Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date:
28 January 2024
Time:
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २८ जानेवारी २०२४ सकाळी ७.१० मि.
****
· आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत मराठा समाजाला ओबीसींच्या
सवलती लागू-मुख्यमंत्र्यांची घोषणा;मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन मागे-आंतरवाली सराटीसह मराठवाड्यात जल्लोष
· विदर्भ आणि मराठवाड्यात
उद्योग-व्यवसाय समूहांना सवलतीच्या दरात वीज पुरवठा
· सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान बॅनर पटकावत एनसीसीचं महाराष्ट्र
संचालनालय देशात सर्वोत्तम
· परभणी इथं आजपासून डॉ. गुलाम रसुल संगीत महोत्सवाचं आयोजन
आणि
· ऑस्ट्रेलिया खुल्या टेनिसस्पर्धेच्या पुरुष दुहेरीत भारताच्या
रोहन बोपण्णाला अजिंक्यपद
****
आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत मराठा समाजाला ओबीसींना दिले
जाणारे अधिकार आणि सवलती दिल्या जातील, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते काल
नवी मुंबईत आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्यानंतर बोलत होते.
जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांच्या हातून फळांचा रस घेऊन आपलं उपोषण सोडलं.
जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य केल्या असल्याचं सांगत, याबाबतच्या अधिसूचनेची प्रत जरांगे यांना दिली. यावेळी
मुख्यमंत्री म्हणाले...
"कुणबी नोंदी मराठवाड्यामध्ये
कधी केल्या जात नव्हत्या. आता सापडू लागल्या. कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी शिबीरं आपण
लावलेली आहेत. सगेसोयरे याबाबतीमध्ये अधिसूचना आपण काढलेली आहे. त्याचबरोबर वंशावळ
जुळवणीसाठी आपण समिती नेमली आहे. मराठा समाजला ओबीसीचे अधिकार ओबीसीच्या सवलती दिल्या
जातील."
दरम्यान, मराठा समाजाला ओबीसी
सवलती देण्याबाबत सरकारनं घेतलेल्या निर्णयाबद्दल ओबीसींचे नेते आणि राज्याचे अन्न
आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ते काल
नाशिक इथं बोलत होते. यासंदर्भात आज मुंबई इथं आपल्या शासकीय निवासस्थानी या
संदर्भात ओबीसी दलित आणि आदिवासी नेत्यांची बैठक घेण्यात येणार असल्याचं, भुजबळ यांनी सांगितलं.
छगन भुजबळ यांची भूमिका ही राष्ट्रवादी
काँग्रेस पक्षाची भूमिका नसल्याचं, पक्षानं स्पष्ट केलं आहे. पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी काल गोंदिया इथं बोलतांना, भुजबळ हे समता परिषदेच्या माध्यमातून ओबीसींचा लढा लढत असल्याचं सांगितलं.
दरम्यान, सरसकट दाखल्यांचा
प्रश्न अद्यापही सरकारला मार्गी लावता आला नसल्याची टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते
अशोक चव्हाण यांनी केली आहे. ते काल नांदेड इथं वार्ताहरांशी
बोलत होते. ज्यांच्याकडे नोंदी नाहीत त्यांच्या कुणबी दाखल्यांसंदर्भात
शासन कसा मार्ग काढणार, असा प्रश्न चव्हाण यांनी उपस्थित
केला आहे. १६ फेब्रुवारी नंतरच राज्य शासनाच्या या आदेशाची अंमलबजावणी होणार असून, यावर हरकती, आक्षेप प्राप्त झाल्यानंतर हा विषय
आणखी स्पष्ट होईल, असं चव्हाण म्हणाले.
****
दरम्यान, आरक्षणाच्या या निर्णयाबद्दल मराठा समाजाकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
ठिकठिकाणी गुलालाची उधळण करून फटाक्यांची आतषबाजी करत पेढे वाटून आनंदोत्सव
साजरा करण्यात आला. जालना जिल्ह्यात आरक्षण आंदोलनाचं मुख्य केंद्रबिंदू
ठरलेल्या आंतरवाली सराटी गावातही काल आनंदोत्सव साजरा करण्यात आला. जिल्हा भाजपा कार्यालयासमोरही पदाधिकाऱ्यांनी मराठा आरक्षणाच्या निर्णयाचं
ढोल ताशांच्या गजरात स्वागत केलं.
छत्रपती संभाजीनगर इथं सर्वत्र आनंद व्यक्त करण्यात येत आहे, शहरातल्या क्रांती
चौक इथं मराठा समाजाकडून गुलाल उधळत आणि मिठाई वाटत जल्लोष करण्यात आला.
परभणी जिल्ह्यात पूर्णा तालुक्यातल्या कातनेश्वर इथं मराठा
समाजातर्फे गावातून मिरवणूक काढण्यात आली.
लातूर इथं मराठा क्रांती मोर्चा
आणि सकल मराठा समाजाच्या वतीने जल्लोष करण्यात आला. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार
अर्पण करून गुलाल उधळून, आतिषबाजी करण्यात आली. उदगीर इथं
लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे यांच्या उपस्थितीत जल्लोष करण्यात आला.
****
अखिल भारतीय पीठासीन अधिकाऱ्यांची ८४ वी परिषद कालपासून मुंबईत विधानभवनात सुरू झाली. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते या परिषदेचं
उद्घाटन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या परिषदेला दूरदृश्य प्रणालीद्वारे
शुभेच्छा दिल्या. सर्व लोकप्रतिनिधींनी सभागृहात तसंच सार्वजनिक
जीवनात आदर्श आचरण करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं.
****
विदर्भ आणि मराठवाड्यात उद्योग-
व्यवसाय सुरू करणाऱ्या समूहांना सवलतीच्या दरात वीज पुरवठा करणारी योजना लवकरच
राबवली जाईल, असं
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हटलं आहे. नागपूर इथं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
नागपूर विद्यापीठाच्या प्रांगणात खासदार औद्योगिक महोत्सवाच्या उद्घाटनानंतर ते
काल बोलत होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यावेळी उपस्थित होते. औद्योगिक, कृषी आणि अन्य क्षेत्रांचा विकास करायचा असेल
तर पायाभूत सुविधा बळकट करणं, आवश्यक आहे, त्यासाठी रस्त्यांचा विकास करण्यात येत असल्याचं गडकरी यांनी सांगितलं.
****
राष्ट्रीय छात्र सेना एनसीसीच्या महाराष्ट्र संचालनालयानं
पंतप्रधान बॅनर सलग तिसऱ्यांदा पटकावत, देशातील सर्वोत्तम संचालनालयाचा बहुमान पटकावला आहे. काल नवी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते
हा सन्मान महाराष्ट्राला प्रदान करण्यात आला. यापूर्वी १९ वेळा
हा सन्मान महाराष्ट्र संचालनालयाला मिळाला आहे.
****
आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रम मालिकेतून पंतप्रधान
नरेंद्र मोदी आज देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम मालिकेचा हा एकशे नववा भाग आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून सकाळी अकरा वाजता या कार्यक्रमाचं
प्रसारण केलं जाणार आहे.
दरम्यान, परीक्षा पे चर्चा कार्यक्रमातून पंतप्रधान उद्या विद्यार्थ्याशी संवाद साधणार
आहेत. या कार्यक्रमाचा हा सातवा भाग आहे
****
शंभराव्या अखिल
भारतीय मराठी नाट्य संमेलनानिमित्त सोलापूर इथं काल नाट्य दिंडी काढण्यात आली. पारंपरिक लोककला
असलेल्या वासुदेव, पोतराज, गोंधळी,
बहुरूपी तसच मानाचे नंदीध्वज, वारकरी, बहुरंगी वेशभूषेतील कलाकारांमुळे ही दिंडी लक्षणीय ठरली.
****
परभणी इथं आजपासून देवगिरी संगीत प्रतिष्ठानच्या वतीने
डॉ. गुलाम रसुल संगीत
महोत्सवाला सुरुवात होत आहे. कोलकाता इथले प्रसिद्ध गायक
सम्राट पंडित, सारंगी वादक संगीत मिश्रा, महागामीच्या नृत्यगुरू पार्वती दत्ता, अकोला इथले
गायक नीरज लांडे, तबला वादक डॉ.
प्रशांत जोशी आदी मान्यवर या संगीत महोत्सवात सादरीकरण करणार आहेत. या महोत्सवात
नृत्यगुरू पार्वती दत्ता यांची कार्यशाळाही आयोजित करण्यात आली आहे. श्री शिवाजी महाविद्यालयात सायंकाळी साडे सहा वाजता हे कार्यक्रम होणार आहेत.
****
हिंगोली जिल्ह्यातलं
मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षण ३१ जानेवारीपर्यंत शंभर टक्के पूर्ण
करावं, अशा
सूचना राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य डॉ. गोविंद काळे यांनी दिल्या आहेत. मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने सर्वेक्षण तसंच विविध कामांची आढावा बैठक काल
हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. काल परभणी इथंही डॉ काळे यांनी यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात
बैठक घेतली.
मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गाचं सर्वेक्षण करताना येणाऱ्या अडचणी दूर करुन, सर्वेक्षणाचं काम वेळेत पूर्ण करण्याची सूचना त्यांनी केली.
****
विकसित भारत संकल्प यात्रेत परभणी इथं मेरी कहानी मेरी
जुबानी अंतर्गत पांडुरंग गमे यांनी आपल्याला झालेल्या लाभाची माहिती दिली...
बाईट - पांडुरंग गमे, परभणी
****
भारताच्या रोहन बोपण्णाने ऑस्ट्रेलिया खुल्या टेनिस स्पर्धेच्या
पुरुष दुहेरीचं अजिंक्यपद पटकावलं आहे. आपला ऑस्ट्रेलियायी जोडीदार मॅथ्यू एब्डेन याच्या साथीनं रोहनने इटलीच्या जोडीचा
सात - सहा, सात-पाच
असा पराभव केला. त्रेचाळिसाव्या वर्षी ग्रॅण्डस्लॅम पटकावणारा
रोहन हा पहिलाच टेनिसपटू ठरला आहे.
****
ओमानमधील मस्कत इथं सुरु असलेल्या महिला हॉकी फाईव्ह विश्वचषक
स्पर्धेत आज भारत आणि नेदरलॅण्ड संघात अंतिम सामना होणार आहे. भारतीय महिला संघानं काल दक्षिण आफ्रिकेला ६-३ अशा फरकानं हरवत अंतिम फेरीत धडक मारली.
****
भारत आणि इंग्लंड दरम्यान हैदराबाद इथं सुरु असलेल्या
पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात, कालच्या तिसऱ्या दिवसअखेर इंग्लंड संघाने दुसऱ्या डावात ६ बाद ३१६ धावा केल्या,
पाहुण्या संघानं दुसऱ्या डावात १२६ धावांची आघाडी घेतली आहे.
तत्पूर्वी भारताचा पहिला डाव काल ४३६ धावात संपुष्टात आला.
****
चेन्नईत सुरु असलेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत
९४ पदकं जिंकून महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर कायम आहे. यामध्ये ३२ सुवर्ण, २७
रौप्य आणि ३५ कांस्य पदकांचा समावेश आहे. तमिळनाडू संघ दुसऱ्या
तर हरियाणा तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
****
छत्रपती संभाजीनगर इथं वाहतूक शाखा आणि स्मार्ट सिटी प्रकल्प
यांच्या संयुक्त विद्यमाने कालपासून शहरामधे वाहतुकीच्या नियमाचं उल्लंघन करणाऱ्या
वाहन धारकांवर ऑनलाईन चलन पध्दतीने दंडात्मक कारवाईला सुरूवात झाली. वाहतुक नियम
तोडणाऱ्यांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधे पाहून कारवाई करण्यात येत आहे.
****
No comments:
Post a Comment