Thursday, 1 February 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक:01.02.2024 रोजीचे दुपारी: 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar

Date: 01 February 2024

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०१ फेब्रुवारी २०२ दुपारी १.०० वा.

****

****

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत वर्ष २०२४ चा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर रचनेत कोणताही बदल केला नसून आयकर प्राप्ती २६ लाख कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. यासह आयकर परताव्याचं काम गतीनं केलं जाणार असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी सांगितलं.

पुढच्या वर्षीचा भांडवली खर्च अकरा पूर्णांक एक टक्क्यानं वाढून अकरा पूर्णांक एक लाख कोटी रुपये होणार आहे. हा एकूण जीडीपीच्या तीन पूर्णांक चार टक्के असेल. गेल्या दहा वर्षात २५ कोटी नागरिकांना दारिद्र्यातून बाहेर काढण्यासाठी सरकारनं मदत केली आहे. पीकविमा आणि पीएम विश्वकर्मा या योजना लाभदायी ठरत असल्याचं अर्थमंत्री सितारामन यांनी सांगितलं.

नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणामुळं देशाच्या शिक्षण क्षेत्रात आमुलाग्र बदल झाला आहे. भविष्यात ५० लाख रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचं सरकारचं उद्दिष्ट असून गर्भाशय आणि मुखाच्या कर्करोग निर्मुलनासाठी लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे. ९ ते १४ वयोगटातील मुलींना मोफत लस दिली जाईल, असंही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी सांगितलं. सरकार रेल्वेच्या विकासासाठी तीन प्रमुख आर्थिक रेल्वे कॉरीडॉर उभारणार असून सध्या सामान्य असलेले रेल्वेचे चाळीस हजार डबे वंदे भारत रेल्वेप्रमाणे अत्याधुनिक करण्यात येणार आहेत. तसंच महानगरांमध्ये मेट्रोचं जाळंही विस्तारलं जाईल.

ग्रामीण, सामाजिक आणि आर्थिक परिक्षेप बदलण्यासाठी बचत गटाद्वारे नऊ कोटी लखपती दीदी यांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण केलं जाणार आहे. पंतप्रधान आवास योजना ग्रामीण अंतर्गत आणखी दोन कोटी रं बांधली जाणार असून मध्यम वर्गासाठीही आवास योजना सुरू करण्यात येणार आहे, तसंच एक कोटी कुटुंबांना छतावर सौरऊर्जा आणि दरमहा तीनशे युनिटपर्यंत मोफत वीमिळणार असल्याचंही सितारामन यांनी सांगितलं.

****

छत्रपती संभाजीनगर इथं आज सकाळी जालना रोडवरील सिडको उड्डाणपुलाजवळ गॅस टँकर दुभाजकाला धडकल्यानं गॅस गळती सुरू झाली. सकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. त्यामुळं सेव्हन हिल उड्डाणपुलाकडून सिडको बसस्थानकाकडं जाणारी वाहतूक वळवण्यात आली. गॅस गळती झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून अग्निशमन दलाच्या सहा बंबांमार्फत अपघातस्थळी पाण्याचा मारा केला जात असून सिडको एन-तीन, एन-चार, एन -पाच परिसरातील सर्व शाळा आणि आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनानं दिले आहेत. तसंच परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली असून गॅस टँकर अपघाताच्या ठिकाणापासून पाचशे ते सहाशे मीटर परिसरातील नागरिकांना घराबाहेर सुरक्षितस्थळी पडण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.

****

परभणी जिल्ह्यात उत्पादित होणारा चारा, मुरघास, आणि स्वस्त धान्याची इतर जिल्ह्यात वाहतूक करण्यास जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी बंदी घातली आहे. यंदा जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान झाल्यानं हा निर्णय घेण्यात आला, असून पुढील आदेशापर्यंत ही बंदी लागू राहणार आहे.

****

जालना जिल्ह्यातल्या सेवली पोलिस स्थानकातला कर्मचारी गजानन नागरे याच्यासह दोघांना पंधरा हजार रुपयांची लाच घेताना काल अटक करण्यात आली. वाळू वाहतुकीचा पकडलेला टिप्पर सोडण्यासाठी त्यांनी ही लाच मागितली होती.

****

पाच लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी नाशिक इथल्या सहकार विभागातले अधिकारी भीमराव जाधव आणि वरिष्ठ लिपिक अनिल घरडे यांच्या विरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं गुन्हा दाखल केला आहे. सोसायटीच्या नियमानुसार, एका सभासदानं कर्ज भरलं नसल्यानं त्या सभासदाचं घर लिलावाद्वारे विक्री करण्याचा आदेश देण्यात आला होता, त्यासंदर्भात संबंधित तक्रारदाराच्या बाजूने निकाल देण्यासाठी त्यांनी ही लाच मागितली होती.

****

रामायणातील प्रत्येक पात्रातून जीवन प्रणालीची ओळख होते, असं सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. राज्य शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं महाकाव्य रामायण हा कार्यक्रम काल मुंबईत गेट वे ऑफ इंडिया इथं झाला, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमात तीनशेहून अधिक कलाकारांनी अप्रतिम सादरीकरण केलं.

****

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं जारी केलेल्या ताज्या क्रमवारीत तीन भारतीय गोलंदाजांना स्थान मिळालं आहे. रविचंद्र अश्विन अव्वलस्थानी कायम असून जसप्रित बुमरा चौथ्या तर रविंद्र जडेजा सहाव्या स्थानी आहे. पहिल्या दहा फलंदाजामध्ये एकमात्र खेळाडू विराट कोहली सहाव्या स्थानावर आहे.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 02.10.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 02 October 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत...