Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 31 January 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ३१ जानेवारी २०२४ दुपारी १.०० वा.
****
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणानं झाली. यावेळी राष्ट्रपतींनी गेल्या दहा वर्षात केंद्र सरकारनं केलेल्या कामांचा आढावा घेतला. अयोध्येतल्या राम मंदिराचं अनेक शतकांचं स्वप्न सरकारने यंदा प्रत्यक्षात साकार केलं, देशाची अर्थव्यवस्था वेगानं विकसित होत असून, २५ कोटी लोक गरीबीतून बाहेर पडले आहेत, असं त्यांनी यावेळी सांगितलं. थेट परकीय गुंतवणूक दुपटीनं वाढली असून, व्यापारात सुलभता येत आहे. लाखो सरकारी नोकऱ्याही उपलब्ध झाल्या असल्याचं, राष्ट्रपतींनी नमूद केलं. देशाच्या अमृत काळात नवं संसद भवन उभं राहीलं असून, देश योग्य दिशेनं प्रगती करत असल्याचं त्या म्हणाल्या. कलम ३७०, तिहेरी तलाक, भारताचं जी - २०चं अध्यक्षपद, अर्थव्यवस्थेत वृद्धी, कोविड काळात घेतलेल निर्णय, आदी मुद्यांवर राष्ट्रपतींनी भाष्य केलं. विकसित भारताची भव्य इमारत युवा शक्ती, महिला शक्ती, शेतकरी आणि गरीब या चार मजबूत स्तंभांवर उभी राहील, असा सरकारला विश्वास असल्याचं, राष्ट्रपती म्हणाल्या.
दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. येत्या नऊ फेब्रुवारीपर्यंत या अधिवेशनाचं कामकाज चालणार आहे.
****
यंदाचा अंतरिम अर्थसंकल्प म्हणजे महिला सक्षमीकरणाच्या साक्षात्काराचं पर्व आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज संसद भवन परिसरात वार्ताहरांशी बोलत होते. अर्थसंकल्पीय अधिवेशन सकारात्मक पाऊलखुणा सोडण्याची संधी असून, सर्व खासदारांनी ही संधी सोडू नये आणि सर्वोत्तम कामगिरी करावी, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
****
मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेच्या मसुद्याला ओबीसी संघटनांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. सागेसोयरे आणि गणगोत यांच्यासाठी प्रतिज्ञापत्राद्वारे कुणबी दाखले देण्याबाबतच्या मसुद्याला ओबीसी संघटनांनी विरोध केला आहे. संविधानाच्या विरोधात जाऊन सगेसोयरे यांची व्याख्या बदलण्यात येऊ नये, अशी भूमिका, या याचिकेत मांडण्यात आली आहे. ओबीसी वेलफेयर फौंडेशन तर्फे अँडव्होकेट मंगेश ससाणे यांनी ही याचिका दाखल केली आहे.
****
सांगली जिल्ह्यातल्या विटा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचं आज अल्पशा आजाराने निधन झालं, ते ७३ वर्षांचे होते. टेंभू योजनेचं पाणी दुष्काळी आटपाडी तालुक्याला मिळवण्यात बाबर यांचा मोठा वाटा आहे. दुष्काळी भागातल्या प्रश्नांच्यासाठी आक्रमकपणे लढा देणारा नेता अशी बाबर यांची ओळख होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाबर यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. त्यांच्या निधनाने शिवसेनेचा समाजकार्याचा वसा चालवणारा एक अतिशय प्रभावी असा लोकप्रतिनिधी गमावला असल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे. बाबर यांच्या पार्थिवावर शासकीत इतमामात अंत्यसंस्कार करण्याची सूचनाही त्यांनी प्रशासनाला केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनीही बाबर यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं असून, त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
****
रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत लातूर इथं आज जिल्हा ट्रॅव्हल्स असोसिएशन, परिवहन विभाग आणि शहर पोलिस वाहतूक यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयीन युवक-युवतींना मोफत हेल्मेटचं वितरण करण्यात आलं. रस्ते अपघात टाळण्यासाठी युवकांनी रस्ता सुरक्षा विषयक नियम पाळण्याचं आवाहन करून, यासंदर्भात शपथ यावेळी देण्यात आली. १४ फेब्रुवारी पर्यंत रस्ता सुरक्षा अभियान सुरु राहणार असून, याअंतर्गत जिल्ह्यात विविध उपक्रम सुरु आहेत.
****
बीडच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली काल सर्व राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. यात प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदार यादीची प्रत उपलब्ध करून देण्यात आली तसंच ईव्हीएम - व्हीव्हीपॅट यंत्रांचं प्रत्यक्ष प्रशिक्षण आणि प्रात्याक्षिक दाखवण्यात आलं.
****
चेन्नई इथं सुरु असलेल्या खेलो इंडिया युवा स्पर्धेचा समारोप आज केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्या उपस्थितीत होणार आहे. या स्पर्धेत ५३ सुवर्ण पदकांसह एकूण १५० पदकं जिंकून महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. १०३ पदकांसह हरियाणा दुसर्या, तर ९१ पदकांसह तामिळनाडू तिसर्या क्रमांकावर आहे.
दरम्यान, लडाखमध्ये येत्या दोन फेब्रुवारीला खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धेची सुरुवात होणार असून, या स्पर्धेचं शुभंकर आणि बोधचिन्हाचं काल अनावरण करण्यात आलं. सहा फेब्रुवारी पर्यंत या स्पर्धेचा पहिला टप्पा होणार असून, जम्मू आणि काश्मीरमध्ये २१ ते २५ फेब्रुवारीदरम्यान दुसरा टप्पा होईल.
****
No comments:
Post a Comment