपयोग करना, कितना करना, उसका मुझे विवेक होना चाहिए.

 

नवी दिल्लीत भारत मंडपम् इथं झालेल्या या कार्यक्रमात चार हजाराहून अधिक विद्यार्थी प्रत्यक्ष सहभागी झाले तर देशभरातले सव्वा दोन लाखावर विद्यार्थी, पालक आणि शिक्षक या कार्यक्रमात दूरदृश्य संवाद यंत्रणेच्या माध्यमातून सहभागी झाले होते.

छत्रपती संभाजीनगर शहरातल्या विविध शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी या कार्यक्रमाचं थेट प्रसारण दाखवण्यात आलं. शिशु विहार शाळेतल्या मुख्याध्यापक ज्योती टाकळकर यांनी विद्यार्थ्यांसह हा कार्यक्रम बघितला.

परभणी शहरातल्या सारंग स्वामी विद्यालय, केंद्रीय विद्यालय आणि नवोदय विद्यालयात परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाचं विद्यार्थ्यांसाठी थेट प्रक्षेपण दाखवण्यात आलं. अनन्या कुलथे या विद्यार्थिनीने आपल्या भावना व्यक्त करताना, पंतप्रधानांनी केलेल्या मार्गदर्शनाचा परीक्षेला सामोरं जाताना उपयोग करणार असल्याचं सांगितलं. ती म्हणाली.

 

आपण कधीही शांतीपूर्ण आणि तणावमुक्त वातारणामध्ये अभ्यास करायला हवा, किंवा आपल्यावरती जेव्हा प्रेशर येते तेव्हा संतुलन ठेवायला हवे. आपल्या मानसिक आणि शारीरिक विकासासाठी स्वास्थ आणि अभ्यासावरती बॅलेंस बनवून ठेवायला हवं, ज्यामुळे आपण परीक्षेमध्येही खूप चांगले अंक आणु शकु. त्यासोबत त्यांनी हे सांगितले. कधीही आपण दुसऱ्यासोबत कम्पेयर करु नये. याचा अर्थ हा आहे की, आपण दुसऱ्याशी कम्पेयर करुन आपल्या चुका सुधारु शकत नाही.याचनुसार प्रधानमंत्रीजींनी जे आम्हाला सांगितले. ते मला नक्कीच आवडलं आहे. आणि मी माझ्या अभ्यासामध्ये त्याचा उपयोग सुद्धा करेन.

****

प्रजासत्ताक दिन समारंभाचा सांगता सोहळा बिटींग द रिट्रीट नवी दिल्लीत कर्तव्य पथावर काल पार पडला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सोहळ्याचं निरीक्षण करून मानवंदना स्वीकारली. भारतीय लष्कर, नौदल, वायुसेना आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दल यांची बँड पथकं यात सहभागी झाली होती.

****

स्टुडंटस् इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया - अर्थात सिमी या संघटनेवर केंद्र सरकारनं पुन्हा पाच वर्षांसाठी बंदी घातली आहे. बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्यान्वये ही बंदी घालण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

राज्यसभेची मुदत संपलेल्या ५६ जागांसाठी येत्या २७ फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. येत्या १५ एप्रिलला ५६ सदस्यांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे, यामध्ये महाराष्ट्रातले प्रकाश जावडेकर, नारायण राणे, व्ही मुरलीधरन, वंदना चव्हाण, अनिल देसाई आणि कुमार केतकर, या सहा सदस्यांचा समावेश आहे.

****

सर्वोच्च न्यायालयानं राष्ट्रवादी काँग्रेस आमदारांच्या अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना निकाल द्यायला १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. याप्रकरणी उद्यापर्यंत सुनावणी पूर्ण होणार आहे.

****

संसदेचं अर्थसकंल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरु होत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारीला अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील. अधिवेशनाचं कामकाज सुरळीत व्हावं, या दृष्टीनं केंद्र सरकारनं आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.

****

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यातिथी आज देशभरात हुतात्मा दिन म्हणून पाळण्यात येत आहे. यानिमित्त आज सकाळी ११ ते ११ वाजून दोन मिनिटे या कालावधीत मौन पाळून गांधीजींना अभिवादन करण्यात येणार आहे. या वेळेत आकाशवाणीचं प्रसारण बंद ठेवण्यात येणार आहे. 

****

या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देण्यात येत आहेत

****

मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात सुरू असलेल्या सर्वेक्षणांतर्गत छत्रपती संभाजीनगर महापालिकेअंतर्गत आतापर्यंत एक लाख २५ हजार ४४० घरांचं सर्वेक्षण पूर्ण झालं आहे. महापालिकेकडून ही माहिती देण्यात आली.

दरम्यान, हे सर्वेक्षण उद्या ३१ जानेवारीच्या आत पूर्ण करण्याचे निर्देश राज्य मागासवर्गीय आयोगाचे सदस्य गजानन खराटे यांनी दिले आहेत. काल छत्रपती संभाजीनगर इथं विभागीय आढावा बैठकीत ते बोलत होते.

लातूर शहरात मराठा तसंच खुल्या प्रवर्गातल्या नागरिकांच्या सर्वेक्षणाचं काम अंतिम टप्प्यात आहे. ज्या कुटुंबांचं सर्वेक्षण अद्याप झालेलं नाही अशा कुटुंब प्रमुखांनी जवळच्या क्षेत्रीय कार्यालय किंवा कर निरीक्षकाशी संपर्क साधण्याचं आवाहन लातूर महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी केलं आहे. शहरात आतापर्यंत ७६ हजार ५३० कुटुंबांचं सर्वेक्षण पूर्ण झाल्याचं त्यांनी सांगितलं.

****

लातूर जिल्ह्यात उदगीर इथला शासकीय दूध प्रकल्प सुरु करण्यासाठी केंद्र शासनामार्फत संपूर्ण सहकार्य केलं जाईल, अशी ग्वाही केंद्रीय पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी दिली आहे. ते काल उदगीर इथं शासकीय दूध योजना प्रकल्पाच्या प्रांगणात दूध व्यावसायिक, पशुपालक आणि शेतकरी संवाद कार्यक्रमात बोलत होते. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या उत्कृष्ट दूध उत्पादक शेतकऱ्यांचा यावेळी रुपाला यांच्या हस्ते दहा हजार रुपये आणि सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.

****

अहमदनगर जिल्ह्यात राहुरी इथल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा ३७ वा पदवी प्रदान सोहळा काल पार पडला. राज्यपाल रमेश बैस यांनी या सोहळ्याला दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून संबोधित केलं. या सोहळ्यात ७३ विद्यार्थ्यांना पीएच. डी., ३०० विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी तर सहा हजार ५२२ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.

परभणी इथल्या ज्ञानोपासक महाविद्यालयाचा पाचवा पदवी प्रदान समारंभ काल पार पडला. या कार्यक्रमात १७५ विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

****

हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव तालुक्यात हिवरखेडा इथं जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षकांची संख्या कमी असल्यानं विद्यार्थ्यांनी काल जिल्हा परिषदेतच शाळा भरवली. आठवीपर्यंतच्या या शाळेत पटसंख्या १०६ आहे. मात्र दोनच शिक्षक आहेत. या शाळेत शिक्षक देण्याची मागणी गेल्या वर्षभरापासून केली जात आहे.

****

चेन्नई इथं सुरु असलेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत, काल राज्याच्या संघाने तीन सुवर्ण, तीन रौप्य, आणि दोन कांस्य पदकं पटकावली. जलतरण प्रकारात महाराष्ट्राच्या खेळाडूंचं वर्चस्व दिसून आलं, पुरुषांमधे ऋषभ अनुपम दासनं सुवर्ण, सलील भागवतनं रौप्य, तर रौनक सावंतनं कांस्यपदक पटकावलं. महिलांमधे, ५० मीटर बॅक स्ट्रोकमधे महाराष्ट्राच्या ऋजूता प्रसाद राजज्ञ हिनं सुवर्ण, अलेफिया धनसुरानं रौप्य, तर राघवी रामानुजननं कांस्यपदक जिंकलं.

टेबल टेनिसमध्ये महिला एकेरी तसंच दुहेरीत महाराष्ट्रानं सुवर्णपदक पटकावलं. भारोत्तोलनात ५१ किलो वजन गटात सोहम कुंभारने सुवर्ण तर ७६ किलो वजनी गटात ग्रीष्मा थोरातनं रौप्य पदक पटकावलं.

या स्पर्धेत महाराष्ट्राचा संघ ४४ सुवर्ण, ३९ रौप्य, तर ४४ कांस्य पदकं अशी १२७ पदकं जिंकून पहिल्या क्रमांकावर कायम आहे.

****


नांदेड जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्यावतीनं दिव्यांगांसाठी विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे. आज सकाळी साडे दहा वाजता वजिराबाद इथं पोलीस परेड मैदानावर जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा तर उद्या सकाळी साडे दहा वाजता आयटीएम इथल्या कुसुमताई सभागृहात सांस्कृतिक स्पर्धा होणार आहेत.

****

परभणी जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी कार्यालयामार्फत बालमहोत्सवाचं काल जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते उद्घाटन झालं. या अंतर्गत विविध खेळांच्या स्पर्धा आयोजित केल्या असून यात जिल्ह्यातील एक हजार ५०० विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

****

नांदेड जिल्ह्यात कंधारच्या प्रसिद्ध सुफी संत हजरत हाजी सय्याह सरवरे मगदूम यांच्या ७०९ व्या उर्सला कालपासून प्रारंभ झाला. उर्सनिमित काढण्यात आलेल्या संदल मिरवणुकीत राज्यातल्या अनेक जिल्ह्यांसह आंध्रप्रदेश आणि तेलंगणातूनही भक्त सहभागी झाले होते.

****

No comments: