Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 26 January
2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २६ जानेवारी २०२४
सायंकाळी ६.१०
****
· देशाचा ७५ वा प्रजासत्ताक दिन सर्वत्र उत्साहात साजरा
· मराठवाड्यात सांस्कृतिक तसंच सामाजिक उपक्रमांमध्ये नागरिकांचा सहभाग
· मराठा आरक्षणासंदर्भात मान्य मागण्यांच्या अध्यादेशाची प्रत द्यावी-मनोज जरांगे
पाटील
आणि
· छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभाचं राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन
****
देशाचा ७५ वा प्रजासत्ताक दिन आज सर्वत्र
उत्साहात साजरा होत आहे. नवी दिल्लीत कर्तव्य पथावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या
हस्ते मुख्य ध्वजारोहण झालं. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रॉ या कार्यक्रमाला
प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री आणि देशभरातून आलेले निमंत्रित यावेळी उपस्थित
होते. प्रजासत्ताक दिनानिमित्त झालेल्या पथसंचलनात देशाचं सांस्कृतिक वैविध्य, सामाजिक
ऐक्य तसंच सामरिक कौशल्याचं दर्शन झालं. यंदाचं पथसंचलन महिला केंद्रीत होतं. प्रत्येक
क्षेत्रात महिलांचं योगदान यावेळी दाखवण्यात आलं. महाराष्ट्राच्या चित्ररथावर राजमाता
जिजाऊ आणि बालशिवाजी यांच्यासह छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळ्याचं शिल्प
लक्षवेधी ठरलं. पायदळ,
नौदल आणि हवाई दलाची चित्तथरारक प्रात्यक्षिकं देखील यावेळी
सादर करण्यात आली.
****
मुंबईत शिवाजी पार्क इथं राज्यपाल रमेश बैस
यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुंबईचे
पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई पोलीस दल आणि तिन्ही सेना दलांचे वरिष्ठ
अधिकारी, विविध देशांचे राजनैतिक अधिकारी यावेळी उपस्थित होते. राज्यपालांनी यावेळी केलेल्या
भाषणात, बलशाली महाराष्ट्र घडवण्याच्या दृष्टीनं संकल्प करण्याचं आवाहन नागरिकांना केलं.
****
मराठवाड्यात ध्वजारोहणासह सांस्कृतिक आणि
सामाजिक उपक्रमातून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. छत्रपती संभाजीनगर इथं मुंबई
उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात मुख्य प्रशासकीय न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या
हस्ते, तर छत्रपती संभाजीनगर इथं पोलिस आयुक्तालयात देवगिरी मैदानावर पालकमंत्री संदिपान
भुमरे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजवंदन झालं. यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी पर्यटन
विकासातून रोजगार निर्मिती होत असल्याचं सांगितलं.
जिल्ह्यातील पर्यटनाचा विकास
करून रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत. त्याचसोबत जिल्ह्यात पैठण येथे संत ज्ञानेश्वर
उद्यान विकास तीर्थक्षेत्र विकासासाठी वेरूळ-घृष्णेश्वर विकास आराखड्यास शासनाने मंजुरी
दिली आहे. चिकलठाणा आणि वाळूज औद्योगिक वसाहतीत अमृत उद्योग योजनेअंतर्गत लघु व सूक्ष्म
उद्योगासाठी अठरा कोटी पंधरा लक्ष रूपये खर्च करून दोनशे स्क्वेअर फुटाचे बांधीव गाळे
बांधकाम करण्यात येत आहे. संविधानाचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. ही जबाबदारी
आपण साऱ्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावून पार पाडायची आहे. चला आपण आपली लोकशाही बळकट
करण्याची शपथ घेऊ या.
धाराशिव इथं पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या
हस्ते ध्वजारोहण झालं. जिल्ह्याच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी
यावेळी केलेल्या भाषणात दिली. राष्ट्रीय मतदार नोंदणी अभियानात उत्कृष्ट कार्य केलेले
तहसीलदार तसंच अधिकारी कर्मचाऱ्यांचा आणि राज्यस्तरावरील उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून
पुरस्कार मिळाल्याबद्दल जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांचा यावेळी गौरव करण्यात
आला.
जालना इथं पालकमंत्री अतुल सावे यांच्या
हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं. विकासाभिमुख जिल्हा म्हणून ओळख असलेला जालना
जिल्हा वेगाने प्रगतीच्या दिशेनं वाटचाल करत असल्याचं सावे यांनी नमूद केलं.
आपला जालना जिल्हा विकासाभिमूख
जिल्हा म्हणून ओळखला जात असला तरी अनेक योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे जिल्हा सतत
अग्रेसर राहीला आहे. जिल्ह्यातून जाणारा समृद्धी महामार्ग, रेल्वे मार्ग, पीट लाईन,
नुकतीच मुंबईसाठी सूरू करण्यात आलेली वंदे भारत रेल्वे, आय टी सी कॉलेज, ड्रायपोर्ट
यामुळे जालना जिल्हा वेगाने प्रगतीच्या दिशेनं वाटचाल करत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या
प्रगतीसाठी शासन सदैव कटीबद्ध आहे.
बीड इथं कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या
हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी मुंडे यांनी पथसंचलनाचं निरीक्षण करून, उल्लेखनीय
कामगिरी केलेले अधिकारी,
तसंच विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
हिंगोली इथं पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या
हस्ते ध्वजारोहण झालं. हिंगोली जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रेत दोन लाखाच्या
वर नागरिक या यात्रेत सहभागी झाल्याचं सत्तार यांनी सांगितलं.
विकसित भारत संकल्प यात्रा
ही विशेष मोहीम २४ नोव्हेंबर ते २६ जानेवारी २०२४ या काळामध्ये राबविण्यात आलेली आहे.
या मोहिमेअंतर्गत ४७५ गावांमध्ये संकल्प यात्रा पोहोचली असून दोन लाख एक हजार सदुसष्ट
नागरिकांनी सहभाग नोंदविलेला आहे.
लातूर इथं क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्या
हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं, उल्लेखनीय सेवा बजावलेले पोलिस अधिकारी तसंच
विविध कर्मचाऱ्यांचा यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. परभणी इथं जिल्हाधिकारी
रघुनाथ गावडे यांच्या हस्ते, नांदेड इथं जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या
हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.
छत्रपती संभाजीनगर इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर
मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉ विजय फुलारी यांच्या हस्ते, नांदेडच्या
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात प्रकुलगुरू डॉ माधुरी देशपांडे यांच्या
हस्ते तर परभणी इथं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात कुलगुरू डॉ इंद्रमणी यांच्या
हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.
****
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला
३५० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या संकल्पनेनं ३५०
किल्ल्यावर भगवा ध्वज आणि तिरंगा ध्वज फडकवण्यात आला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात
देवगिरी, वेताळवाडी,
भांगसीगड, तसंच अंतूर किल्ला, नांदेड
जिल्ह्यात नंदगिरी,
तसंच कंधार, बीड जिल्ह्यात धारूर तसंच जालना
जिल्ह्यात रोहिलागडावर ध्वजारोहण करण्यात आलं.
विभागात रक्तदान शिबीरासह अनेक विध सामाजिक
उपक्रमातून प्रजासत्ताक दिन साजरा झाला.
****
मराठा आरक्षणासंदर्भात मान्य झालेल्या मागण्यांसदर्भात
अध्यादेश काढून त्याची प्रत द्यावी, अशी मागणी आंदोलनकर्ते मनोज
जरांगे पाटील यांनी राज्य सरकारकडे केली आहे. नवी मुंबईत वाशी इथल्या छत्रपती शिवाजी
महाराज चौकात घेतलेल्या जाहीर सभेत जरांगे पाटील बोलत होते. शंभर टक्के मराठा आरक्षणाचा
निर्णय होईपर्यंत मराठा समाजाच्या मुलांना सर्व क्षेत्रातलं शिक्षण मोफत करावं, सरकारी
नोकरभरतीत मराठा समाजाच्या जागा राखून ठेवाव्यात, आंतरवालीसह सर्व महाराष्ट्रात
मराठा आंदोलकांविरोधात दाखल गुन्हे मागे घ्यावेत, आदी मागण्या जरांगे यांनी
केल्या आहेत. याबाबतचा अध्यादेश उद्या दुपारी १२ वाजेपर्यंत मिळाला नाहीतर आपण मुंबईत
जाणारच असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे.
****
मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातल्या सर्वेक्षणात
येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करण्याची सूचना मागासवर्ग आयोगाचे सदस्य डॉ.गोविंद काळे
यांनी प्रशासनाला केली आहे. ते आज लातूर इथं जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत
ते बोलत होते. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी
अधिकारी अनमोल सागर,
जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, यांच्यासह
अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
****
हैद्राबाद इथं सुरु असलेल्या भारत आणि इंग्लंड
संघादरम्यानच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यांत आजच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला
तेंव्हा भारतीय संघाने ७ गड्यांच्या मोबदल्यात चारशे २१ धावा केल्या आहेत. आपल्या पहिल्या
डावात भारताने एकशे ७५ धावांची आघाडी घेतली असून, रविंद्र जडेजा ८१ आणि
अक्षर पटेल ३५ धावांवर नाबाद आहेत.
****
मुंबईच्या जांभोरी इथं छत्रपती शिवाजी महाराज
पारंपरिक क्रीडा महाकुंभाचं राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,
कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, पालकमंत्री
दीपक केसरकर यावेळी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील मर्दानी आणि
पारंपरिक खेळाचं पहिल्यांदाच आयोजन होत असून, यापुढच्या काळात प्रत्येक जिल्ह्यात
अशा पद्धतीच्या खेळांचं आयोजन राज्य शासनाच्या वतीने करण्यात येईल, असं
मुख्यमंत्री म्हणाले.
****
अंबाजोगाई इथले डॉ महेश दत्तात्रय अकोलकर
यांना केंद्र सरकार अधिनस्त राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टीलायझर्स लिमिटेडच्या वतीने
प्रगतीशील शेतकरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं
आहे. उत्पादन वाढीसाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केल्याबद्दल तसेच शाश्वत शेतीसाठी
करत असलेल्या कार्याबद्दल महेश अकोलकर यांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.
****
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने उपलब्ध केलेल्या
‘हिरकणी हाट उपक्रमांमुळे मुळे महिला बचतगटांची उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहचण्यास
मदत होणार असून,
प्रत्येक महिन्याला तालुकास्तरावरही असे उपक्रम होणे आवश्यक
असल्याचं मत,
क्रीडा आणि युवक कल्याणमंत्री संजय बनसोडे यांनी केलं आहे. लातूर
इथं 'हिरकणी हाट'
जिल्हास्तरारीय प्रदर्शन आणि विक्रीच्या उद्घाटनप्रसंगी ते आज
बोलत होते.
****
No comments:
Post a Comment