Monday, 29 January 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 29.01.2024 रोजीचे दुपारी: 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 29 January 2024

Time: 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २९ जानेवारी २०२ दुपारी १.०० वा.

****

मुलांचं सामर्थ्य शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. परिक्षा पे चर्चा या कार्यक्रमात आज विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. स्पर्धा मित्रांशी न करता स्वत:शी करावी, प्रतिभावंत मित्रांचा द्वेष करण्यापेक्षा, त्यांच्याकडून प्रेरणा घ्यावी, असा सल्ला त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला. कधीतरी कुटुंबातच नकळत विकृत स्पर्धेची, द्वेषाची बीजं पेरली जातात हे टाळलं पाहिजे, कोणत्याही गोष्टीचं दडपण घेऊ नये, असं ते म्हणाले.

यावेळी पंतप्रधानांनी शिक्षकांशी देखील संवाद साधला, मुलांना प्रोत्साहन देण्यात शिक्षकांची भूमिका महत्वाची असल्याचं ते म्हणाले. शिक्षक -विद्यार्थी नातं पहिल्या दिवसापासून निरंतर दृढ होत गेलं पाहिजे, हे नातं दृढ असेल तर परीक्षेत तणाव निर्माण होणार नाही, शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या कुटुंबाशी थेट संवाद जपला तर तणाव निर्माण होणार नाही, अभ्यासक्रमापलिकडे जाऊन नातं विकसित केलं तर जीवनातल्या अडचणींना मुलांना तुमची आठवण येईल, असं पंतप्रधानांनी शिक्षकांना उद्देशून सांगितलं.

दरम्यान, या कार्यक्रमापूर्वी पंतप्रधानांनी भारत मंडपम इथं प्रदर्शनाची पाहणी केली.

****

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज कोल्हापूर इथं श्री शाहू विजयी गंगावेस तालीमला भेट दिली. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी बांधलेल्या तालमीचं ऐतिहासिक स्वरुप कायम ठेवून ही तालीम देशातली दर्जेदार तालीम बनवणार असून, यासाठी सर्वसमावेशक आराखडा सादर करण्याची सूचना पवार यांनी यावेळी केली. इथल्या मल्लांची आणि वस्तादांची राहण्याची व्यवस्था, भोजन व्यवस्थेसह त्यांनी परिसराची पाहणी केली.

****

मराठी भाषा आजच्या काळातील ज्ञानभाषा म्हणून परिवर्तित  व्हावी, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. नवी मुंबईत वाशी इथं काल मराठी भाषा विभागाच्या वतीनं आयोजित दुसर्या विश्व मराठी  संमेलनात ते बोलत होते. जर्मन, चीन यासारखे देश मातृभाषेचा आग्रह धरतात, त्यांच्या भाषेचा अभिमान बाळगत त्यांच्या देशातले तज्ञ घडवतात. आपल्याकडेही तसं होणं आवश्यक असून, यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज फडणवीस यांनी व्यक्त केली. प्रत्येक जिल्ह्याला मराठी भाषेचं काम करण्यासाठी निधीची तरतूद करून देण्यात येणार असून, त्याचबरोबर विविध उपक्रमांमधून मराठी भाषा संवर्धनाचं जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी यावेळी दिली.

****

नाशिक इथं राज्यस्तरीय नागरी बँक असोसिएशनच्या परिषदेचा समारोप काल केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी सहकार विद्यापीठ स्थापन करण्यासह इतर अनेक ठराव करण्यात आले. या परिषदेत बँकिंग नियम कायदा आणि नागरी सहकारी बँका तसंच नागरी सहकारी बँकांसाठी पालकत्वाची भूमिका अशा विषयांवर परिसंवाद पार पडले.

****

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्यावतीने आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मराठवाडा विभागाची एक दिवसीय आढावा बैठक आज लातूरमध्ये होत आहे.  काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या प्रमुख उपस्थितीत होत असलेल्या या बैठकीला पक्षाचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित आहेत. लोकसभा निवडणुकीत पक्ष बांधणीसाठी ही बैठक असल्याचं कॉंग्रेस पक्षातर्फे सांगण्यात आलं आहे.

****

महाराष्ट्र प्रदेश शिक्षक प्रतिनिधी सभेच्या वतीने लातूरमध्ये नवव्या राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनाचं उद्घाटन उद्या पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते होणार आहे. राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे हे संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी राहणार असल्याची माहिती शिक्षक प्रतिनिधी सभेचे प्रदेशाध्यक्ष तथा संयोजक कालिदास माने यांनी दिली. तीन दिवस चालणार्या या शिक्षक साहित्य संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक, थोर लेखक, सुप्रसिद्ध वक्ते आणि कवी यांचं विवेचन ऐकायला मिळणार आहे.

****

चेन्नईत सुरू असलेल्या खेलो इंडिया स्पर्धेत काल महाराष्ट्र संघानं पदकांचं शतक पूर्ण करत, पदक तालिकेतलं अव्वल स्थान कायम राखलं. महाराष्ट्राने भारोत्तोलन, जलतरण, कुस्ती आणि नेमबाजीत पदकांची लयलूट केली. एकाच दिवसात जलतरण क्रीडा प्रकारात सात पदकं पटकवण्याची ऐतिहासिक कामगिरी राज्याच्या जलतरणपटूंनी केली. जलतरणामध्ये आदिती हेगडे हीने दुहेरी सुवर्णपदक तर रीले प्रकारातही महाराष्ट्राने सुवर्ण कामगिरी केली. कुस्तीमध्ये सुमित भास्कर, नेमबाजीत ईशा टांकसाळे, आणि टेबलटेनिसमध्येही महाराष्ट्र संघाने अंतिम फेरीत धडक मारून पदक निश्चित केलं आहे. भारोत्तोलनात साईराज परदेशीनं राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदकाला गवसणी घातली. मूळच्या मनमाड इथल्या साईराजनं ८१ किलो वजनी गटात हा विक्रम नोंदवला. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघानं आतापर्यंत ३७ सुवर्ण, ३२ रौप्य, आणि ४० पदकांसह एकूण १०९ पदकं जिंकली आहेत.

****

No comments: