Thursday, 25 January 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक:25.01.2024 रोजीचे सकाळी: 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 25 January 2024

Time: 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २५ जानेवारी २०२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या 

·      प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींचं आज राष्ट्राला संबोधन

·      मराठा आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन करण्याच्या भूमिकेचा मनोज जरांगे यांनी फेरविचार करण्याचं राज्य सरकारचं आवाहन

·      आरक्षण आंदोलनामुळे जनजीवन विस्कळीत होणार नाही याची सरकारनं काळजी घेण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

·      छत्रपती संभाजीनगर महापालिका क्षेत्रात विकसित भारत संकल्प यात्रेचा समारोप

आणि

·      खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत २५ सुवर्णांसह महाराष्ट्राचं पहिलं स्थान कायम

सविस्तर बातम्या

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्राला संबोधित करणार आहेत. सायंकाळी सात वाजता आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून प्रथम हिंदीत आणि त्यानंतर इंग्रजीत राष्ट्रपतींचं भाषण प्रसारित होईल. रात्री साडे नऊ वाजता राष्ट्रपतींच्या संबोधनाचा मराठी अनुवाद प्रसारित केला जाणार आहे.

****

यंदाचा ७५ वा प्रजासत्ताक दिन विशेष असून यादिवशीचं पथसंचलन नारी शक्तिला समर्पित असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त काल नवी दिल्ली इथं चित्ररथातले कलाकार, राष्ट्रीय छात्र सेना - एनसीसी तसंच राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांची, पंतप्रधानांनी आपल्या निवासस्थानी भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

दरम्यान, परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात पंतप्रधान येत्या २९ जानेवारीला विद्यार्थ्याशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाच्या सातव्या भागासाठी माय जीओव्ही पोर्टलवर आतापर्यंत २ कोटी २६ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

****

कोळशापासून इंधन वायू तयार करण्याचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजूर केला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी काल नवी दिल्लीत मंत्रिमंडळ बैठकीनंतर प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली. कोळशापासून वीजनिर्मिती करताना मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होतं, ते टाळण्यासाठी गॅसनिर्मितीचा पर्याय निवडण्यात आला आहे. यासाठी साडे आठ हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात येणार असून, २०३० पर्यंत १० कोटी टन कोळशापासून गॅस निर्मिती होईल अशी अपेक्षा आहे.

****

मराठा आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन करण्याच्या आपल्या भूमिकेचा मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाज बांधवांनी फेरविचार करावा, असं आवाहन राज्य सरकारनं केलं आहे. याबाबत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी काल एक पत्रक जारी केलं. मराठवाड्यातल्या मराठा बांधवांना कुणबी जातीची प्रमाणपत्रं मिळावित या मागणीला सरकारनं सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. पुढच्या महिन्यात एकदिवसीय विशेष अधिवेशन बोलावून मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढण्याची सरकारची पूर्ण तयारी असल्याचं, या पत्रात म्हटलं आहे.

****

दरम्यान, मराठा आरक्षण आंदोलनामुळे जनजीवन विस्कळीत होणार नाही याची सरकारनं काळजी घ्यावी, असे आदेश, मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. तर मनोज जरांगे यांना न्यायालयात हजर राहण्याबाबत नोटीस बजावण्याचे निर्देश आझाद मैदान पोलिसांना दिले आहेत. उद्यापासून मनोज जरांगे मुंबईत आंदोलन करणार आहेत. हा मोर्चा रोखण्याचे आदेश न्यायालयाने द्यावेत, अशी याचिका विधीज्ञ गुणरत्न सदावर्ते यांनी उच्च न्यायालयात दाखल केली होती, त्यावरील सुनावणीत न्यायालयानं हे आदेश दिले. यावरील पुढील सुनावणी दोन आठवड्यांनी होणार आहे.

दरम्यान, काल जरांगे यांची पदयात्रा लोणावळ्याला मुक्काम करुन आज दुपारपर्यंत पनवेलला पोहोचणार आहे. त्यानंतर हे आंदोलक उद्या २६ जानेवारी रोजी मुंबईत दाखल होतील.

****

जलयुक्त शिवार अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यातली कामं तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. मुंबईत यासंदर्भात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. लातूर, भंडारा, सोलापूर, सांगली, पुणे या पाच जिल्ह्यात उद्दिष्टापेक्षा वेगाने प्रगती झाली आहे. इतर जिल्ह्यांनीही कामं अधिक वेगाने करण्याची सूचना फडणवीस यांनी केली.

दरम्यान, अन्य एका बैठकीत बोलताना फडणवीस यांनी, राज्यातल्या विमानतळांची विकासकामं कालबद्धरित्या पूर्ण करण्याचे निर्देश दिले. छत्रपती संभाजीनगर विमानतळ विस्तारीकरणासाठी आधी जमीन अधिग्रहित करावी, त्यासाठी ६०० कोटी रुपये लागणार असल्याची माहिती त्यांनी दिली. जळगाव, नांदेड, धाराशिव, लातूर, आदी विमानतळ कामांचाही यावेळी आढावा घेण्यात आला.

****

इसिस या अतिरेकी संघटनेला निधी पुरवत असल्याच्या संशयावरुन नाशिकमध्ये एका तरुणाला मंगळवारी अटक करण्यात आली. अब्दुल अजीज शेख असं त्याचं नाव असून, हा तरुण अभियंता इसिसच्या मृत सदस्यांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत करत असल्याची माहिती दहशतवादी पथकाला मिळाली, त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आलं.

****

कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आज ते या पदाची शपथ घेणार आहेत.

