Wednesday, 31 January 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक:31.01.2024 रोजीचे सकाळी: 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 31 January 2024

Time: 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: ३१ जानेवारी २०२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या 

·      संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात;उद्या अंतरिम अर्थसंकल्प

·      मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणाला दोन दिवस मुदतवाढ

·      २०२३ सालचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना जाहीर

·      छत्रपती संभाजीनगर इथं पतसंस्था घोटाळाप्रकरणी विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा

आणि

·      खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राची आगेकूच कायम

सविस्तर बातम्या

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणानं अधिवेशनाला प्रारंभ होईल. उद्या एक फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतरामन हंगामी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. येत्या नऊ फेब्रुवारीपर्यंत या अधिवेशनाचं कामकाज चालणार आहे. अधिवेशन काळात दोन्ही सभागृहात कामकाज सुरळीत चालावं या दृष्टीनं केंद्र सरकारनं काल सर्वपक्षीय बैठक घेतली. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना, संसदेच्या दोन्ही सदनांचं कामकाज कोणत्याही अडथळ्याविना चालावं यासाठी विरोधी पक्षांनी सहकार्य करावं तसंच सभागृहात फलक आणू नयेत असं आवाहन केलं. काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी या अधिवेशनात बेरोजगारी, महागाई, आदी मुद्दे मांडणार असल्याचं सांगितलं आहे.

****

मागासवर्ग आयोगामार्फत सुरु असलेल्या मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणाला दोन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. ही मुदत आज संपणार होती, मात्र आता परवा दोन फेब्रुवारीपर्यंत हे सर्वेक्षण चालणार आहे. लातूर जिल्ह्यात सर्वेक्षणाचं सुमारे ९७ टक्के काम पूर्ण झालं आहे. या अंतर्गत पाच लाख ८८४ कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आलं आहे. 

****

मराठा समाजाला आरक्षणाबाबत अधिसूचना काढण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत झाला नसल्याने, ओबीसी समाजावर अन्याय झाल्याचा आरोप, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. ते काल मुंबईत ओबीसी संघटनांच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलत होते. या अधिसूचनेच्या विरोधात येत्या २० फेब्रुवारीला छत्रपती संभाजीनगर इथं ओबीसींच्या विराट सभेचं आयोजन करण्यात आल्याचं वडेट्टीवार यांनी सांगितलं. आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही, ही सभा ओबीसींच्या संवैधानिक हक्काच्या रक्षणासाठी असल्याचं त्यांनी नमूद केलं.

****

दरम्यान, मराठा आरक्षणाबाबत सरकारने आश्वासनांची पूर्तता न केल्यास १० फेब्रुवारी पासून आमरण उपोषणाचा इशारा, या आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. काल किल्ले रायगड इथं छत्रपती शिवरायांच्या समाधीचं दर्शन घेतल्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पंधरा दिवसात अधिवेशन घेऊन अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर करावं अशी मागणी ही जरांगे यांनी केली.

****

महाराष्ट्रातल्या ११ आणि तामिळनाडूच्या जिंजी किल्ल्याला युनेस्कोच्या २०२४-२५ जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये नामांकनासाठी केंद्र सरकारनं प्रस्ताव पाठवला आहे. या किल्ल्यांचं ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता, त्यावर अंतिम मोहोरही उमटेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

****

आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या घटकांना बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार देण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी काल ही माहिती दिली. दरवर्षी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी हे पुरस्कार वितरित करण्यात येणार आहेत.

****

२०२३ सालचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना जाहीर झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल ही घोषणा केली. मुख्यमंत्र्यांनी अशोक सराफ यांच्याशी संपर्क साधून त्यांचं अभिनंदनही केलं. अशोक सराफ यांनी आपल्या अभिनयातून विविध छटांचं दर्शन घडवलं आणि रसिकांवर अधिराज्य गाजवलं, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

****

वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश केला असल्याचं, महाविकास आघाडीनं जाहीर केलं. मुंबईत काल झालेल्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी उपस्थित राहिले. या पक्षानं आघाडीत सामील व्हावं, याबाबत शिवसेना, काँग्रेस, आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचं एकमत झालं, असं महाविकास आघाडीनं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

****

या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत

****

छत्रपती संभाजीनगर शहर आणि जिल्ह्यातल्या १५ पतसंस्था आणि बँकेत झालेल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी, ठेवीदार कृती समितीच्या वतीनं काल विभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या आंदोलकांना विभागीय आयुक्त कार्यालयाच्या परिसरात येण्यापासून रोखण्यासाठी अश्रुधुराचा वापर करण्यात आला, मात्र आंदोलकांनी आयुक्तालयाच्या प्रांगणात प्रवेश करून पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन केलं. खासदार सय्यद इम्तियाज जलील यांनी या मोर्चाचं नेतृत्व करत केलं. विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड यांनी निवेदन स्वीकारल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं. विविध बँकेचे तसंच पतसंस्थेचे ठेवीदार या आंदोलनात सहभागी झाले होते.

****

अटल भूजल योजनेंतर्गत भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेत, लातूर तसंच धाराशिव जिल्ह्यातले ग्रामपंचायत पुरस्कार जाहीर झाले. प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या ग्रामपंचायतीला ५० लाख रुपये, द्वितीय क्रमांकाला ३० लाख तर तृतीय क्रमांकासाठी २० लाख रूपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.

****

बीड जिल्ह्यातल्या परळी शहराजवळ वाघबेट इथं वीजवाहक तारांशी संपर्क झाल्यामुळे दोन मजुरांचा मृत्यू झाला, काल दुपारी ही दुर्घटना घडली. हे मजूर ओडिसा राज्यातले असून गोविंदा धवन सिंग आणि संदीप डाक्टर अशी मृत मजुरांची नावं आहेत. बोअरवेल खोदण्यासाठी आलेल्या गाडीचा वीज वाहक तारांशी संपर्क आला आणि वीजेचा प्रवाह गाडीत उतरल्यामुळे ही दुर्घटना घडली.

****

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंतर्गत निपुण भारत या उपक्रमाच्या अनुषंगाने धाराशिव जिल्ह्याच्या तुळजापूर तालुक्यात काटगाव, इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत, लोकसहभागातून समृद्ध ग्रंथालय सुरू करण्यात आलं आहे. गावकऱ्यांनी जवळपास एक लाख रुपयांची पुस्तकं या वाचनालयासाठी दिली आहेत. गावातल्या सर्व मंदिरांमधून संध्याकाळच्या वेळी भोंग्याद्वारे विद्यार्थ्यांना अभ्यासाला बसण्याची सूचनाही करण्यात येते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासात सुधारणा होत असल्याची भावना लक्ष्मी सोनटक्के या पालक महिलेनं व्यक्त केली.

आमच्या गावामध्ये सहा वाजता भोंगा वाजतो अभ्यासाचा. मुलं वाटच बघत बसतात सहा कधी वाजतात, भोंगा कधी वाजतो, कधी अभ्यासाला बसायचं म्हणून वाट बघत बसतात. आता प्राथमिक शाळेतली मुलं अभ्यासाला बसतात तर माझ्या घरामध्ये लहान मुलं सुद्धा आहेत, ती सुद्धा दादा बसला की आम्हीपण बसणार असं सांगतात. आणि घरामध्ये खूपच चांगल्या प्रकारे शैक्षणिक वातावरण निर्माण झाले आहे.

****

चेन्नई इथं सुरु असलेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत, महाराष्ट्राच्या खेळाडूंची आगेकूच सुरू आहे. बॅडमिंटन मध्ये मुलींच्या दुहेरी गटात श्रावणी वाळेकर आणि तारिणी सुरी यांनी सुवर्ण पदक जिंकलं. तर खो-खो मध्ये मुलांच्या आणि मुलींच्या संघानं एकतर्फी विजेतेपद पटकावलं. तीरंदाजी मध्ये आदिती गोपीचंद स्वामी हिनं सुवर्णपदक पटकावलं. या स्पर्धेत महाराष्ट्राचा संघ ५३ सुवर्णांसह एकूण १५० पदकं जिंकून पहिल्या क्रमांकावर आहे. केंद्रीय क्रीडा अनुरागसिंह ठाकूर यांच्या उपस्थितीत आज या स्पर्धेचा समारोप होणार आहे.

****

दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या १९ वर्षाखालील एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत काल भारताने न्यूझीलंडचा २१४ धावांनी पराभव केला. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत २९६ धावा केल्या, मात्र न्यूझीलंडचा संघ २९व्या षटकात ८१ धावातच सर्वबाद झाला. भारताच्या मुशीर खाननं १३१ धावा केल्या.

****

नांदेड इथं जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या वतीने दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीच्या क्रीडा स्पर्धांचं उद्घाटन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते काल झालं. या क्रीडा स्पर्धेत जिल्ह्यातले एकशे छप्पन्न मुकबधीर विद्यार्थी, दोनशे वीस अस्थिव्यंग, एकशे पंचेचाळीस अंध, नव्वद मतिमंद अश्या एकूण सहाशे अकरा विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे.

****

परभणी इथं जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी कार्यालयाच्या बालमहोत्सवाचं उद्घाटन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते काल करण्यात आलं. या बालमहोत्सवात ८ मैदानी स्पर्धांसह बुद्धीबळ, वक्तृत्व, यासारख्या स्पर्धाही घेण्यात आल्या. या बालमहोत्सवात जिल्ह्यातले जवळपास दीड हजार विद्यार्थी सहभागी झाले आहेत. आज गीतगायन, नृत्य, अश्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी या महोत्सवाचा समारोप होणार आहे.

****

राज्यात स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान अंतर्गत १३ फेब्रुवारीपर्यंत आरोग्य शिक्षणाचे विविध कार्यक्रम राबवण्यास कालपासून प्रारंभ झाला. कलंक कुष्ठरोगाचा मिटवूया, सन्मानाने स्विकार करूया हे या वर्षीचं घोषवाक्य आहे. याअंतर्गत काल हिंगोली इथं स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान प्रभातफेरी काढण्यात आली. वैद्यकीय अभ्यासक्रमाचे विद्यार्थी यात मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.

****


पंतप्रधान ग्रामीण आवास योजनेअंतर्गत इतर मागास प्रवर्गातल्या लाभार्थ्‍यासाठी लातूर जिल्ह्यात १०० टक्के मंजुरी देण्‍यात आली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी ही माहिती दिली. अशी मंजुरी देणारा लातूर हा राज्यातला दुसराच जिल्हा असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

छत्रपती संभाजीनगर इथले प्रसिद्ध चित्रकार विजय कुलकर्णी यांचं पुण्यात अल्पशा आजारानं निधन झालं. म्यूरल पेंटिंग, अमूर्त चित्रशैली आणि अजिंठा चित्रांसाठी ते प्रख्यात होते. त्यांनी १९८२ मध्ये वेरूळ इथे 'रॉक आर्ट गॅलरी' सुरू केली आणि अजिंठा चित्रांसाठी आपलं आयुष्य वाहून घेतलं. कुलकर्णी यांच्या पार्थिव देहावर काल सकाळी पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले.

****

No comments: