Friday, 26 January 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक:26.01.2024 रोजीचे सकाळी: 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 26 January 2024

Time: 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २६ जानेवारी २०२ सकाळी ७.१० मि.

****

आमच्या सर्व श्रोत्यांना ७५व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

 

ठळक बातम्या 

·      संविधानात विहित मूल कर्तव्यांचं सर्व नागरिकांनी पालन करावं-७५ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींचं देशवासियांना आवाहन 

·      पद्म पुरस्कार जाहीर-पाच पद्मविभूषण, १७ पद्मभूषण तर ११० जणांना पद्मश्री सन्मान 

·      सहा कीर्ति चक्रांसह विविध शौर्य पुरस्कार जाहीर-१२ जणांचा मरणोत्तर बहुमान

·      राष्ट्रीय मतदार दिवस विविध उपक्रमांनी सर्वत्र साजरा

आणि

·      खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत ७९ पदकं जिंकून महाराष्ट्र पहिल्या स्थानावर कायम

सविस्तर बातम्या

७५ वा प्रजासत्ताक दिन आज साजरा होत आहे. नवी दिल्लीत कर्तव्य पथावर मुख्य ध्वजारोहण होणार असून, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रॉ या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. याठिकाणी होणाऱ्या पथसंचलनात देशाच्या सांस्कृतिक विविधतेचं दर्शन होणार आहे.

****

दरम्यान, या सोहळ्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातले, मध्यम प्रकल्प सहकारी संस्थेद्वारे मासेमारी करणारे तुकाराम आणि सीताबाई वानखेडे तसंच राधिका आणि रामकिसन वानखेडे, जालना जिल्ह्याच्या बदनापूर तालुक्यातल्या सोमठाणा इथले मच्छिमार व्यवसाय करणारं मेंढरे दाम्पत्य, तसंच मानेगावच्या सरपंच अश्विनी ढेंगळे यांना निमंत्रित करण्यात आलं आहे. या पथसंचलनात जळगाव इथल्या मयूरी महाले या नववीच्या विद्यार्थीनीची सांस्कृतिक कार्यक्रमात नृत्य प्रकारात निवड झाली आहे.

****

संविधानात विहित मूल कर्तव्यांचं सर्व नागरिकांनी पालन करावं, असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात त्या बोलत होत्या. हा युगपरिवर्तनाचा काळ असून, आपल्या देशाला नवीन उंची गाठण्याची ही सुवर्णसंधी असल्याचं त्यांनी नमूद केलं, त्या म्हणाल्या

ये एक युगांतोपरी परिवर्तन का कालखंड है। हमे अपने देश को नई उच्चाईयों तक ले जाने का सुनहरा अवसर मिला है। हमारा लक्ष्य को प्राप्त करने के लिये, प्रत्येक नागरिक का योगदान महत्वपूर्ण होगा। इसके लिये मै सभी देशवासियों से संविधान मे निहीत हमारे मूल कर्तव्यों का पालन करने का अनुरोध करूंगी। ये कर्तव्य आजादी के सौ वर्ष पूरे होने तक भारत को एक विकसित राष्ट्र बनाने की दिशा मे प्रत्येक नागरिक का आवश्यक दायित्व है।

****

पद्म पुरस्कार काल जाहीर झाले. पाच जणांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला असून, यामध्ये माजी उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, अभिनेत्री वैजयंतीमाला, अभिनेता चिरंजीवी, यांचा समावेश आहे. सामाजिक कार्यकर्ते बिंदेश्वर पाठक यांना मरणोत्तर हा सन्मान जाहीर झाला आहे. १७ जणांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यामध्ये होरमुसजी एम कामा, अभिनेते मिथुन चक्रवर्ती, अश्विन मेहता, माजी मंत्री राम नाईक, ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, ज्येष्ठ संगीतकार प्यारेलाल शर्मा, गायिका उषा उत्थुप, पत्रकार कुंदन व्यास यांचा समावेश आहे. तर ११० जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. यामध्ये मल्लखांब प्रशिक्षक उदय देशपांडे, डॉ मनोहर डोळे, झहीर काजी, डॉ चंद्रशेखर मेश्राम, उद्योजक कल्पना मोरपारिया, सामाजिक कार्यकर्ते शंकरबाबा पापळकर, टेनिसपटू रोहन बोपन्ना यांचा समावेश आहे.

****

शौर्य पुरस्कार काल जाहीर झाले. यामध्ये सहा कीर्ति चक्र, १६ शौर्य चक्र, ५३ सेनापदक, चार वायू दल पदक आणि एका नौदल वीरता पदकाचा समावेश आहे. यामध्ये १२ जणांना ही पदकं मरणोत्तर जाहीर झाली आहेत. याशिवाय ३११ सैन्यपदकं, सहा तटरक्षक पदकंही जाहीर झाली आहेत.

पोलीस, अग्निशमन सेवा, गृहरक्षक आणि नागरी संरक्षण आणि सुधारणा सेवेतल्या एक हजार १३२ जवानांना शौर्य आणि सेवा पदकं काल जाहीर झाली. विशिष्ट सेवेसाठी १०२ जणांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले, यामध्ये महाराष्ट्रातले अतिरिक्त पोलीस महासंचालक निकेत कौशिक, मीरा भाईंदर वसई विरारचे पोलीस आयुक्त मधुकर पांडे, विशेष पोलीस महानिरीक्षक दिलीप सावंत आणि पोलीस निरीक्षक मधुकर कड यांचा समावेश आहे.

महाराष्ट्रातल्या १८ पोलिस जवानांना शौर्य पदक जाहीर झालं आहे. यात नक्षलप्रभावीत जिल्ह्यात उल्लेखनीय कामगिरी केलेले तत्कालिन अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्यासह, उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी यांचा समावेश आहे.

राज्यातल्या ४० पोलीस जवानांना उल्लेखनीय सेवेसाठी पदक जाहीर झालं आहे. यात नांदेड इथले दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक माणिक बेदरे, छत्रपती संभाजीनगर इथले उपविभागीय पोलिस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड तसंच सहायक पोलिस उपनिरीक्षक शाहबाज खान पठाण यांचा समावेश आहे.

अग्निशमन विभागात उल्लेखनीय सेवेसाठी महाराष्ट्रातल्या सहा कर्मचाऱ्यांना, गृहरक्षक दल तसंच नागरी सुरक्षा विभागातल्या सेवेसाठी राज्यातल्या सात जणांना तर सुधारसेवेसाठी कारागृह विभागातल्या नऊ अधिक्षक तसंच कर्मचाऱ्यांना पदक जाहीर झालं आहे.

जीवन रक्षा पदक राज्यातल्या तीन जणांना जाहीर झालं असून, यामध्ये आदिका पाटील, प्रियंका काळे, आणि सोनाली बालोडे यांचा समावेश आहे.

सोलापूर इथल्या रहिवासी, केंद्रीय अन्वेषण ब्युरो- सीबीआयच्या सहसंचालक विद्या कुलकर्णी यांना उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर झालं आहे.

****

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचं राज्यातल्या सर्व ४८ जागांवर जागावाटप हे सुरळीत पार पडल्याचं शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सांगितलं आहे. काल मुंबईत यासंदर्भातल्या बैठकीनंतर ते बोलत होते. यासंदर्भात येत्या ३० तारखेला पुन्हा बैठक होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. काँग्रेसचे नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जयंत पाटील, यांच्यासह डावे पक्ष तसंच शेकापचे प्रतिनिधीही या बैठकीला उपस्थित होते.

****

मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतल्या आझाद मैदानावरील आंदोलनासाठीची परवानगी मुंबई पोलिसांनी नाकारली आहे. आंदोलन करावं इतकी आझाद मैदानाची क्षमता नाही. त्याऐवजी जरांगे यांनी नवी मुंबईत खारघर इथल्या इंटरनॅशल कॉर्पोरेशन पार्क इथं आंदोलन करावं, असा पर्याय मुंबई पोलिसांनी सुचवला आहे.

दरम्यान, मराठा समाजाचं सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण तपासणी सर्वेक्षण मराठवाड्यात सर्वत्र सुरु आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात आतापर्यंत चोविस हजार २०८ कुटुंबांचं सर्वेक्षण करण्यात आल्याचं, महानगरपालिकेनं कळवलं आहे.

****

राज्यात काल मतदार दिवस जनजागृती फेऱ्यांसह विविध उपक्रमांनी साजरा झाला.

हिंगोली जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय आणि मतदार नोंदणी अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातल्या शिवाजी महाविद्यालयात यानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला.

परभणी इथं झालेल्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी, लोकसभा निवडणुकीत परभणीत ७० टक्के पेक्षा अधिक मतदान होईल असा संकल्प केला असून, नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावण्याचं आवाहन केलं.

धाराशिव इथं यानिमित्त दिव्यांग, तृतीयपंथीय मतदार, तसचं भटके विमुक्त समाजातल्या नव मतदारांचा जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. नवमतदारांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता मतदान करण्याचं आवाहन ओंबासे यांनी केलं.

बीड इथं या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी, जिल्हयातील महिला आणि नवमतदारांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.

लातूर इथं दयानंद महाविद्यालयात जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर - घुगे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आला. लोकशाही प्रक्रियेत मतदान ही सर्वात महत्त्वाची प्रक्रिया असून, त्यात युवकांचा सहभाग गरजेचं आहे, असं त्या म्हणाल्या. उत्कृष्ट कार्य करणारे अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला.

नांदेड इथं झालेल्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी मार्गदर्शन केलं. मतदानाचा अधिकार, मतदानाचे महत्त्व सांगणाऱ्या एकांकिका, मतदार नोंदणीमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी - कर्मचाऱ्यांचा सत्कार, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचं प्रात्यक्षिक आदी कार्यक्रम घेण्यात आले.

****

शिक्षकांनी उत्तम विद्यादान करून सुसंस्कृत समाज आणि आदर्श नागरिक घडवण्याचं काम करावं, असं आवाहन धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत यांनी केलं आहे. काल ते जिल्ह्यातील परांडा इथं शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. गेम्स २४ या संस्थेच्या माध्यमातून जिल्हा परिषदेकडून सायकल बॅंक स्थापित करण्यात आली आहे. शाळेपासून लांब राहणाऱ्या गरजू मुलींना या बँकेतून सायकल वितरित करण्यात आल्या.

****

चेन्नई इथं सुरू असलेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत एकूण ७९ पदकं जिंकून महाराष्ट्र पहिल्या स्थानावर कायम आहे. यामध्ये २६ सुवर्ण, २३ रौप्य आणि ३० कांस्य पदकांचा समावेश आहे. काल या स्पर्धेत मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या देविका घोरपडेनं, धावपटू सिया सावंत, मल्लखांबमध्ये शार्दूल ऋषिकेश, मृगांक पाथरे आणि सई शिंदे या खेळाडूंनी सुवर्णपदक पटकावलं.

****

हैदराबाद इथं सुरु असलेल्या भारत-इंग्लंड दरम्यानच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात, आजच्या दुसऱ्या दिवशी भारत, एक बाद ११९ धावांपासून पुढे खेळणार आहे. यशस्वी जयस्वाल ७६ तर शुभमन गिल १४ धावांवर खेळत आहेत. तत्पूर्वी काल सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडच्या पहिल्या डावात २४६ धावा झाल्या. रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले. भारत पहिल्या डावात १२७ धावांनी पिछाडीवर आहे.

****

No comments: