Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 02 February
2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०२ फेब्रुवारी २०२४ सायंकाळी ६.१०
****
·
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील
आभारदर्शक प्रस्तावावर संसदेत चर्चेला प्रारंभ
·
विद्यापीठांनी परीक्षांचे निकाल
वेळेत जाहीर करावेत-कुलपती रमेश बैस यांचे निर्देश
·
९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य
संमेलनाचं उद्घाटन;साहित्यिकांच्या मांदियाळीत ग्रंथदिंडी सोहळा
आणि
·
छत्रपती संभाजीनगर इथल्या हज
हाऊसचं लोकार्पण
****
संसदेत आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक प्रस्तावावर चर्चा सुरु झाली.
लोकसभेत भाजपच्या खासदार हिना गावित यांनी चर्चेला सुरुवात केली. गेल्या दहा वर्षात
देशात प्रत्येक क्षेत्रात महिला कायम पुढे राहील्या असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यसभेत
भाजपच्या कविता पाटीदार यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक प्रस्तावावर
चर्चेला प्रारंभ केला.
दरम्यान, झारखंडच्या माजी मुख्यमंत्र्यांवर झालेल्या
कारवाईच्या निषेधात विरोधी पक्षाच्या खासदारांनी दोन्ही सदनातून सभात्याग केला. काँग्रेस
नेते खासदार डी के सुरेश यांनी काल केलेल्या टिप्पणीचे आज संसदेच्या दोन्ही सभागृहात
पडसाद उमटले. राज्यसभेचं कामकाज सुरू होताच, सदनाचे नेते पियुष
गोयल यांनी सुरेश यांच्या टिप्पणीबद्दल आक्षेप घेतला. यावर काँग्रेसनं माफी मागावी
अशी मागणीही त्यांनी केली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी यावर बोलतांना,
देश तोडण्याची भाषा कोणत्याही पक्षाचा व्यक्ती करत असेल तर ते स्वीकारार्ह
नाही असं सांगितलं.
लोकसभेत संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी शून्य काळात हा प्रश्न उपस्थित
केला. सुरेश यांनी संविधानाचा अपमान केला असून, हे प्रकरण संसदेच्या
आचार समितीकडे पाठवण्याची मागणी त्यांनी केली.
****
देशभरात आतापर्यंत सुमारे साडे दहा हजार प्रधानमंत्री जनऔषधी केंद्रं सुरू करण्यात
आले असून, या माध्यमातून नागरिकांच्या औषधांच्या खर्चात
सुमारे २८ हजार कोटी रुपयांहून अधिक बचत झाली आहे. रसायनं आणि खतं राज्यमंत्री भगवंत
खुबा यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. ३१ मार्च २०२६
पर्यंत देशात २५ हजाराहून अधिक जनऔषधी केंद्रं सुरू करण्याचं सरकारचं उद्दीष्टं असल्याचं,
खुबा यांनी सांगितलं.
****
देशभरात ३० कोटींहून अधिक आयुषमान कार्डस तयार करण्यात आले आहेत. आरोग्य तथा कुटुंब
कल्याण राज्यमंत्री एस.पी.बघेल यांनी आज लोकसभेत एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती
दिली.
****
झारखंड मुक्ती मोर्चा आणि मित्रपक्षाचे नेते चंपई सोरेन यांनी आज झारखंडचे मुख्यमंत्री
म्हणून शपथ घेतली. रांची इथं राजभवनात राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी त्यांना पद आणि
गोपनीयतेची शपथ दिली.
****
विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचारू करून सर्व विद्यापीठांनी वेळेत अभ्यासक्रम
पूर्ण करून परीक्षांचे निकाल वेळेत जाहीर करावेत, असे
निर्देश कुलपती तथा राज्यपाल रमेश बैस यांनी दिले. आज मुंबईत राजभवनात बैस यांच्या
अध्यक्षतेखाली कुलगुरू संयुक्त मंडळाची बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. प्रत्येक
कुलगुरूंनी विद्यापीठामध्ये नवीन शैक्षणिक धोरण अंमलबजावणी आणि केलेल्या कार्यवाहीबाबत
सविस्तर अहवाल पाठवावा, असं बैस यांनी सांगितलं. जर्मनी,
जपान, इस्राईल यासारख्या देशांनी भारताकडून कुशल
मनुष्यबळाची अपेक्षा केली आहे. महाराष्ट्राकडून कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावं आणि
व्यवसायाभिमुख शिक्षणावर अधिक भर देऊन रोजगार निर्मितीकडे लक्ष द्यावे, अशा सूचना राज्यपालांनी यावेळी दिल्या. यावर्षी आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या
राज्याभिषेकाचा साडेतीनशेवा वर्धापन दिन साजरा करत आहोत. यानिमित्त पारंपरिक खेळांना
प्रोत्साहन देण्याचं आवाहन कुलपतींनी केलं.
****
मुंबई महापालिकेचा आगामी आर्थिक वर्षासाठीचा ५९ हजार ९५४ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प
आज सादर झाला. यात कोणतीही करवाढ करण्यात आलेली नाही. मुंबईकरांना अधिकाधिक सेवासुविधा
देणारा हा ५८ कोटी २२ लाख रुपये शिलकीचा अर्थसंकल्प आहे.
****
विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी जनाधिकार कार्यक्रमाच्या
माध्यमातून पालघरच्या जनतेशी संवाद साधला. आणि पालघरच्या जनतेच्या समस्या जाणून घेतल्या.
आणि त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
भारतीय जनता पक्षातर्फे परवा ४ फेब्रुवारीपासून ते ११ फेब्रुवारीपर्यंत व्यापक
जनसंपर्कासाठी 'गाव चलो अभियान' राबवण्यात
येणार आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती
दिली.
****
जळगाव जिल्ह्यातल्या अमळनेर इथं ९७व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन
आज लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या हस्ते झालं. उपमुख्यमंत्री अजित
पवार, मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यावेळी उपस्थित
होते. तत्पूर्वी आज सकाळी वाडी संस्थानपासून ग्रंथदिंडी काढण्यात आली. आकर्षक पुष्पसजावट
केलेल्या पालखीत श्रीमद् भगवतगीता, ज्ञानेश्वरी, दासबोध, भारताचे संविधान, या ग्रंथ
गुरूंचा समावेश होता. मंगलवाद्यांचे सूर, ढोल पथक, आदीवासी नृत्य यांचाही या दिंडीत समावेश होता. अमळनेरच्या शालेय विद्यार्थ्यांनी
यामध्ये उत्साहाने सहभाग घेतला. मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष उषा तांबे,
उद्योजक अशोक जैन, यांच्यासह राज्यभरातून साहित्यिक
आणि साहित्य रसिक मोठ्या संख्येने या संमेलनात सहभागी झाले आहेत.
****
अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनानिमित्त आज बीडं इथं शोभायात्रा काढण्यात आली.
संमेलनाचं यंदा शंभरावं वर्ष असल्याने भव्य नाट्य दिंडी काढण्यात आली.
****
अल्पसंख्यांक विभागाला आता पाचशे कोटी रुपये निधी उपलब्ध असल्याची माहिती अल्पसंख्यांक
विकास मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं हज हाऊसचं उद्घाटन
केल्यानंतर बोलत होते. खासदार इम्तियाज जलील, आमदार हरिभाऊ
बागडे यांच्यासह हज हाऊस कमिटीचे सदस्य यावेळी उपस्थित होते. शहरातील आमखास मैदानावर
दीडशे कोटी रुपये खर्च करून फुटबॉलचे मोठे मैदान उभारले जाईल, नारेगाव इथं हज कमिटीच्या चाळीस एकर जागेवर 'केजी टू
पीजी' मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची सोय करून दिली जाईल
असं सत्तार यांनी सांगितलं. हज हाऊसची ही इमारत हज यात्रेकरूंसाठी उपयुक्त ठरेल असा
विश्वास सर्वच त्यांनी व्यक्त केला. ४२ कोटी रुपयेचा खर्च करून ही इमारत उभारण्यात
आली आहे.
****
महिलांचा पर्यटन क्षेत्रातील सहभाग वाढण्यासाठी तसंच महिलांमध्ये उद्योजकता आणि
नेतृत्व गुण विकसित करण्यासाठी पर्यटन विभागाने 'आई'
हे महिला केंद्रित धोरण जाहीर केले असून या धोरणाअंतर्गत सुरु करण्यात
आलेल्या नवी कर्ज योजनेचा महिला उद्योजिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन पर्यटन मंत्री गिरीश
महाजन यांनी केलं आहे. या संदर्भातील अधिक माहिती पर्यटन विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध
असल्याचं, पर्यटन मंत्रालयातर्फे सांगण्यात आलं आहे.
****
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर इथं आजपासून वेरुळ - अजिंठा
आंतरराष्ट्रीय महोत्सव सुरु होत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या
सोनेरी महल परिसरात नियोजित या महोत्सवाचं उद्घाटन पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्या
उपस्थितीत होणार आहे. आज या महोत्सवात प्रसिद्ध नृत्यांगना डॉ. संध्या पुरेचा यांचं
भरतनाट्यम्, पंडिता अनुराधा पाल यांचं स्त्री शक्तीवर आधारित
पाच वाद्यांचं सादरीकरण आणि राहुल देशपांडे तसंच प्रियंका बर्वे यांचं गायन होणार आहे.
****
राज्यभरात सलोखा योजनेतून आतापर्यंत ५८५ शेतकऱ्यांना लाभ घेतला आहे. या दस्त नोंदणीद्वारे
एकूण ५ कोटी, १२ लाख,
४० हजार, ९६३ रुपयांची शुल्कमाफी करण्यात आल्याची
माहिती राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. राज्याच्या ७ विभागातील
५८५ दावे सलोखा योजने अंतर्गत निकाली काढण्यात आले आहेत. त्यामध्ये अमरावती विभागातून
सर्वाधिक १४४ दावे निकाली काढण्यात आले, त्या पाठोपाठ लातूर,
नाशिक, छत्रपती संभाजीनगर, ठाणे, नागपूर आणि पुणे विभागाचा समावेश आहे.
****
आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं नांदेड जिल्ह्यात प्रशासकीय पातळीवरील तयारीला
वेग आला आहे. नांदेडमध्ये आज क्षेत्रीय अधिकाऱ्यांची कार्यशाळा घेण्यात आली. दोन सत्रात
झालेल्या या कार्यशाळेत जवळपास ७०० क्षेत्रीय अधिकारी सहभागी झाले. जिल्हाधिकारी अभिजीत
राऊत यांनी यावेळी मार्गदर्शन केलं.
****
बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई इथल्या स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयात परवा ४
जानेवारीला प्राचार्य बी.के.सबनीस यांच्या स्मृती प्रित्यर्थ वक्तृत्व स्पर्धा घेण्यात
येणार आहे. सर्धेचे संयोजक डॉ रमेश सोनवळकर यांनी ही माहिती दिली. ही स्पर्धा राज्यातील
वरीष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी असून प्रत्येक महाविद्यालयास दोन विद्यार्थ्यांचा
संघ या स्पर्धेसाठी पाठविता येईल. स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक रकमेसोबत स्मृतिचिन्ह
आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धेचं हे एकोणीसावं वर्ष आहे.
****
पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा वाबळेवाडीचे मुख्याध्यापक दत्तात्रय वारे यांना
अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचा शिक्षण कर्मयोगी पुरस्कार जाहीर झाला आहे.
नांदेड इथं परवा रविवारी आयोजित शिक्षक अधिवेशनात या पुरस्काराचं वितरण करण्यात येणार
आहे.
****
No comments:
Post a Comment