Sunday, 28 January 2024

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 28.01.2024 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 28 January 2024

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २८ जानेवारी २०२४ सायंकाळी ६.१०

****

·      सामुहिकतेची शक्ती देशाला यशाच्या नव्या शिखरावर घेऊन जाईल- मन की बातमधून पंतप्रधानांचं प्रतिपादन.

·      बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नीतीशकुमार यांचा शपथविधी-भाजपच्या पाठिंब्यावर पुन्हा सत्तारूढ.

·      ८४ व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेचा उपराष्ट्रपतींच्या उपस्थितीत समारोप.

आणि

·      नाटकांचा सुवर्णकाळ पुन्हा अनुभवण्यासाठी रसिकांनी कलाकारांच्या पाठीशी उभं राहावं- चंद्रकांत पाटील यांचं आवाहन.

****

सामुहिकतेची शक्ती देशाला यशाच्या नव्या शिखरावर घेऊन जाईल असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आकाशवाणीवरच्या मन की बात` या कार्यक्रमातून पंतप्रधानांनी आज देशवासियांशी संवाद साधला, या मालिकेचा या वर्षातला हा पहिला आणि एकूण एकशे नववा भाग होता. अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त २२ जानेवारीला देशातील नागरिकांनी दिवे लावून दिवाळी साजरी केली तसंच या दिवशी राबवण्यात आलेल्या स्वच्छता अभियानातून देशाची सामूहिकतेतली शक्ती सर्वांना दिसली, असं पंतप्रधान म्हणाले. २६ जानेवारीला कर्तव्य पथावरील महिलांच्या तुकडीचं पथसंचलन, अर्जुन पुरस्कार प्राप्त महिला खेळाडूंनी कठीण परिस्थितीत मिळवलेलं यश, तसंच बचत गटातल्या महिलांच्या कार्यक्षेत्राचा विस्तार याचा त्यांनी यावेळी गौरवपर्ण उल्लेख केला.

पंतप्रधानांनी पद्म पुरस्कार विजेत्यांचं अभिनंदन करत यातल्या प्रत्येकाचं योगदान देशवासियांना प्रेरणादायी असल्याचं सांगितलं. अवयवदान आणि देहदान करणाऱ्या व्यक्तींच्या कुटुंबाचं त्यांनी यावेळी कौतुक केलं. देशात ९६ कोटी मतदार असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख पंतप्रधानांनी केला. तसंच युवामतदारांनी `नॅशनल व्होटर सर्व्हिस पोर्टल` आणि `व्होटर हेल्पलाइन अॅप`च्या माध्यमातून नावनोंदणी करण्याचं आवाहन त्यांनी केलं. गेल्या सात वर्षांपासून सुरु `परीक्षा पे चर्चा` या कार्यक्रमात यावेळेस सव्वा दोन कोटींपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाचा सातवा भाग उद्या दिल्लीत होणार असून त्यात ४ हजाराहून जास्त विद्यार्थी प्रत्यक्ष सहभागी होणार आहेत

या कार्यक्रमाबाबत धाराशिव जिल्हा परिषद शाळेतले उमरगा तालुक्यातले शिक्षक उमेश खोसे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं...

परीक्षा देत असताना मुलांनी वेळेचं व्यवस्थापन कसं करावं तसंच योग्य साहित्याची निवड कशी करावी आणि आपली तयारी झाली का नाही, याची पडताळणी कशी करावी, आपले आरोग्य कसं निरोगी ठेवावं, आपले मानसिक आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी काय करावे, याबाबत याच्यातून मार्गदर्शन केलेलं आहे. हा उपक्रम एक छान उपक्रम आहे. आपण या  उपक्रमात सहभागी होऊन, आपल्यावर येणारा ताण आणि दडपण आपण दूर करु शकता.

****

संयुक्त जनता दलाचे नेते नीतीशकुमार यांनी आज बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नवव्यांदा शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्यापूर्वी आज सकाळी नीतीशकुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत, राष्ट्रीय जनता दलासोबतचं आघाडी सरकार बरखास्त करण्याची शिफारस राज्यपालांकडे केली. तसंच भारतीय जनता पक्ष, हिंदुस्तान आवाम मोर्चा तसंच अपक्ष आमदारांच्या बळावर राज्यात सत्तास्थापनेचा दावा राज्यपालांकडे केला. नीतीशकुमार यांच्यासह आज संयुक्त जनता दलाचे विजय चौधरी, विजेंद्र यादव, श्रवणकुमार, भाजपचे सम्राट चौधरी, विजय सिन्हा, प्रेमकुमार, हिंदुस्थान आवाम मोर्चाचे संतोष सुमन तर अपक्ष आमदार सुमीत सिंह, या आठ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

****

कायदेमंडळात गदारोळापेक्षा चर्चेला प्राधान्य द्यावं अशी अपेक्षा उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी व्यक्त केली आहे. ते आज मुंबईत ८४ व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेच्या समारोप सत्रात बोलत होते. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी यावेळी बोलताना कायदेमंडळांची उत्पादकता वाढावी तसंच सामान्य जनतेच्या हितासाठी चर्चा व्हायला हवी अशी अपेक्षा व्यक्त केली.

दरम्यान, पक्षांतर बंदीसंदर्भात भारतीय घटनेच्या १० व्या परिशिष्टाच्या अंतर्गत असलेल्या नियमांची समीक्षा करण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय पातळीवर एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या समितीच्या अहवालानंतर गरज वाटल्यास सरकार घटनादुरुस्ती करेल असं बिर्ला यांनी सांगितलं.

****

नागपूर इथल्या सार्वजनिक उपक्रम क्षेत्राच्या अधीन असलेल्या निकामी खाणी किंवा पडीक जागा आणि त्यांच्या भोवतालच्या जलस्रोतांचा उपयोग करून एकात्मिक सौर आणि जलविद्युत प्रकल्प स्थापन करून त्या माध्यमातून हरित ऊर्जेची निर्मिती केली जाणार आहे. केंद्रीय कोळसा सचिव अमृतलाल मीना यांनी आज नागपूर इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. अशा हरित ऊर्जेच्या माध्यमातून ४०० मेगावॅट एवढी एकत्रित ऊर्जा निर्माण होण्याची शक्यता असल्याचं त्यांनी सांगितलं.  केंद्रीय मंत्रिमंडळाने कोल गॅसिफिकेशन प्रकल्पांसाठी साडे आठ हजार कोटी रुपयाच्या व्यवहार्यता अंतर निधी योजनेला मंजुरी दिली. कोळशापासून कृत्रिम नैसर्गिक वायू, डायमिथाइल इथर आणि अमोनियम नायट्रेट तयार करणे हे या योजनेचं उद्दिष्ट आहे. खाजगी कोल गॅसिफिकेशन करणाऱ्या कंपन्यांना सरकारतर्फे एक हजार कोटी रुपये अनुदान देण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं .

****

नाट्य रंगभूमी पुढं येण्यासाठी रसिकांनी कलाकारांच्या पाठीशी उभं राहावं, त्यामुळे नाटकांचा सुवर्णकाळ पुन्हा एकदा अनुभवता येईल, असं आवाहन उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री तथा सोलापुरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. ते आज सोलापुरात १०० व्या अखिल भारतीय विभागीय मराठी नाट्य संमेलनाच्या हस्तांतरण सोहळ्यात बोलत होते. यावेळी अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष जब्बार पटेल उपस्थित होते. शालेय विद्यार्थ्यांना नाट्य आणि संगीताचे शिक्षण दिल्यास त्यांची सांस्कृतिक जाण अधिक प्रगल्भ होईल असं ते यावेळी म्हणाले.

****

येत्या २ ते ४ फेब्रुवारी या कालावधीत अमळनेर इथं नियोजित ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी अंतिम टप्यात आली आहे. संमेलनाचे कार्याध्यक्ष डॉ. अविनाश जोशी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. हे संमेलन अविस्मरणीय ठरावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. या संमेलनात पूज्य साने गुरुजींचे अप्रकाशित साहित्याचं प्रकाशन करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त शस्त्र प्रदर्शनही भरवण्यात येणार असल्याचं जोशी यावेळी म्हणाले.

****

छत्रपती संभाजीनगर शहर आणि जिल्ह्यातल्या १५ पतसंस्था आणि बँकेत झालेल्या आर्थिक घोटाळा प्रकरणी परवा ३० जानेवारी रोजी कृती समितीच्या वतीनं विभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. कृती समितीचे समन्वयक प्रांतोष वाघमारे यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी कथित घोटाळा झालेल्या विविध बँकेचे तसंच पतसंस्थेचे ठेवीदार उपस्थित होते. खासदार इम्तियाज जलील या मोर्चाचं नेतृत्व करणार असल्याचं वाघमारे यांनी सांगितलं.

****

विकसित भारत संकल्प यात्रेत परभणी इथं मेरी कहानी मेरी जुबानी अंतर्गत शितल कच्हवे यांनी आपल्याला झालेल्या लाभाची माहिती दिली...

बाईट - शितल कच्हवे,परभणी

****

मन की बात कामगार मोर्चा के साथ या संकल्पने अंतर्गत आज धाराशिव इथं  आनंद भालेराव यांच्या घरी मन की बात कार्यक्रम ऐकण्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यासह परिसरातील नागरिक तसंच शाळेतील मुला-मुलींची उपस्थिती होती.

****

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी बिनचूक माहिती सर्वेक्षणाच्या माध्यमातून समोर यावी यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाकडून दक्षता घेण्यात येत असून, जालना जिल्ह्यात या सर्वेक्षणाच्या कामास गती देण्यात यावी, असे निर्देश राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य डॉ.गोविंद काळे यांनी दिले आहेत. आज जालना जिल्हाधिकारी कार्यालयात या संदर्भात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

 

लातूर जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण सुरु असून त्यात येणाऱ्या अडचणी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर - घुगे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदार यांच्याकडून दूरदृश्य माध्यमातून नुकत्याच जाणून घेतल्या. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य डॉ. गोविंद काळे यांनी या सर्व तांत्रिक अडचणीची दखल घेऊन तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांच्या यंत्रणेला दिल्या आहेत.

****

No comments: