Thursday, 25 January 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 25.01.2024 रोजीचे दुपारी: 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 25 January 2024

Time: 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २५ जानेवारी २०२ दुपारी १.०० वा.

****

देशात आज १४ वा राष्ट्रीय मतदार दिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. युवा शक्तीला मतदानासाठी जागृत ठेवणं हे निवडणूक आयोगाचं यश असून यासाठी निवडणूक आयोगाचं कौतूक असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आज यासंबंधी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या कार्यक्रमात मतदार जनजागृती, निवडणूक प्रक्रियेतील कार्य आणि मतदार याद्या अद्यावत करण्यात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांना राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं.

****

विशिष्ट सेवेसाठी महाराष्ट्रातील चार पोलिस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर झालं आहे. यामध्ये अतिरिक्त पोलिस महासंचालक निकेत कौशिक, पोलिस आयुक्त मधूकर पांडे, विशेष पोलिस महानिरीक्षक दिलीप सावंत आणि पोलिस निरीक्षक मधूकर कड यांचा समावेश आहे. तसंच पोलिस दलात उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या चाळीस पोलिसांनाही पोलिस पदक जाहीर झालं आहे.

****

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्राला संबोधित करणार आहेत. सायंकाळी सात वाजता आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून प्रथम हिंदीत आणि त्यानंतर इंग्रजीत राष्ट्रपतींचं भाषण प्रसारित होईल. रात्री साडे नऊ वाजता राष्ट्रपतींच्या भाषणाचा मराठी अनुवाद प्रसारित केला जाणार आहे.

****

यंदाच्या प्रजासत्ताकदिनी दिल्ली इथं कर्तव्यपथावर होणाऱ्या पथसंचलनासाठी महाराष्ट्राच्या वतीनं सादर होणारा चित्ररथ साकारण्याचा बहुमान तिसऱ्यांदा यवतमाळच्या कलावंतांना मिळाला आहे.

यंदा महाराष्ट्राच्या चित्ररथावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणापासून ते स्वराज्य निर्मितीपर्यंतचे प्रसंग दाखवण्यात येणार आहेत. राष्ट्रीय रंगशाला परिसरात सध्या चित्ररथाची बांधणी करण्यात येत आहे. यवतमाळचे तुषार प्रधान आणि रोशन इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली यवतमाळच्या पाटणबोरी इथं चित्ररथ ३० कलाकारांनी साकारला आहे. यापूर्वीही उत्तरप्रदेश आणि छत्तीसगढचा चित्ररथ साकारण्याची जबाबदारीही या कलावंतांना मिळाली होती.

****

परभणी शहरात प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुलात आज राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला. दरम्यान, शालेय विद्यार्थ्यांनी मतदार जनजागृती फेरी यावेळी काढण्यात आली. लोकसभा निवडणुकीत ७० टक्क्यांपेक्षा अधिक मतदान करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. तसंच निवडणुकीच्या दिवशी राष्ट्रीय कार्यात योगदान देण्यासाठी नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावण्याचं आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी यावेळी केलं. नव मतदार संख्या वाढवण्यासाठी विशेष मोहीम राबवून आतापर्यंत १८ हजार नवीन नोंद मतदार यादीत समाविष्ट करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी गावडे यांनी यावेळी दिली. 

***

हिंगोली इथं शिवाजी महाविद्यालयात आज राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी आदी उपस्थित होते.

****

अकोला जिल्ह्यात मतदार नोंदणीसाठी घेण्यात आलेली शिबीरं आणि विविध प्रयत्नांमुळं मतदारांच्या संख्येत भर पडली आहे. जिल्ह्यात यंदाच्या यादीतली पुरुष मतदारांची संख्या आठ लाखांवर तर महिला मतदारांची संख्या साडे सात लाखांवर पोहचल्याची माहिती जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिली आहे. अंतिम मतदार यादीत एक हजार पुरुषांमागे स्त्रियांचं ९३८ इतकं प्रमाण आहे, तर तृतीयपंथी समुदायाची संख्या ४९ इतकी आहे.     

****

श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपारिक क्रीडा महाकुंभ उद्या २६ जानेवारीपासून मुंबईत सुरू होणार आहे. राज्यभरातून जवळपास सव्वा लाख खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. स्पर्धेच्या अनुषंगानं उद्घघाटनाप्रसंगी राज्यातल्या २७ किल्ल्यांचं प्रदर्शन होणार आहे, त्याचसोबत दांडपट्टा, लाठी-काठी या सारख्या शिवकालीन युद्धकलांची प्रात्यक्षिकं सुद्धा सादर केली जाणार आहेत.

****

क्रिकेटमध्ये, हैदराबाद इथं सुरू असलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यांत प्रथम फलंदाजी करताना इंग्लड संघानं शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा ३४ षटकांत ४ गडी बाद १२३ धावा केल्या आहेत. 

****

चार मैदानी खेळाडू आणि एक गोलरक्षक असलेल्या फेडरेशन इंटरनॅशनल हॉकी- फाईव्ह महिला विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा सामना नामिबिया संघाशी आज दुपारी अडीच वाजता होणार आहे. काल रात्री ओमानमधील मस्कत इथं झालेल्या दुसऱ्या सामन्यात यूएसएचा सात-तीन असा पराभव करत भारतीय महिला संघानं विजय नोंदवला. भारताकडून महिमा चौधरी, मारियाना कुजूर, दीपिका सोरेंग, मुमताज खान आणि अजमिना कुजूर यांनी गोल केले.

****

No comments: