Tuesday, 30 January 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक:30.01.2024 रोजीचे दुपारी: 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 30 January 2024

Time: 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: ३० जानेवारी २०२ दुपारी १.०० वा.

****

युनेस्कोच्या २०२४-२५ या जागतिक वारसा यादीसाठी भारताकडून मराठा साम्राज्याशी संबंधित गड किल्ल्यांचं नामांकन होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट संदेशाद्वारे ही माहिती दिली. यात किल्ले रायगड, शिवनेरी, तोरणा, लोहगड, साल्हेर, खंडेरी, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग यासह तामिळनाडुमधल्या जिंजी या किल्ल्यांचा समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील मराठा लष्करी रणभूमीचा परिसर अर्थात गडकिल्ल्यांना जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यासाठीचा प्रस्ताव भारत सरकारने युनेस्कोला सादर केला आहे. हा प्रस्ताव सादर केल्याबद्दल फडणवीस यांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाचे आभार मानले आहेत.  

****

उद्यापासून सुरु होणार्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने बोलावेली सर्वपक्षीय बैठक नवी दिल्लीत सुरु आहे. सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांसह काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, जनता दल, डीएमके, शिवसेना या पक्षाचे नेते या बैठकीत उपस्थित आहे.

दरम्यान, संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणानं सुरु होईल. परवा एक तारखेला अर्थमंत्री निर्मला सीतारामन अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील. 

****

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यातिथी आज देशभरात हुतात्मा दिन म्हणून पाळण्यात येत आहे. देशभरातल्या सरकारी कार्यालयांमध्ये सकाळी ११ वाजता दोन मिनिटं मौन पाळून हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. नवी दिल्लीत राजघाट या गांधीजींच्या समाधीस्थळी सर्वधर्म प्रार्थना सभा घेण्यात आली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातल्या इतर सदस्यांनी गांधीजींच्या समाधीवर पुष्प अर्पण करुन अभिवादन केलं. 

****

मराठा समाजाचं सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षण सुरु असून, नागरीकांनी प्रगणकांना आवश्यक माहिती देऊन सर्वेक्षणास सहकार्य करावं, असं आवाहन महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगानं केलं आहे. उद्यापर्यंत हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

****

मुंबई इथं मराठी भाषा भवनासाठी २६० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती, मराठी भाषा आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. नवी मुंबईत वाशी इथं विश्व मराठी संमेलनाच्या समारोप सत्रात ते काल बोलत होते. या संमेलनात मराठीच्या वैश्विक प्रचारासाठी परिसंवाद, मराठी पुस्तकांचं जग चर्चासत्र, मराठीची सद्य:स्थिती आणि भविष्यकाळ, विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात महाराष्ट्राची गरुडझेप, व्यवहारात मराठीचा वापर आणि अर्थाजर्नाची भाषा, मराठमोळ्या खाद्यपदार्थांची पाककला स्पर्धा, मराठी भाषेचा प्रवास आणि नवी क्षितिजे इत्यादी कार्यक्रम आणि उपक्रम आयोजित करण्यात आले होते.

****

हिंगोली जिल्हा सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत आणि महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त हिंगोली शहरात आज सकाळी 'स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान' प्रभातफेरी काढण्यात आली. वैद्यकीय अभ्यासक्रमाचे विद्यार्थी यात मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. कुष्ठरोगाचं पूर्णपणे निर्मूलन करण्याबाबतचे फलक घेऊन यावेळी जनजागृती करण्यात आली.

****

नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने देण्यात येणारा कार्यक्षम खासदार पुरस्कार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना, तर कार्यक्षम आमदार पुरस्कार राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना काल प्रदान करण्यात आला. माजी आमदार आणि जेष्ठ पत्रकार माधवराव लिमये यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिले जाणारे हे पुरस्कार, श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राचे प्रमुख गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.

****

हिंगोली इथल्या मार्केट यार्डात काल हळदीला गेल्या आठवड्याच्या तुलनेत क्विंटलमागे जवळपास एक ते दीड हजाराने भाववाढ झाली. त्यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. कमाल ११ हजार ते किमान १३ हजार ६०० रुपये प्रतिक्विंटलने हळदीची विक्री झाली. भावात वाढ झाल्याने आवकही वाढली असून, तीन हजार २०० क्विंटलची आवक झाली. तुरीलाही यंदा समाधानकारक भाव असून, सोयाबीनच्या दरात मात्र घसरण सुरु आहे.

****

चेन्नई इथं सुरु असलेल्या खेलो इंडिया युवा क्रिडा स्पर्धेत एकूण १२७ पदकं जिंकून महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. यामध्ये ४४ सुवर्ण, ३९ रौप्य आणि ४४ कांस्य पदकांचा समावेश आहे.

****

दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या १९ वर्षाखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज सुपर सिक्स गटात भारत आणि न्यूझीलंड संघादरम्यान सामना होणार आहे. दुपारी दीड वाजता सामन्याला सुरुवात होईल. भारतानं आतापर्यंत साखळी फेरीमध्ये तिन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.

****

No comments: