Regional Marathi Text
Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 27 January
2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २७ जानेवारी २०२४
सायंकाळी ६.१०
****
· आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत ओबीसींचे अधिकार आणि सवलती मराठा समाजाला लागू-मुख्यमंत्र्यांची
घोषणा;मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण मागे
· आरक्षण निर्णयावर मंत्री छगन भुजबळ यांची टीका;आंतरवाली सराटीसह मराठवाड्यात
जल्लोष
· अखिल भारतीय पीठासीन अधिकाऱ्यांच्या परिषदेला मुंबईत विधानभवनात प्रारंभ
आणि
· परभणी इथं आजपासून डॉ. गुलाम रसुल संगीत महोत्सव
****
आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत मराठा समाजाला
ओबीसींना दिले जाणारे अधिकार आणि सवलती दिल्या जातील, असं
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते आज नवी मुंबईत आरक्षण आंदोलनाचे नेते
मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्यानंतर बोलत होते. जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांच्या
हातून फळांचा रस घेऊन आपलं उपोषण सोडलं. मराठा आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबांना
नुकसान भरपाई देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, जरांगे
पाटील यांच्या मागण्या मान्य केल्या असल्याचं सांगत, याबाबतच्या अधिसूचनेची
प्रत जरांगे यांना दिली. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले -
कुणबी नोंदी मराठवाड्यामध्ये कधी केल्या जात नव्हत्या. आता सापडू लागल्या. कुणबी
प्रमाणपत्र देण्यासाठी शिबीरं आपण लावलेली आहेत. सगेसोयरे याबाबतीमध्ये अधिसूचना आपण
काढलेली आहे. त्याचबरोबर वंशावळ जुळवणीसाठी आपण समिती नेमली आहे. मराठा समाजला ओबीसीचे
अधिकार ओबीसीच्या सवलती दिल्या जातील.
दरम्यान, मराठा समाजाला ओबीसी
सवलती देण्याबाबत सरकारनं घेतलेल्या निर्णयाबद्दल ओबीसींचे नेते आणि राज्याचे अन्न
आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ते आज नाशिक
इथं बोलत होते. उद्या मुंबई इथं आपल्या शासकीय निवासस्थानी या संदर्भात ओबीसी दलित
आणि आदिवासी नेत्यांची बैठक घेण्यात येणार असल्याचं, भुजबळ यांनी सांगितलं.
मराठा आरक्षणाच्या या निर्णयावर काँग्रेस
पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली आहे. ते आज धुळे इथं काँग्रेसच्या
उत्तर महाराष्ट्र विभाग जिल्हानिहाय आढावा बैठकपूर्वी पत्रकार परिषदेत बोलत होते. मराठ्यांना
आरक्षण दिलं,
पण ते कसं दिलं हे स्पष्ट केलं नाही, याकडे
पटोले यांनी लक्ष वेधलं.
****
दरम्यान, आरक्षणाच्या या निर्णयाबद्दल
मराठा समाजाकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे. जालना जिल्ह्यासह आरक्षण आंदोलनाचं मुख्य
केंद्रबिंदू ठरलेल्या आंतरवाली सराटी गावात आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे. मराठा
समाजबांधवांनी ठिकठिकाणी गुलालाची उधळण करून फटाक्यांची आतषबाजी करत एकमेकांना पेढे
भरवून आनंदोत्सव साजरा केला. जिल्हा भाजपा कार्यालयासमोरही पदाधिकाऱ्यांनी मराठा आरक्षणाच्या
निर्णयाचं ढोल ताशांच्या गजरात स्वागत केलं.
छत्रपती संभाजीनगर इथं सर्वत्र आनंद व्यक्त
करण्यात येत आहे,
शहरातल्या क्रांती चौक इथं मराठा समाजाकडून गुलाल उधळत आणि मिठाई
वाटत जल्लोष करण्यात आला.
परभणी जिल्ह्यात पूर्णा तालुक्यातल्या कातनेश्वर
इथं मराठा समाजातर्फे गावातून मिरवणूक काढण्यात आली.
लातूर इथं मराठा क्रांती मोर्चा आणि सकल
मराठा समाजाच्या वतीने जल्लोष करण्यात आला. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार
अर्पण करून गुलाल उधळून,
आतिषबाजी करण्यात आली. उदगीर इथं लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे
यांच्या उपस्थितीत जल्लोष करण्यात आला.
****
अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या विविध
मागण्यासंदर्भात अनेक दिवसांपासून सुरु असलेला संप काल मागे घेण्यात आला. महिला आणि
बालविकास मंत्री आदिती तटकरे, महिला आणि बालविकास सचिव अनुप कुमार, एकात्मिक
बाल विकास सेवा योजना आयुक्त रुबल अग्रवाल यांच्यासोबत झालेल्या बैठकीत समाधानकारक
आणि आशादायी चर्चा झाल्यामुळे संप मागे घेत असल्याचं सर्व संघटनांनी जाहीर केलं. अंगणवाडी
सेविका आणि मदतनीस यांना निवृत्तीवेतन लागू करण्याकरता संघटनांकडून अभिप्राय घ्यावेत, असे
निर्देश तटकरे यांनी या बैठकीत दिले.
****
अखिल भारतीय पीठासीन अधिकाऱ्यांची ८४वी परिषद
आजपासून मुंबईत विधानभवनात सुरू झाली. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते या
परिषदेचं उद्घाटन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज या परिषदेला दूरदृश्य प्रणालीद्वारे
शुभेच्छा दिल्या. सर्व लोकप्रतिनिधींनी सभागृहात तसंच सार्वजनिक जीवनात आदर्श आचरण
करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं.
तीन दिवस चालणाऱ्या परिषदेला विधानसभेचे
अध्यक्ष राहुल नार्वेकर,
विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे मुख्यमंत्री एकनाथ
शिंदे, विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह देशातल्या सर्व विधानसभांचे
अध्यक्ष, उपाध्यक्ष तसंच काही राज्यांतल्या विधान परिषदांचे सभापती आणि उपसभापती, आणि
सर्व विधिमंडळ सचिव उपस्थित आहेत.
विविध राज्यातल्या विधिमंडळ सचिवांची ६०वी
परिषदही इथे होत आहे. या परिषदेत 'विधानमंडळ सेवेमध्ये अत्याधुनिक
तंत्रज्ञानाचा वापर करणं'
या विषयावर चर्चा होणार आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीतल्या
करीअप्पा परेड मैदानावर राष्ट्रीय छात्र सेनेच्या वार्षिक मेळाव्याला संबोधित करत आहेत.
या वर्षीच्या मेळाव्यात दोन हजार २०० हून अधिक, राष्ट्रीय छात्रसेनेचे छात्र
आणि २४ विविध देशातले तरुण छात्र सहभागी झाले आहेत.
आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रम मालिकेतून
पंतप्रधान उद्या देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम मालिकेचा हा एकशे नववा
भाग आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून सकाळी अकरा वाजता या कार्यक्रमाचं
प्रसारण केलं जाणार आहे.
परीक्षांच्या ताणतणावाचा सामना कसा करावा
याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थ्याशी परीक्षा पे चर्चा कार्यक्रमातून संवाद
साधतात. येत्या सोमवारी या कार्यक्रमाचा सातवा भाग दिल्लीत होणार असून त्यात ४ हजाराहून
जास्त विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
****
शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनानिमित्त
सोलापूर इथं आज नाट्य दिंडी काढण्यात आली. पारंपारिक लोककलांनी आणि ढोलताशा, लेझीम
तालात निघालेल्या या दिंडीत शेकडो नाट्य कलावंत सहभागी झाले. पालकमंत्री चंद्रकांत
पाटील, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, अभिनेते
तथा विश्वस्त मोहन जोशी,
तसंच रंगभूमीवरील अनेक कलाकार यात सहभागी झाले. पारंपरीक लोककला
असलेल्या वासुदेव,
पोतराज, गोंधळी, बहुरूपी तसंच मानाचे नंदीध्वज, वारकरी, बहुरंगी
वेशभूषेतील कलाकारांनी ही दिंडी लक्षणीय ठरली.
****
परभणी इथं आजपासून देवगिरी संगीत प्रतिष्ठानच्या
वतीने डॉ. गुलाम रसुल संगीत महोत्सवाची सुरुवात होत आहे. कोलकाताचे प्रसिद्ध गायक सम्राट
पंडित, सारंगी वादक संगीत मिश्रा, महागामीच्या नृत्यगुरू पार्वती दत्ता, अकोल्याचे
गायक नीरज लांडे,
तबला वादक डॉ. प्रशांत जोशी आदी मान्यवर या संगीत महोत्सवात
सहभागी होत आहेत. या महोत्सवात नृत्यगुरू पार्वती दत्ता यांची कार्यशाळाही आयोजित करण्यात
आली आहे.
****
हिंगोली जिल्ह्यातलं मराठा समाज आणि खुल्या
प्रवर्गातील सर्वेक्षण ३१ जानेवारीपर्यंत शंभर टक्के पूर्ण करावं, अशा
सूचना राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य डॉ. गोविंद काळे यांनी दिल्या आहेत. मराठा आरक्षणाच्या
अनुषंगाने सर्वेक्षण तसंच विविध कामांची आढावा बैठक आज हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या
घेण्यात आली,
यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, अपर
जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी आणि इतर विभागाचे प्रमुख यावेळी उपस्थित होते.
****
विकसित भारत संकल्प यात्रेत परभणी इथं मेरी
कहानी मेरी जुबानी अंतर्गत पांडुरंग गमे यांनी आपल्याला झालेल्या लाभाची माहिती दिली.
बाईट - पांडुरंग
गमे, परभणी
****
भारताच्या रोहन बोपण्णाने ऑस्ट्रेलिया खुल्या
टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीचं अजिंक्यपद पटकावलं आहे. आपला ऑस्ट्रेलियायी जोडीदार मॅथ्यू एब्डेन याच्या साथीनं रोहनने इटलीच्या जोडीचा
सात-सहा, सात-पाच
असा पराभव केला. अशी कामगिरी करणारा रोहन हा सर्वाधिक वयाचा पहिलाच
टेनिसपटू ठरला आहे.
****
वीज ग्राहकांच्या छतावर सौरऊर्जा प्रकल्प
उभारणाऱ्या कंत्राटदारांना महावितरण सर्वतोपरी सहकार्य करेल, तथापि, कंत्राटदारांनी
दर्जेदार साहित्य वापरून ग्राहकांच्या सुरक्षिततेस प्राधान्य द्यावं, असं
आवाहन महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडलाचे मुख्य अभियंता डॉ.मुरहरी केळे यांनी
केलं आहे. ऑल इंडिया रिन्यूएबल एनर्जी असोसिएशनच्या वतीने घेण्यात आलेल्या बैठकीत ते
छत्रपती संभाजीनगर इथं बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील एक कोटी घरांच्या
छतावर सौरऊर्जा संच बसवण्यासाठी महत्त्वाकांक्षी 'प्रधानमंत्री सूर्योदय
योजना' जाहीर केली असून, छत्रपती
संभाजीनगर परिमंडलात मार्चपर्यंत २५ हजार सौरऊर्जा संच बसवण्याचं उद्दिष्ट देण्यात
आलं आहे, अशी माहिती केळे यांनी दिली.
****
No comments:
Post a Comment