Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 28 January 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २८ जानेवारी २०२४ दुपारी १.०० वा.
****
अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा
सोहळ्यानिमित्त २२ जानेवारीला देशातील नागरिकांनी दिवे लावून दिवाळी साजरी केली तसंच
या दिवशी राबवण्यात आलेल्या स्वच्छता अभियानातून देशाची सामूहिकतेतली शक्ती सर्वांना दिसली. हीच शक्ती देशाला यशाच्या नव्या शिखरावर घेऊन जाईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवरच्या आपल्या `मन की बात` या
कार्यक्रमातून पंतप्रधानांनी आज देशवासीयांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
या मालिकेचा या वर्षातला हा पहिला आणि एकूण एकशे नववा
भाग होता. २६ जानेवारीला कर्तव्य पथावरील महिलांच्या तुकडीचं
पथसंचलन, अर्जुन पुरस्कार प्राप्त महिला खेळाडूंनी कठीण परिस्थितीत
मिळवलेलं यश, तसंच बचत गटातल्या महिलांच्या कार्यक्षेत्राचा
विस्तार याचा त्यांनी यावेळी गौरवपूर्ण उल्लेख केला. उत्तर प्रदेश मधल्या बहराइच इथल्या जैव उत्पादन
बनवणाऱ्या महिला बचत गटाच्या कार्याची त्यांनी
प्रशंसा केली. आकाशवाणीवरुन छत्तीगडमध्ये हत्तींच्या कळपाविषयी
माहिती देणाऱ्या `हमर हाथी- हमर गोठ` या
वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाची माहिती
त्यांनी दिली. पंतप्रधानांनी
यावेळी पद्म पुरस्कार विजेत्यांचं अभिनंदन करत यातल्या प्रत्येकाचं योगदान देशवासीयांना
प्रेरणादायी असल्याचं सांगितलं. अवयवदान आणि देहदान करणाऱ्या
व्यक्तींच्या कुटुंबाचं त्यांनी यावेळी कौतूक केलं. आयुष
मंत्रालयानं जागतिक आरोग्य संघटनेच्या मदतीनं
आयुर्वेद, सिद्ध आणि युनानी औषधांशी संबंधित माहिती
आणि शब्दावलीचं वर्गीकरण केल्यानं या कोडिंगच्या माध्यमातून सर्व डॉक्टरांना औषधं लिहून देण्याच्या
चिठ्ठीवर एकसमान भाषेत लिहिणं शक्य होणार असल्याचं ते यावेळी म्हणाले. देशात ९६ कोटी मतदार असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख पंतप्रधानांनी केला. तसंच युवामतदारांनी `नॅशनल व्होटर सर्व्हिस पोर्टल` आणि
`व्होटर हेल्पलाइन अॅप`च्या
माध्यमातून नावनोंदणी करण्याचं आवाहन त्यांनी केलं. गेल्या सात
वर्षांपासून सुरु `परीक्षा पे चर्चा` या
कार्यक्रमात यावेळेस सव्वा दोन कोटींपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केल्याचं
त्यांनी यावेळी सांगितलं. देशातल्या
लोकांच्या सामूहिक, व्यक्तिगत प्रयत्नांमुळं, देश
कशारितीनं पुढं जात आहे, यावर आपलं लक्ष्य केंद्रीत असेल, असं
पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. स्वातंत्र्य संग्रामातील थोर
सेनानी, पंजाब केसरी लाला लजपतराय आणि फिल्ड मार्शल
के.एम.करियप्पा यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांना यावेळी अभिवादन केलं.
****
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे
आज विक्रमी नवव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. तत्पूर्वी
त्यांनी आज सकाळी राज्यपाल राजेंद्र
आर्लेकर यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा राजिनामा सोपवला. सरकारमध्ये
सर्व काही ठिक नव्हतं म्हणून आपण राजिनामा दिल्याचं नितीश कुमार यांनी म्हटलं आहे.
****
उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे आज आणि
उद्या महाराष्ट्र, तामिळनाडू राज्याच्या दौऱ्यावर येत आहेत. मुंबईत
काल सुरु झालेल्या अखिल भारतीय पीठासीन अधिकाऱ्यांच्या ८४ व्या परिषदेला ते आज संबोधित
करतील.
****
इंग्लंडविरुद्ध हैदराबाद इथं सुरू पहिला कसोटी क्रिकेट सामना जिकण्यासाठी भारतासमोर २३१ धावांचं आव्हान आहे. भारतानं
आज चौथ्या दिवशी आतापासून थोड्या वेळापूर्वी दोन बाद ४२ धावा केल्या आहेत. ओली
पोपनं केलेल्या १९६ धावांमुळं इंग्लंड संघानं आपल्या दुसऱ्या डावामध्ये ४२० धावा केल्या. जसप्रित
बुमराहनं चार तर आर. अश्विननं तीन गडी बाद केले. इंग्लंडनं या कसोटी सामन्यातल्या पहिल्या
डावामध्ये २४६ धावा केल्यानंतर भारतानं ४३६ धावा करत पहिल्या डावामध्ये १९० धावांची
आघाडी मिळवली
आहे.
****
ऑस्ट्रेलियन
खुल्या टेनिस स्पर्धेमध्ये विजेतेपदाच्या लढतीत आज तृतीय क्रमवारी प्राप्त डॅनीयल मेदवेदेव
आणि चतुर्थ क्रमवारी प्राप्त जानिक सिनर दरम्यान सामना होईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी दोन वाजता हा सामना सुरू होणार आहे.
****
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनानुसार
परभणीच्या पूर्णा तालुक्यातल्या कातनेश्वर गावातून मुंबईला
पायी गेलेले गावकरी कार्यकर्ते आज गावात परतले. आंदोलन यशस्वी करुन परतल्यामुळं गावकऱ्यांतर्फे त्यांचं यावेळी स्वागत
करण्यात आलं.
****
नांदेडमध्ये आज दुपारी दोन वाजता काँग्रेस पक्षाचा महिला
मेळावा होणार आहे. पक्षाचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष
नाना पटोले, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार,
काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे यात
मार्गदर्शन करणार आहेत.
****
No comments:
Post a Comment