Regional Marathi Text
Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 29 January
2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २९ जानेवारी २०२४
सायंकाळी ६.१०
****
·
स्पर्धा स्वत:शी करावी आणि
प्रतिभावंतांकडून प्रेरणा घ्यावी-परीक्षा पे चर्चा संवादातून पंतप्रधानांचा सल्ला.
·
स्टुडंटस् इस्लामिक मुव्हमेंट आँफ इंडिया -सिमी संघटनेवर पाच वर्षांसाठी बंदी.
·
राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी निर्णय देण्यास विधानसभाध्यक्षांना
१५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ.
आणि
·
मराठा आरक्षणासंदर्भात छत्रपती संभाजीनगर शहरातल्या सव्वा लाखावर
घरांचं सर्वेक्षण पूर्ण.
****
स्पर्धा स्वत:शी करावी आणि प्रतिभावंतांकडून प्रेरणा घ्यावी, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना दिला आहे. परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमातून पंतप्रधानांनी आज विद्यार्थी, शिक्षक
आणि पालकांशी संवाद साधला. कुटुंबातच नकळत कधीतरी स्पर्धेची, द्वेषाची बीजं पेरली जातात हे टाळलं पाहिजे, कोणत्याही
गोष्टीचं दडपण घेऊ नये, असं ते म्हणाले. मुलांना प्रोत्साहन देण्यात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असल्याचं सांगतानाच, शिक्षक -विद्यार्थी नातं दृढ असेल, तसंच शिक्षकांनी
विद्यार्थ्यांच्या कुटुंबाशी थेट संवाद जपला, तर तणाव निर्माण
होणार नाही, असं ते म्हणाले. मोबाईल आणि इंटरनेटचा
विवेकी वापर करण्यावर पंतप्रधानांनी भर दिला. पुण्यातले
एक पालक चंद्रेश जैन यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने ते बोलत होते. जैन
यांचा हा प्रश्न आणि त्यावर पंतप्रधानांनी दिलेल्या उत्तराचा हा संक्षिप्त अंश..
मेरा नाम चंद्रेश जैन हैं। क्या आपको नही लगता हैं, आज कल के बच्चो ने अपने दिमाग का इस्तेमाल करना बंद कर दिया है? वे तकनिक पे अधिक निर्भर रहने लगे हैं। क्योंकी सब कुछ उंगलीयोपर उपलब्ध है। कोई इस युवा पिढी कों,
कैसे जागृत कर सकता हैं, कि उसे प्रौद्योगिकी का स्वामी बनना चाहिए, उसका गुलाम नहीं। कृपया मार्गदर्शन किजिए। मोबाईल के उपर कितनेही चिजे आती हो,
लेकिन कुछ तो समय तय करना पडेगा। आपने देखा होगा,
बहुत रेअर केस में कभी मोबाईल फोन मेरे हात में होता हैं। क्योंकी मुझे मालुम है की, मेरे समय का मुझे सर्वाधिक उपयोग क्या करना है। जब की मैं ये भी मान ता हुँ की,
इम्फरमेशन के लिए मेर लिए, एक बहुत आवश्यक साधन भी हैं। लेकिन उसका कैसा उपयोग करना, कितना करना, उसका मुझे विवेक होना चाहिए।
नवी दिल्लीत भारत मंडपम् इथं झालेल्या
या कार्यक्रमात चार हजाराहून अधिक विद्यार्थी प्रत्यक्ष सहभागी झाले तर देशभरातले सव्वा
दोन लाखावर विद्यार्थी, पालक आणि शिक्षक या कार्यक्रमात दूरदृश्य संवाद यंत्रणेच्या
माध्यमातून सहभागी झाले.
छत्रपती संभाजीनगर शहरातील विविध शाळेतल्या विद्यार्थीविद्यार्थिनींसाठी या कार्यक्रमाचं थेट प्रसारण दाखवण्यात आलं. शिशु विहार शाळेतील मुख्याध्यापक ज्योती टाकळकर यांनी विद्यार्थ्यांसह हा कार्यक्रम बघितला.
परभणी शहरातील
सारंग स्वामी विद्यालय, केंद्रीय विद्यालय आणि नवोदय विद्यालयात परीक्षा
पे चर्चा या कार्यक्रमाचं विद्यार्थ्यांसाठी थेट प्रक्षेपण दाखवण्यात आलं. अनन्या कुलथे या विद्यार्थिनीने आपल्या भावना व्यक्त करताना, पंतप्रधानांनी
केलेल्या मार्गदर्शनाचा परीक्षेला सामोरं जाताना उपयोग करणार असल्याचं सांगितलं. ती
म्हणाली....
आपण कधीही शांतीपूर्ण आणि तणावमुक्त वातारणामध्ये अभ्यास करायला हवा, किंवा आपल्यावरती जेव्हा प्रेशर येते तेव्हा संतुलन ठेवायला हवे.
आपल्या मानसिक आणि शारीरिक विकासासाठी स्वास्थ आणि अभ्यासावरती बॅलेंस बनवून ठेवायला हवं,
ज्यामुळे आपण परीक्षेमध्येही खूप चांगले अंक आणु शकु.
त्यासोबत त्यांनी हे सांगितले. कधीही आपण दुसऱ्यासोबत कम्पेयर करु नये.
याचा अर्थ हा आहे की,
आपण दुसऱ्याशी कम्पेयर करुन आपल्या चुका सुधारु शकत नाही.याचनुसार प्रधानमंत्रीजींनी जे आम्हाला सांगितले. ते मला नक्कीच आवडलं आहे. आणि मी माझ्या अभ्यासामध्ये त्याचा उपयोग सुद्धा करेन.
****
प्रजासत्ताक दिन समारंभाचा सांगता सोहळा
बिटींग द रिट्रीट नवी दिल्लीत कर्तव्य पथावर नुकताच पार पडला. राष्ट्रपती
द्रौपदी मुर्मू यांनी सोहळ्याचं निरीक्षण करून मानवंदना स्वीकारली.
****
स्टुडंटस् इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया अर्थात सिमी या संघटनेवर
केंद्र सरकारनं पुन्हा पाच वर्षांसाठी बंदी घातली आहे. बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक
कायद्यान्वे ही बंदी घालण्यात आल्याचं याबाबतच्या बातमीत म्हटलं आहे.
****
राज्यसभेची मुदत संपलेल्या ५६
जागांसाठी येत्या २७ फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. येत्या १५ एप्रिलला ५६
सदस्यांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे, यामध्ये
महाराष्ट्रातले प्रकाश जावडेकर, नारायण
राणे, व्ही मुरलीधरन, वंदना चव्हाण,
अनिल देसाई आणि कुमार केतकर, या सहा सदस्यांचा
समावेश आहे.
****
सर्वोच्च न्यायालयानं राष्ट्रवादी काँग्रेस आमदारांच्या
अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना निकाल द्यायला १५
फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीत
व्यग्र असल्यानं नार्वेकर
यांनी या सुनावणीसाठी तीन आठवड्यांची मुदतवाढ मागितली होती. मात्र आज झालेल्या
सुनावणीत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं दोन
आठवड्यांची मुदतवाढ दिली. याप्रकरणी ३१ जानेवारीपर्यंत सुनावणी पूर्ण होणार आहे.
****
महाराष्ट्र शासन आणि हायड्रोजन उर्जा निर्मिती करणाऱ्या विकासकांमध्ये आज
मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख
उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आले. दोन लाख ७६ हजार ७०० कोटी रुपयांच्या या करारांमुळे सुमारे ६६ हजार लोकांना
रोजगार उपलब्ध होणार आहे.
****
‘विदर्भात खारे आणि गोडे अशा दोन्ही स्वरूपाचे जलाशय असल्यानं इथं
मत्स्योत्पादनाला मोठी संधी असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं
आहे. नागपूर इथं खासदार औद्योगिक महोत्सव-अॅडव्हांटेज विदर्भ या कार्यक्रमात ते आज
बोलत होते. मत्स्योत्पादक प्रभाकर मांढरे यांनी यावेळी बोलताना, ४० ते ५० वर्षे जुन्या तलावांची स्वच्छता करण्याची
आवश्यकता व्यक्त केली
****
आरोग्य सेवांच्या बळकटीकरणासाठी राज्यात
‘वात्सल्य’ या नवीन उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी आज
मुंबईत ही माहिती दिली. या उपक्रमात गर्भधारणेपूर्वी जननक्षम
माता, प्रसुतीपश्चात माता तसंच दोन वर्षापर्यंतच्या बालकांसाठी
आरोग्यसेवा दिल्या जातात.
****
विधान परिषदेतील विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांच्या प्रमुख
उपस्थितीत आज धुळे इथं जनता दरबार घेण्यात आला. यावेळी उपस्थितांपैकी अनेकांनी
विविध प्रश्न मांडले. यावेळी दानवे यांनी बहुतांश तक्रारींची तत्काळ दखल घेत
संबंधीत विभागाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून आवश्यक निर्देश
दिल्याचं वृत्त आहे.
****
मराठा
समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात सुरू असलेल्या सर्वेक्षणांतर्गत छत्रपती संभाजीनगर
महापालिकेअंतर्गत आतापर्यंत एक लाख २५ हजार ४४० घरांचं सर्वेक्षण पूर्ण झालं आहे. महापालिकेकडून ही माहिती
देण्यात आली. दरम्यान, हे सर्वेक्षण ३१ जानेवारीच्या आत पूर्ण करण्याचे निर्देश
राज्य मागासवर्गीय आयोगाचे सदस्य गजानन खराटे यांनी दिले आहेत. त्यांनी आज छत्रपती संभाजी नगर इथं विभागीय आढावा बैठकीत हे निर्देश दिले. या बैठकीत मागासवर्गीय
आयोगाचे सदस्य डॉ.ओमप्रकाश जाधव, डॉ.प्रा गोविंद काळे, विभागीय आयुक्त मधुकरराजे
आर्दड, यांच्यासह विभागातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी,
तसंच छत्रपती संभाजीनगर, लातूर आणि नांदेड
महापालिकेचे आयुक्त सहभागी
झाले होते.
****
अहमदनगर जिल्ह्यात राहुरी इथल्या महात्मा
फुले कृषि विद्यापीठाचा ३७ वा पदवी प्रदान सोहळा आज पार पडला. राज्यपाल रमेश बैस यांनी या सोहळ्याला
दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून संबोधित केलं. या सोहळ्यात ७३ विद्यार्थ्यांना पीएच. डी., ३०० विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी
तर सहा हजार ५२२ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.
परभणी इथल्या ज्ञानोपासक
महाविद्यालयाचा पाचवा पदवी प्रदान समारंभ आज पार पडला. या कार्यक्रमात १७५
विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
****
नांदेड
जिल्ह्यातील कंधारच्या प्रसिद्ध सुफी संत हजरत हाजी सय्याह सरवरे मगदूम यांच्या
७०९ व्या उर्सला आजपासून प्रारंभ झाला. उर्सनिमित काढण्यात आलेल्या संदल
मिरवणुकीत राज्यातल्या अनेक जिल्ह्यांसह आंध्रप्रदेश आणि तेलंगणातूनही भक्त सहभागी झाले.
****
महाराष्ट्र प्रदेश शिक्षक प्रतिनिधी सभेच्या वतीने लातूरमध्ये नवव्या
राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनाचं उद्घाटन उद्या पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार
आहे. राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री
संजय बनसोडे हे स्वागताध्यक्ष असलेल्या
या तीन दिवसीय संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक, थोर लेखक, सुप्रसिद्ध वक्ते आणि कवी यांना ऐकण्याची संधी मिळणार आहे.
****
नांदेड जिल्ह्यातील लोहा पोलिसांनी काल रात्री उशिरा एका
वाहनातून सव्वा पाच लाख
रुपयांचा बनावट गुटखा आणि सूर्यछाप तंबाखू जप्त केली. यात दोन आरोपींना अटक करुन
गुन्हा दाखल करण्यात आला. लोहा ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी ही माहिती
दिली.
****
सोलापूर शहरातील महावीर चौकात काल मध्यरात्री झालेल्या
अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. इरण्णा मठपती, निखिल कोळी आणि आतिश सोमवंशी
अशी मृतांची नावं आहेत. हे सर्व जुळे सोलापूर भागातील रहिवासी असल्याचं
याबाबतच्या बातमीत म्हटलं आहे.
अहमदनगर - छत्रपती संभाजीनगर
महामार्गावर काल झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातल्या चार जणांचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला आहे.
****
No comments:
Post a Comment