Saturday, 27 January 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 27.01.2024 रोजीचे दुपारी: 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 27 January 2024

Time: 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २७ जानेवारी २०२ दुपारी १.०० वा.

****

आरक्षणाबाबतचा निर्णय होईपर्यंत मराठा समाजाला ओबीसी अधिकार आणि सवलती दिल्या जातील, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. राज्य सरकारनं मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्यानंतर आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आज नवी मुंबईत वाशी इथं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उपोषण सोडलं, त्यानंतर ते बोलत होते. यासंदर्भात जारी केलेल्या अध्यादेशाची प्रत मुख्यमंत्र्यांनी जरांगे यांना सुपुर्द केली. मराठा आरक्षणासाठी जे मृत्यूमुखी पडले त्यांच्या कुटुंबियांना नोकरी देण्याचं, मोबदला देण्याचं काम सरकार करणार आहे, तसंच सर्व निर्णयांची अंमलबजावणी करणार असल्याचं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं. मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाच्या वतीने यावेळी विजयोत्सव साजरा करण्यात आला. मंत्री दिपक केसरकर, मंगलप्रभात लोढा, गिरीश महाजन यावेळी उपस्थित होते. 

राज्यात ५४ लाख कुणबी नोंदी सापडल्या त्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात यावेत, त्यांच्या परिवारातल्या सदस्यांना तसंच सगेसोयऱ्यांना कुणबी प्रमाणात देण्यात यावं, जारी केलेला अध्यादेश कायमस्वरुपी रहावा, आदी मागण्या जरांगे यांनी यावेळी केल्या.

****

मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने अध्यादेश जारी केल्याबद्दल परभणी जिल्ह्यात पूर्णा तालुक्यातल्या कातनेश्वर इथं मराठा समाज बांधवांनी आनंद व्यक्त केला. नांदेड शहरात सिडको परिसरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात देखील फटाक्यांची आतिषबाजी करत तसचं पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा या मालिकेचा १०९वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.

दरम्यान, पंतप्रधान परवा २९ तारखेला परिक्षा पे चर्चा या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी संवाद साधणार आहेत. नवी दिल्लीत भारत मंडपम इथं होणार्या या संवादात्मक कार्यक्रमात चार हजारांहून अधिक विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

****

अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या विविध मागण्यासंदर्भात अनेक दिवसांपासून सुरु असलेला संप काल मागे घेण्यात आला. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे, महिला आणि बालविकास सचिव अनुप कुमार,  एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्त रुबल अग्रवाल यांच्यासोबत वारंवार झालेल्या बैठकीत समाधानकारक आणि आशादायी चर्चा झाल्यामुळे संप मागे घेत असल्याचं सर्व संघटनांनी जाहीर केलं. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना पेन्शन लागू करण्याकरता संघटनांकडून अभिप्राय घ्यावेत, असे निर्देश तटकरे यांनी यासंदर्भातल्या बैठकीत दिले.

****

ग्रंथालय कर्मचाऱ्यांना किमान वेतन लागू करण्याबाबतच्या मागणीसाठी महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी संघाच्या वतीने काल उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन देण्यात आलं. २०१२ पासून ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ झाली नसून, तुटपुंज्या वेतनामुळे कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे, असं ग्रंथालय कर्मचारी संघाचे अध्यक्ष सदाशिव बेडगे यांनी दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

****

परभणी इथं आजपासून देवगिरी संगीत प्रतिष्ठानच्या वतीने डॉ. गुलाम रसुल संगीत महोत्सवाची सुरुवात होत आहे. कोलकाताचे प्रसिद्ध गायक सम्राट पंडित, सारंगी वादक संगीत मिश्रा, नृत्यगुरू पार्वती दत्ता, अकोल्याचे गायक नीरज लांडे, तबला वादक डॉ. प्रशांत जोशी आदी मान्यवर या संगीत महोत्सवात सहभागी होत आहेत. या महोत्सवात नृत्यगुरू पार्वती दत्ता यांची कार्यशाळाही आयोजित करण्यात आली आहे.

****

गडचिरोली इथं काल जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे पीएम जनमत योजनेंतर्गत १३ मोबाईल मेडिकल युनिटचे लोकार्पण खासदार अशोक नेते यांच्या हस्ते झालं. ग्रामीण भागातलया गोरगरीब आदिवासी नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा मिळावी, यासाठी मोबाईल मेडिकल युनिट काम करणार आहेत.

****

चेन्नईत सुरु असलेल्या खेलो इंडिया युवा क्रिडा स्पर्धेत एकूण ८३ पदकं जिंकून महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. यामध्ये २८ सुवर्ण, २४ रौप्य आणि ३१ कांस्य पदकांचा समावेश आहे. काल या स्पर्धेत भारोत्तोलन प्रकारात राज्याच्या मेघा अहिरे हीने सुवर्ण पदक जिंकलं. याच क्रीडा प्रकारात कृष्णा व्यवहारेला कांस्य पदक मिळालं. नेमबाजीमध्ये ईशा टांकसाळे आणि पार्थ माने या जोडीने महाराष्ट्राच्या खात्यात आणखी एका सुवर्णपदकाची भर टाकली.

****

भारत आणि इंग्लंड दरम्यान हैदराबाद इथं सुरु असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात, आजच्या तिसर्या दिवशी शेवटचं वृत्त आलं तेव्हा इंग्लंडच्या दुसर्या डावात तीन बाद ११९ धावा झाल्या होत्या. तत्पूर्वी भारताचा पहिला डाव ४३६ धावात संपुष्टात आला. भारत ७१ धावांनी आघाडीवर आहे.  

****

No comments: