Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 31 January
2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३१ जानेवारी २०२४
सायंकाळी ६.१०
****
· अमृत काळातल्या भावी पिढीची स्वप्नं पूर्ण करणं हे आपलं कर्तव्य-अर्थसंकल्पीय
अधिवेशनाच्या अभिभाषणात राष्ट्रपतींचं प्रतिपादन
· मराठा आरक्षण अधिसूचनेच्या मसुद्याला ओबीसी संघटनांकडून न्यायालयात
आव्हान
· वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीच्या तळघरात पूजा आरती करण्यास न्यायालयाकडून
परवानगी
आणि
· खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेचा आज समारोप
****
अमृत काळातल्या भावी पिढीची स्वप्नं पूर्ण करणं हे आपलं कर्तव्य
असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय
अधिवेशनाला आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणानं प्रारंभ झाला, त्यावेळी बोलतांना राष्ट्रपतींनी भावी पिढीने कायम स्मरण करावं,
असं काम करण्याचं आवाहन केलं. त्या म्हणाल्या -
आज जो युवा स्कुल-कॉलेज मे है, उनके सपने बिलकुल अलग है। हम सभी का यह दायित्व है की, अमृत पिढी के सपनों को पुरा करने मे कोई कसर बाकी ना रहे। विकसित भारत हमारी
अमृत पिढी के सपनों को साकार करेगी। इसलिये हम सभी को एक साथ मिलकर संकल्पो की सिद्धी
के लिये जुडना होगा। वर्ष 2047 पर्व देखने के लिये अपने साथ तब इस सदन मे नही होंगे।
लेकिन हमारी विरासत ऐसी होनी चाहिये की तब की पिढी हमे याद रखे।
राष्ट्रपतींनी गेल्या दहा वर्षात केंद्र सरकारनं केलेल्या कामांचा
आढावा घेतला. अयोध्येतल्या राम मंदिराचं अनेक शतकांचं स्वप्न सरकारने यंदा प्रत्यक्षात
साकार केलं, देशाची अर्थव्यवस्था वेगानं विकसित
होत असून, २५ कोटी लोक गरीबीतून बाहेर पडले आहेत, असं त्यांनी यावेळी सांगितलं. थेट परकीय गुंतवणूक दुपटीनं वाढली असून,
देश योग्य दिशेनं प्रगती करत असल्याचं त्या म्हणाल्या. कलम ३७०,
तिहेरी तलाक, भारताचं जी-20 चं अध्यक्षपद, अर्थव्यवस्थेत वृद्धी, कोविड काळातलं व्यवस्थापन, आदी मुद्यांवर राष्ट्रपतींनी
भाष्य केलं. विकसित भारताची भव्य इमारत युवा शक्ती, महिला शक्ती,
शेतकरी आणि गरीब या चार मजबूत स्तंभांवर उभी राहील, असा सरकारला विश्वास असल्याचं, राष्ट्रपती म्हणाल्या.
दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री
निर्मला सीतारामन उद्या अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. येत्या नऊ फेब्रुवारीपर्यंत
या अधिवेशनाचं कामकाज चालणार आहे.
****
यंदाचा अंतरिम अर्थसंकल्प म्हणजे महिला सक्षमीकरणाच्या साक्षात्काराचं
पर्व असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं
आहे. ते आज संसद भवन परिसरात वार्ताहरांशी बोलत होते. अर्थसंकल्पीय अधिवेशन हे सकारात्मक
पाऊलखुणा सोडण्याची संधी असून, सर्व खासदारांनी ही संधी सोडू
नये आणि सर्वोत्तम कामगिरी करावी, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
देशाचा सर्वस्पर्शी विकास होत असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. ते म्हणाले
-
जब चुनाव का समय निकट होता है, तब आम तौर पर पूर्ण बजट नही रखा जाता है। हम भी उसी परंपरा का निर्वाह करते
हुये पूर्ण बजट नई सरकार बनने के बाद हम आपके समक्ष लेकर करके आयेंगे। इस बार एक दिशानिर्देशक
बाके कर ले करके देश की वित्त मंत्री निर्मलाजी हम सब के सामने कल अपना बजट पेश करने
वाली है। मुझे विश्वास है की देश नित्य प्रगती की उंचाईयों को पार करता हुआ आगे बढ
रहा है। सर्वस्पर्शी विकास हो रहा है।
****
लोकसभा आणि राज्यसभेच्या १४ खासदारांचं निलंबन रद्द करण्यात
आलं आहे. मागील अधिवेशन काळात कामकाजात व्यत्यय आणल्या प्रकरणी या खासदारांना निलंबित
करण्यात आलं होतं. सरकारनं केलेल्या विनंतीवरुन राज्यसभेचे सभापती आणि लोकसभेच्या अध्यक्षांनी
हे निलंबन मागे घेतल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली आहे.
****
उत्तरप्रदेशात वाराणसी इथं ज्ञानवापी मशिदीच्या तळघरात हिंदूंना
पूजेची परवानगी न्यायालयानं दिली आहे. आज यासंदर्भात झालेल्या सुनावणीत न्यायालयानं
यासंदर्भात येत्या सात दिवसात आवश्यक व्यवस्था करुन देण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला
दिले आहेत. या नुसार ज्ञानवापी परिसरातील 'व्यास का तहखाना' इथं हिंदूंना पूजा आरती करता येणार
आहे. सन १९९३ पूर्वी सोमनाथ व्यास यांचे कुटुंबिय या तळघरात नियमित पूजा करत,
अयोध्येतील बाबरी मशीद पाडल्यानंतर ज्ञानवापीच्या चारही बाजूंनी प्रशासनानं
लोखंडी कठडे लावल्यामुळे या तळघरात जाणं शक्य नव्हतं. सध्या या तळघराचा ताबा अंजुमन
इंतजामिया मस्जिद कमिटीकडे आहे.
****
मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेच्या
मसुद्याला ओबीसी संघटनांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. सगेसोयरे आणि गणगोत
यांच्यासाठी प्रतिज्ञापत्राद्वारे कुणबी दाखले देण्याबाबतच्या मसुद्याला ओबीसी संघटनांनी
विरोध केला आहे. संविधानाच्या विरोधात जाऊन सगेसोयरे यांची व्याख्या बदलण्यात येऊ नये, अशी भूमिका, या याचिकेत मांडण्यात आली आहे.
ओबीसी वेलफेयर फौंडेशन तर्फे ॲडव्होकेट मंगेश ससाणे यांनी ही
याचिका दाखल केली आहे.
****
सांगली जिल्ह्यातल्या विटा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेच्या
शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचं आज अल्पशा आजाराने निधन झालं, ते ७३ वर्षांचे होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगली जिल्ह्यात
गार्डी इथं जाऊन बाबर यांना श्रद्धांजली अर्पण केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
आणि अजित पवार यांनीही बाबर यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.
****
ठाण्यातील माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह इतरांविरुद्ध
खंडणी प्रकरणातल्या गुन्ह्याचा तपास बंद करण्याचा अहवाल केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग-सीबीआयनं
मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे. या सर्वाविरोधातले आरोप सिद्ध करणारे
पुरावे आढळलेले नाहीत, असं सीबीआयनं आपल्या अहवालात म्हटलं
आहे.
****
नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने नवीन
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर आधारीत अभ्यासक्रमांसाठी नामांकित संस्थांशी सामंजस्य करार
केले आहेत. या करारामुळे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, रोजगाराभिमुख पदवी आणि विविध संधी उपलब्ध होणार असून, त्याचा फायदा विद्यार्थ्यांना नक्कीच होईल, असा विश्वास
कुलगुरू संजीव सोनवणे यांनी व्यक्त केला आहे.
****
डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत राबवावयाच्या
बाबींमध्ये बदल करण्यात आला आहे. या बदलानुसार १० गटांच्या समूहाची शेतकरी उत्पादक
कंपनी, तसंच १० गटांच्या समूहाची शेतकरी
उत्पादक संस्था स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. विपणन सुविधेसाठी समूह संकलन
केंद्राची उभारणी करण्यासही मान्यता देण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय कृषी विभागामार्फत
जारी करण्यात आला आहे.
****
छत्रपती संभाजीनगर शहरातील शासकीय कर्करोग रूग्णालयात अद्ययावत
पॅट स्कॅन सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आमदार सतीश चव्हाण यांनी वैद्यकीय शिक्षण
मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. या रुग्णालयात मराठवाड्यासह
अनेक जिल्ह्यातील रूग्ण उपचारासाठी येतात. कर्करुग्णांचं पेट स्कॅन करणं आवश्यक असतं.
मात्र रुग्णांना खाजगी ठिकाणी ही तपासणी करावी लागते. गरीब रूग्णांना आर्थिकदृष्ट्या
हा खर्च परवडत नसल्याचं आमदार चव्हाण यांनी निवेदनात म्हटलं आहे.
****
चेन्नई इथं सुरु असलेल्या खेलो इंडिया युवा स्पर्धेचा आज केंद्रीय
क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्या उपस्थितीत समारोप होणार आहे. या स्पर्धेत ५३ सुवर्ण
पदकांसह एकूण १५० पदकं जिंकून महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. १०३ पदकांसह हरियाणा
दुसऱ्या, तर ९१ पदकांसह तामिळनाडू तिसऱ्या
क्रमांकावर आहे. या स्पर्धेत जलतरणाच्या ५०
मीटर फ्री स्टाईल प्रकारात महाराष्ट्राच्या ऋषभ दास तसंच आलेफिया धनसुरा यांनी पुरुष
तसंच महिला गटात सुवर्ण पदक पटकावलं
दरम्यान, लडाखमध्ये येत्या
दोन फेब्रुवारीला खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धेची सुरुवात होणार असून,
या स्पर्धेचं शुभंकर आणि बोधचिन्हाचं काल अनावरण करण्यात आलं.
****
मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणातून
एकही कुटुंब सुटणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी सूचना राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य डॉ. ओमप्रकाश जाधव यांनी केली आहे.
ते आज लातूर इथं यासंदर्भातल्या आढावा बैठकीत बोलत होते. या सर्वेक्षणात मराठवाड्यामध्ये
लातूर जिल्हा अग्रेसर आहे. जिल्ह्यात आजपर्यंत ९८ पूर्णांक ३३ टक्के सर्वेक्षण झालं
आहे, सर्व कुटुंबांचं सर्वेक्षण दोन फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्याचे
निर्देश जाधव यांनी दिले.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही सर्वेक्षणाचे काम विहित मुदतीत
प्रगणकांनी पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनानं दिले आहेत.
****
No comments:
Post a Comment