Friday, 2 February 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक:02.02.2024 रोजीचे सकाळी: 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

संक्षिप्त बातमीपत्र

०२ फेब्रुवारी २०२ सकाळी ११.०० वाजता

****

संसदेच्या दोन्ही सभागृहात आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक प्रस्तावावर चर्चा होणार आहे. दोन्ही सभागृहांमध्ये चर्चेची सुरुवात महिला खासदार करतील. लोकसभेत चर्चेसाठी १२ तासांचा तर राज्यसभेत १४ तासांचा वेळ देण्यात आला आहे. लोकसभेत पाच फेब्रुवारीला तर राज्यसभेत सात फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी या आभारदर्शक प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देतील.

****

भारतीय तटरक्षक दलाचा ४८ वा स्थापना दिवस आज साजरा होत आहे. यानिमित्त मुंबईतल्या तटरक्षक दलाच्या पश्चिम मुख्यालयात राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आला.

****

जळगाव जिल्ह्यातल्या अमळनेर इथं आज ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या हस्ते होणार आहे. तत्पूर्वी वाडी संस्थान इथं ग्रंथदिंडीचं उद्घाटन अखिल भारतीय मराठी महामंडळाच्या अध्यक्षा प्रा.उषा तांबे आणि जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते झालं.

****

आय एम पी एस अर्थात तात्काळ पेमेंट सेवांच्या नियमांमध्ये कालपासून मोठे बदल करण्यात आले. नवीन नियमांनुसार ग्राहकांना आता पाच लाख रुपयांपर्यंत हस्तांतरण करता येणार आहे. पैसे पाठवणाऱ्या ग्राहकाला, ज्याला पैसे पाठवायचे आहेत त्यांची संपूर्ण माहिती भरायची आवश्यकता नसून, बँकेचं नाव आणि मोबाइल क्रमांक भरून पैसे पाठवता येतील.

****

नवी दिल्ली इथं झालेल्या प्रजासत्ताक दिन शिबिरामध्ये महाराष्ट्र एनसीसीच्या चमूनं सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानांचा ध्वज-निशाण आणि सर्वोत्कृष्ट चॅम्पियनशिप चषक पटकावल्याबद्दल राज्यपाल रमेश बैस यांनी काल मुंबईत एनसीसीच्या सर्व सदस्यांचा सत्कार केला. विकसित भारताचं उद्दिष्टं गाठताना, सर्वांनी शिस्त आणि नियमांचं पालन केलं पाहिजे, युवक राष्ट्रकार्यात कसे सहभागी होतात यावर देशाचं भवितव्य अवलंबून असतं, असं राज्यपाल यवेळी म्हणाले.

****

भारत आणि इंग्लंडदरम्यान दुसरा कसोटी क्रिकेट सामना आज विशाखापट्टणम इथं सुरु झाला असून, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या एक बाद ५९ धावा झाल्या होत्या.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 06.04.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 06 April 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्र...