आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
२७ जानेवारी २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
राज्य सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्यानंतर आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आज नवी मुंबईत वाशी इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उपोषण सोडलं. ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यावेळी उपस्थित होते. सरकारने मागण्या मान्य करणारा जारी केलेला अध्यादेश यावेळी मुख्यमंत्र्यांनी जरांगे यांना सुपुर्द केला.
सरकारने जारी केलेल्या अध्यादेशात कुणबी नोंदी सापडलेल्यांच्या सगेसोयऱ्यांना देखील कुणबी प्रमाणपत्र देणार असल्याचं म्हटलं आहे. याशिवाय राज्यभरात सापडलेल्या ५७ लाख कुणबी नोंदीपैकी जात प्रमाणपत्र मिळालेल्या नागरीकांची माहिती जारी करण्याचा, तसंच शिंदे समितीची मुदत वाढवण्याचा निर्णय देखील घेतल्याचं या अध्यादेशात म्हटलं आहे.
****
८४ व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी संमेलनाचं उद्घाटन, आज मुंबईत लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते होणार आहे. लोकांचा लोकशाही संस्थांवरचा विश्वास आणखी वृध्दिंगत करण्यासाठीच्या प्रयत्नांवर या संमेलनात चर्चा होईल. या संमेलनात विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या विधीमंडळांचे पीठासीन अधिकारी सहभागी होणार असून, समारोप सत्राला उपराष्ट्रपती जगदीप धनखड मार्गदर्शन करणार आहेत.
****
संयुक्त राष्ट्र सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष डेनिस फ्रान्सिस यांनी काल मुंबईत राज्यपाल रमेश बैस तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मुंबईत ज्या झपाट्याने पायाभूत सुविधा, गृहनिर्माण यांचा विकास सुरु आहे तो चकित करणारा आहे, असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. पर्यावरणपूरक विकास, महिला सक्षमीकरण यासंबंधी राज्यात सुरु असलेल्या प्रयत्नांची मुख्यमंत्र्यांनी त्यांना माहिती दिली.
****
३७ व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेची काल सांगता झाली. नांदेड जिल्ह्याच्या अर्धापूर तालुक्यात झालेल्या या दोन दिवसीय परिषदेत विविध २६ ठराव संमत करण्यात आले.
****
सांगली इथं महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्यावतीने राज्यस्तरीय कामगार केसरी आणि कुमार केसरी कुस्ती स्पर्धांचं उद्घाटन काल पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते झालं. या स्पर्धेत २३७ खेळाडूंनी सहभाग घेतला आहे.
****
No comments:
Post a Comment