****


 राज्य शिक्षण मंडळाच्या फेब्रुवारी- मार्च २०२४ मध्ये होणाऱ्या दहावी- बारावी परीक्षेत परीक्षार्थींना प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी दहा मिनिटे वेळ वाढवून मिळणार आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी काल ही माहिती दिली. गेल्या वर्षी देखील या परिक्षेत विद्यार्थ्यांना दहा मिनिटे वेळ वाढवून दिला होता.

****

२०२३-२४ मध्ये नांदेड जिल्ह्यात युवा मतदार नाव नोंदणी अभियान यशस्वीपणे राबवल्याबद्दल जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना छत्रपती संभाजीनगर विभागातून उत्कृष्ट मतदार जागृती पुरस्कार देण्यात आला. काल मुंबईत झालेल्या सोहळ्यात राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या हस्ते राऊत यांना गौरवण्यात आलं.

****

छत्रपती संभाजीनगर महापालिका क्षेत्रात विकसित भारत संकल्प यात्रेचा काल समारोप झाला. ५३ दिवस चाललेल्या या यात्रेत १०४ ठिकाणी जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आले. या यात्रेत १२ हजार ८४३ जणांनी आयुष्यमान भारत कार्डसाठी, १२ हजार ७०८ जणांनी स्वनिधी योजनेसाठी, तर दोन हजारावर महिलांनी उज्ज्वला गॅससाठी नावनोंदणी केल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली. या यात्रेत मेरी कहानी मेरी जुबानी अंतर्गत परभणीचे शिवदयाल साळकर यांनी आपला अनुभव या शब्दांत कथन केला.

****

चेन्नई इथं सुरू असलेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्रानं एकूण ७२ पदकं जिंकून पहिलं स्थान कायम ठेवलं आहे. यामध्ये २५ सुवर्ण, २१ रौप्य आणि २६ कांस्य पदकांचा समावेश आहे.

काल या स्पर्धेत कलात्मक जिम्नॅस्टिक्स मध्ये महाराष्ट्राच्या आर्यन दवंडेनं सुवर्ण पदक पटकावलं, वॉल्टींग टेबल प्रकारातही आर्यननं सुवर्ण पदकाला गवसणी घातली, याच प्रकारात महाराष्ट्राच्या सिद्धांत कोंडेला कांस्य पदक मिळालं. मुष्टीयुद्ध स्पर्धेत ५० ते ५२ किलो वजनी गटात पुण्याच्या देविका घोरपडेनं, सायकलिंगमध्ये पुण्याच्याच वेदांत जाधवने सुवर्ण पदक जिंकलं.

****


ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत, भारताच्या रोहन बोपण्णानं पुरुष दुहेरीत उपांत्य फेरीत प्रवेश करुन इतिहास घडवला आहे. वयाच्या ४३ वर्षी उपांत्य फेरीत प्रवेश करणारा तो एकमेव खेळाडू आहे. या बरोबरच अशी कामगिरी करणारा पुरुष दुहेरीतला तो प्रथम मानांकित खेळाडू ठरला आहे.

****

मराठा समाजाचं सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठीच्या काल पहिल्या दिवशी नांदेड शहरात सहा हजार २०० कुटुंबांचं सर्वेक्षण करण्यात आलं. शहरातल्या ९६ हजार मालमत्तांधारकांचं याअंतर्गत सर्वेक्षण करण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात तीन हजार १४८ घरांचं सर्वेक्षण पूर्ण झाल्याचं, महापालिकेकडून सांगण्यात आलं.

****

बीड जिल्ह्यात गेल्या ऑक्टोबर ते डिसेंबर अखेरपर्यंत तीन महिन्यात चौदाशे पेक्षा अधिक बाल विवाह प्रकरण उघडकीस आले आहेत. बालविवाह निर्मूलन जिल्हा कृती दलाने जलद गतीने प्रकरणांचा निपटारा करावा, तसंच बालविवाह रोखण्यासाठी यंत्रणेने कठोर भूमिका घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी दिले आहेत.

****

अटल भूजल योजनेंतर्गत भूजल समृद्ध ग्रामस्पर्धेत धाराशिव जिल्ह्यातल्या खेड ग्रामपंचायतीला जिल्हास्तरावरील प्रथम, खामसवाडीला द्वितीय आणि भगतवाडी ग्रामपंचायतींला तृतीय पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार प्राप्त गावांना जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांच्या हस्ते उद्या प्रजासत्ताक दिनी सन्मानित करण्यात येणार आहे.

****

हिंगोली इथं आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांनी काल आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं. आंदोलक महिलांनी रास्ता रोको केल्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन सोडून दिलं. नांदेड इथंही आशा आणि गटप्रवर्तकानी काल धरणे आंदोलन केलं.

****


बीड जिल्ह्यात माजलगाव इथल्या उपविभागीय अधिकारी कार्यालयातला कारकुन वैभव जाधव याला बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं तीस हजार रुपयांची लाच घेताना काल ताब्यात घेतलं. जात प्रमाणपत्र देण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती.

****

श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपारिक क्रीडा महाकुंभ उद्या २६ जानेवारीपासून मुंबईत सुरु होणार आहे. राज्यभरातून जवळपास सव्वा लाख खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. स्पर्धेच्या अनुषंगाने उद्घाटन प्रसंगी राज्यातल्या २७ किल्ल्यांचं प्रदर्शन उभारलं जाणार आहे, त्याचसोबत दांडपट्टा, लाठीकाठी या सारख्या शिवकालीन युद्धकलांची प्रात्यक्षिकं सुद्धा सादर केली जाणार आहेत.

****

शाकंभरी पौर्णिमेनिमित्त बीड शहरातल्या चौंडेश्वरी देवीच्या मंदिरात सुरू असलेल्या उत्सवाचा आज शोभयात्रेने समारोप होणार आहे..

****

No comments: