Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date: 02 February 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०२ फेब्रुवारी २०२४ दुपारी १.०० वा.
****
लोकसभेत आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक प्रस्तावावर चर्चा सुरु झाली. भाजपच्या खासदार हिना गावित यांनी चर्चेला सुरुवात केली. गेल्या दहा वर्षात देशात प्रत्येक क्षेत्रात महिला कायम पुढे राहील्या असल्याचं त्यांनी सांगितलं. देशाचा महिला केंद्रीत विकास होत असल्याचं त्यांनी नमूद केलं. राज्यसभेतही आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक प्रस्तावावर चर्चा सुरु होणार आहे.
दरम्यान, सकाळच्या सत्रात संसदेच्या दोन्ही सभागृहात अर्थसंकल्पावर काँग्रेस खासदार डी के सुरेश यांच्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला.
राज्यसभेत कामकाज सुरु होताच सभागृह नेते पियुष गोयल यांनी डी के सुरेश यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत, काँग्रेसनं माफी मागावी अशी मागणी केली.
लोकसभेत संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी हा मुद्दा उपस्थित केला. हे प्रकरण आचार समितीकडे पाठवून, सुरेश यांच्यावर कारवाईची मागणी त्यांनी केली.
****
जळगाव जिल्ह्यातल्या अमळनेर इथं ९७व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन आज लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या हस्ते झालं. उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यावेळी उपस्थित होते. तत्पूर्वी आज सकाळी वाडी संस्थानपासून ग्रंथदिंडी काढण्यात आली. या ग्रंथदिंडीत फुलांची आकर्षक सजावट केलेली पालखी, मंगलवाद्यांचे सूर, ढोल पथक, आदीवासी नृत्य यांचा समावेश होता. अमळनेरच्या शालेय विद्यार्थ्यांनी यामध्ये उत्साहाने सहभाग घेतला. मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष उषा तांबे, उद्योजक अशोक जैन, यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.
****
आदिवासी क्षेत्रातलं कुपोषण कमी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या कृती दलाची बैठक काल मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. कृती दलाच्या शिफारशींची प्रभावी अंमलबजावणी करून कुपोषणाचं प्रमाण आणखी कमी झालं पाहिजे, असं सांगून त्यांनी, याकामी सरपंचांचा सहभाग वाढवण्याची आणि आदिवासी भागात मोठ्या प्रमाणावर शिबिरे घेण्याचे निर्देश दिले. माध्यान्ह भोजन योजना नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना देखील देण्यासंदर्भात तसंच अमृत आहार योजना शहरी भागात देखील देण्यासंदर्भात मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव आणण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
****
नांदेड इथं काल बेटी बचाओ- बेटी पढाओ या अभियानांतर्गत बालिका पंचायत कार्यक्रम घेण्यात आला. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी यावेळी बोलताना, महिला सक्षमीकरण तसंच मुलींच्या विकासाला चालना देण्यासाठी जिल्ह्यात बालिका पंचायत उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती दिली. भविष्यात मुलींच्या सामाजिक आणि राजकीय विकासाला प्रोत्साहन देणं, त्यांचा राजकारणात सक्रिय सहभाग सुनिश्चित करणं, बालविवाह आणि हुंडा यासारख्या प्रथा तसंच स्त्री पुरुष असमानता समाजातून काढून टाकणं ही बालिका पंचायत कार्यक्रमाची उद्दीष्ट आहेत.
****
छत्रपती संभाजीनगर इथं आजपासून वेरुळ - अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव सुरु होत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या सोनेरी महल परिसरात होणार्या या महोत्सवाचं उद्घाटन पर्यटन मंत्री गिरीष महाजन यांच्या उपस्थितीत होणार आहे. आज या महोत्सवात प्रसिद्ध नृत्यांगना डॉ. संध्या पुरेचा यांचं भरतनाट्यम, पंडिता अनुराधा पाल यांचं स्त्री शक्तीवर आधारित पाच वाद्यांचं सादरीकरण आणि राहुल देशपांडे तसंच प्रियंका बर्वे यांचं गायन होणार आहे.
****
धाराशिव जिल्ह्यात येरमाळा इथल्या युवक आणि विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेऊन आमदार राणाजगजिसिंह पाटील यांच्या प्रयत्नातून अभ्यासिका आणि व्यायाम शाळेसाठी ५० लाख रुपये मंजूर झाले आहेत. येरमाळा आणि श्रीक्षेत्र येडेश्वरी देवस्थानच्या विकासासाठी देखील मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जात असून, पालखी मार्ग आणि देवस्थान च्या विकासासाठी नुकताच पाच कोटी रुपये निधी देण्यात आला आहे.
****
राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाअंतर्गत लातूर इथं काल आरोग्य अधिकार्यांच्या क्षमता वृद्धीकरण प्रशिक्षण कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी मार्गदर्शन केलं. संशयित क्षयरुग्णांची तपासणी करुन, निदान करून अशा रुग्णांवर लवकरात लवकर योग्य उपचार सुरु करावेत. अखंडित उपचारातून त्यांना क्षयमुक्त करण्यासाठी सर्व समुदाय आरोग्य अधिकारी यांनी प्रयत्न करावेत, असं त्यांनी यावेळी सांगितलं.
****
चौथी खेलो इंडिया हिवाळी स्पर्धा आजपासून लडाख इथं सुरु झाली. हिवाळी स्पर्धांचा पहिला टप्पा सहा फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे. लेह इथं आइस हॉकी आणि स्पीड स्केंटींग या स्पर्धा होतील. १६ राज्यातले सुमारे ६०० स्पर्धक यात सहभागी झाले आहेत.
****
भारत आणि इंग्लंडदरम्यान दुसरा कसोटी क्रिकेट सामना आज विशाखापट्टणम इथं सुरु झाला असून, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या दोन बाद १३७ धावा झाल्या होत्या.
****
No comments:
Post a Comment