Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 30 January
2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३० जानेवारी २०२४
सायंकाळी ६.१०
****
· अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारची सर्वपक्षीय
बैठक - कामकाज सुरळीत ठेवण्याचं आवाहन
· तामिळनाडूतल्या जिंजीसह महाराष्ट्रातल्या ११ किल्ल्यांचा जागतिक
वारसा स्थळांच्या यादीत नामांकनासाठी केंद्र सरकारचा प्रस्ताव
· २०२३ सालचा 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ
यांना जाहीर
· परळी इथं बोअरवेलच्या दोन मजुरांचा वीजेचा धक्का बसून मृत्यू
आणि
· छत्रपती संभाजीनगर इथं पतसंस्था घोटाळाप्रकरणी विभागीय आयुक्त
कार्यालयावर मोर्चा
****
संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. अधिवेशन
काळात दोन्ही सभागृहात कामकाज सुरळीत चालावं या दृष्टीनं केंद्र सरकारनं आज सर्वपक्षीय
बैठक घेतली. सरकार सर्व मुद्यांवर चर्चा करण्यासाठी तयार आहे, असं संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी
बोलताना सांगितलं. संसदेच्या दोन्ही सदनांचं कामकाज कोणत्याही अडथळ्याविना चालावं यासाठी
विरोधी पक्षांनी सहकार्य करावं तसंच सभागृहात फलक आणू नयेत असं आवाहनही त्यांनी केलं.
या अर्थसंकल्पीय अधिवेशनात काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष बेरोजगारी, महागाई, देशावरचं वाढते कर्ज यासारखे मुद्दे मांडणार
आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणानं उद्या अर्थसंकल्पीय
अधिवेशनाला प्रारंभ होणार आहे. एक फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतरामन हंगामी
अर्थसंकल्प सादर करणार आहेत. येत्या ९ मार्चपर्यंत या अधिवेशनाचं कामकाज चालेल.
****
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यातिथी आज देशभरात हुतात्मा
दिन म्हणून पाळण्यात येत आहे. देशभरातल्या सरकारी कार्यालयांमध्ये सकाळी ११ वाजता दोन
मिनिटं मौन पाळून हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. नवी दिल्लीत राजघाट या
गांधीजींच्या समाधीस्थळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह
केंद्रीय मंत्रिमंडळातल्या इतर सदस्यांनी गांधीजींच्या समाधीवर पुष्प अर्पण करुन अभिवादन
केलं. आता सायंकाळीही राजघाटावर सर्वधर्म प्रार्थना सभा घेण्यात येत आहे. उपराष्ट्रपती
तसंच पंतप्रधानांसह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित आहेत.
****
नवी मुंबई क्षेत्रातील सिडको अंतर्गतच्या मावेजा रकमेची वसुली
प्रलंबित असलेल्या इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र, भाडेपट्टा खत, अभिहस्तांतरण देण्याचे निर्देश मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. त्यानुसार सिडकोतर्फे अशा इमारतींसाठी नवी अभय योजना
जाहीर करण्यात आली असून जास्तीत जास्त नागरिकांनी आणि विकासकांनी या योजनेचा लाभ घेण्याचं
आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. ही अभय योजना ३१ मार्च २०२४ पर्यंत लागू असणार आहे.
****
महाराष्ट्रातील ११ आणि तामिळनाडूच्या जिंजी किल्ल्याला युनेस्कोच्या
२०२४-२५ जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये नामांकनासाठी केंद्र सरकारनं प्रस्ताव पाठवला
आहे. या किल्ल्यांना असलेला शौर्य, पराक्रम आणि रयतेच्या कल्याणाचा वारसा आणि ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता,
त्यावर अंतिम मोहोरही उमटेल, असा विश्वास मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्रातील साल्हेर, शिवनेरी, लोहगड, खांदेरी,
रायगड, राजगड, प्रतापगड,
सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग,
सिंधुदुर्ग या ११ किल्ल्यांचा समावेश आहे.
****
आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या घटकांना बाळासाहेब
ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार देण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण
मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी आज ही माहिती दिली. २०२३-२४ या वर्षापासून राज्यात एक
नवीन आरोग्य पुरस्कार देण्यात येणार असून उत्कृष्ट काम करणारी स्वयंसेवी संस्था, उत्कृष्ट काम करणारे डॉक्टर, आरोग्य क्षेत्रात
उत्कृष्ट वार्तांकन करणारे पत्रकार तसंच कर्मचारी यांना या पुरस्कारानं गौरवण्यात येणार
असल्याचं सावंत यांनी सांगितलं. याबाबतचा शासन निर्णयही निर्गमीत करण्यात आला असून
दरवर्षी दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी हे पुरस्कार वितरित करण्यात येणार
आहेत.
****
२०२३ सालचा 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ
यांना जाहीर झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ही घोषणा केली. मुख्यमंत्र्यांनी
अशोक सराफ यांच्याशी संपर्क साधून त्यांचं अभिनंदनही केलं. अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच
नव्हे तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छटांचं दर्शन आपल्या
अभिनयातून घडवलं आणि रसिकांवर अधिराज्य गाजवलं, असं मुख्यमंत्र्यांनी
सराफ यांचं अभिनंदन करतांना म्हटलं आहे.
****
मनोज जरांगे पाटील यांनी आज रायगड इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या
समाधीचं दर्शन घेतलं. सग्यासोयऱ्यांसह एकही मराठा आरक्षणापासून वंचित राहणार नाही असा
विश्वास त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.
****
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अहमदनगर
जिल्ह्यातील श्रीरामपूर इथं जनाधिकार जनता दरबार घेतला, या कार्यक्रमात एका विद्यार्थ्याला शिक्षणासाठी १० हजार रुपयांची
आर्थिक मदत करण्यात आली. या विद्यार्थ्याच्या पित्याचा बालपणी मृत्यू झाल्याने बालसंगोपन
निधी योजनेअंतर्गत त्याला ही मदत करण्यात आली.
****
बीड जिल्ह्यातल्या परळी शहराजवळ वाघबेट इथे वीजवाहक तारांशी
संपर्क झाल्यामुळे २ मजुरांचा मृत्यू झाला तर
२ मजूर गंभीर जखमी झाले. आज दुपारी सव्वा बारा वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
हे मजूर ओडिसा जिल्ह्यातले असून गोविंदा धवन सिंग आणि संदीप डाक्टर अशी मृत मजुरांची
नावं आहेत. बोअरवेल खोदण्यासाठी आलेल्या गाडीचा वीजवाहक तारांशी संपर्क आला आणि वीजेचा
प्रवाह गाडीत उतरल्यामुळे ही दुर्घटना घडली. जखमी मजुरांवर परळी उपजिल्हा रुग्णालयात
उपचार सुरू आहेत.
****
छत्रपती संभाजीनगर शहर आणि जिल्ह्यातल्या १५ पतसंस्था आणि बँकेत
झालेल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी, ठेवीदार कृती
समितीच्या वतीनं आज विभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या आंदोलकांना विभागीय
आयुक्त कार्यालयाच्या परिसरात येण्यापासून रोखण्यासाठी अश्रुधुराचा वापर करण्यात आला,
मात्र आंदोलकांनी आयुक्तालयाच्या प्रांगणात प्रवेश करून पायऱ्यांवर ठिय्या
आंदोलन केलं. खासदार सय्यद इम्तियाज जलील या मोर्चाचं नेतृत्व करत आहेत. विभागीय आयुक्तांनी
स्वत: येऊन निवेदन स्वीकारावं, आणि यासंदर्भात कारवाईचं लेखी
आश्वासन द्यावं, अशी मागणी खासदार सय्यद इम्तियाज यांनी लावून
धरली आहे. माजी आमदार हर्षवर्धन जाधव यावेळी उपस्थित होते. विविध बँकेचे तसंच पतसंस्थेचे
ठेवीदार या आंदोलनात सहभागी झाले आहेत. जमलेल्या आंदोलकांना प्रशासनाकडून चिक्कीचं
वाटप करण्यात आलं.
****
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंतर्गत निपुण भारत या उपक्रमाच्या
अनुषंगाने धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील काटगाव या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये
लोकसहभागातून समृद्ध ग्रंथालय सुरू करण्यात आलं आहे विद्यार्थ्यांमध्ये वाचन कौशल्य
वृद्धिंगत व्हावं, या उद्देशाने हा उपक्रम सुरू केल्याची
माहिती शिक्षण विस्ताराधिकारी मल्हारी माने यांनी दिली. गावकऱ्यांनी जवळपास एक लाख
रुपयांची पुस्तकं या वाचनालयासाठी उपलब्ध करून दिली आहेत. गावातल्या सर्व मंदिरांमधून
संध्याकाळच्या वेळी भोंग्याद्वारे विद्यार्थ्यांना अभ्यासाला बसण्याची सूचनाही करण्यात
येते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासात सुधारणा होत असल्याची भावना लक्ष्मी सोनटक्के
या पालक महिलेनं व्यक्त केली -
आमच्या गावामध्ये सहा वाजता
भोंगा वाजतो अभ्यासाचा. मुलं वाटच बघत बसतात सहा कधी वाजतात, भोंगा कधी वाजतो, कधी
अभ्यासाला बसायचं म्हणून वाट बघत बसतात. आता प्राथमिक शाळेतली मुलं अभ्यासाला बसतात
तर माझ्या घरामध्ये लहान मुलं सुद्धा आहेत, ती सुद्धा दादा बसला की आम्हीपण बसणार असं
सांगतात. आणि घरामध्ये खूपच चांगल्या प्रकारे शैक्षणिक वातावरण निर्माण झाले आहे.
****
नांदेड इथे जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या वतीने दिव्यांग
विद्यार्थ्यांसाठीच्या क्रीडा स्पर्धांचं उद्घाटन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या
हस्ते आज करण्यात आलं. या क्रीडा स्पर्धेत जिल्ह्यातील एकशे छप्पन्न मुकबधीर विद्यार्थी, दोनशे वीस अस्थिव्यंग, एकशे पंचेचाळीस अंध,
नव्वद मतिमंद अश्या एकूण सहाशे अकरा विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे.
****
परभणी इथे जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी कार्यालयाच्या
बालमहोत्सवाचं उद्घाटन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते आज करण्यात आलं. उद्या
पर्यंत चालणाऱ्या या बालमहोत्सवात ८ मैदानी स्पर्धा घेण्यात आल्या. तर बुद्धीबळ, वक्तृत्व, यासारख्या स्पर्धाही घेण्यात आल्या.
या बालमहोत्सवात जिल्ह्यातले जवळपास दीड हजार विद्यार्थी सहभाग घेत असून उद्या गीतगायन,
नृत्य, अश्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी या महोत्सवाचा
समारोप होणार आहे.
****
बीड जिल्ह्यात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचं परीक्षा
शुल्क माफ करावं अशी मागणी विद्यापीठ अधिसभा सदस्य तथा राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष
डॉ. नरेंद्र काळे यांनी केली आहे. या मागणीचं पत्र त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्याकडे सादर केलं आहे
****
छत्रपती संभाजीनगर इथले प्रसिद्ध चित्रकार विजय कुलकर्णी यांचं
काल मध्यरात्री पुण्यात अल्पशा आजारानं निधन झालं. म्यूरल पेंटिंग, अमूर्त चित्रशैली आणि अजिंठा चित्रांसाठी ते प्रख्यात होते. त्यांनी
१९८२ मध्ये वेरूळ इथे 'रॉक आर्ट गॅलरी' सुरू केली आणि अजिंठा चित्रांसाठी आपलं आयुष्य वाहून घेतलं.
****
No comments:
Post a Comment