आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
३१ जानेवारी २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु झालं. दोन्ही सदनांच्या सदस्यांसमोर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं अभिभाषण सुरु आहे.
दरम्यान, संसद भवन परिसरात आज वार्ताहरांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, संसदेचं कामकाज सुरळीत चालण्याची अपेक्षा व्यक्त केली. गेल्या अधिवेशनात नारी शक्ति वंदन विधेयक पारित झाल्याचा त्यांनी यावेळी उल्लेख केला.
****
मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेच्या मसुद्याला ओबीसी संघटनांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. सागेसोयरे आणि गणगोत यांच्यासाठी प्रतिज्ञापत्राद्वारे कुणबी दाखले देण्याबाबतच्या मसुद्याला ओबीसी संघटनांनी विरोध केला आहे. संविधानाच्या विरोधात जाऊन सगेसोयरे यांची व्याख्या बदलण्यात येऊ नये, अशी भूमिका, या याचिकेत मांडण्यात आली आहे. ओबीसी वेलफेयर फौंडेशन तर्फे ही याचिका दाखल केली आहे.
****
सांगली जिल्ह्यातल्या विटा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचं आज अल्पशा आजाराने निधन झालं, ते ७३ वर्षांचे होते. टेंभू योजनेचं पाणी दुष्काळी आटपाडी तालुक्याला मिळवण्यात बाबर यांचा मोठा वाटा आहे. दुष्काळी भागातल्या प्रश्नांच्यासाठी आक्रमकपणे लढा देणारा नेता अशी बाबर यांची ओळख होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाबर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या श्री गजानन महाराज मंदिराचे संस्थापक अध्यक्ष श्रीधर वक्ते यांचं आज पहाटे निधन झालं. त्यांच्या पार्थिवावर आज पैठण इथं अंत्यसंस्कार होणार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातले प्राध्यापक आणि पैठणच्या संतपीठाचे संचालक डॉ. प्रविण वक्ते यांचे ते वडील होत.
****
छत्तीसगडमधल्या सुकमा इथं काल नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत तीन सैनिक हुतात्मा झाले असून, १४ सैनिक जखमी झाले. जखमी जवानांवर रायपूर इथं उपचार सुरु आहेत.
****
मुंबई महानगरपालिकेतल्या कोरोना काळातल्या कथित खरेदी घोटाळ्याबाबत माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची काल सक्तवसुली संचालनालयानं सहा तास चौकशी केली. चौकशीदरम्यान ईडीला हवी असलेली कागदपत्र आपण देणार असल्याचं पेडणेकर यांनी सांगितलं.
****
No comments:
Post a Comment