Saturday, 3 February 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक:03.02.2024 रोजीचे सकाळी: 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

संक्षिप्त बातमीपत्र

०३ फेब्रुवारी २०२४ सकाळी ११.०० वाजता

****

२०२३ - २४च्या खरीप हंगामात सुमारे सहा कोटी टन भाताची खरेदी झाली आहे. किमान हमी भावासाठी सुमारे एक लाख ३० हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले असून, त्याचा ५७ लाख शेतकऱ्यांना लाभ झाला आहे. ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं ही माहिती दिली.

****

विधी आयोगानं अब्रु नुकसानीच्या कायद्याबाबत आपला अहवाल सादर केला आहे. गुन्हेगारीविषयक अब्रुनुकसानीचा समावेश गुन्हेगारीविषयक कायद्यांमध्येच असावा, अशी शिफारस आयोगानं केली आहे. कायदा आणि न्याय मंत्रालयानं राज्यघटनेतल्या २१व्या कलमातील प्रतिष्ठाविषयक हक्काच्या अनुषंगानं, वैयक्तिक स्वातंत्र्य आणि जीवनाचा हक्क जपण्यासंदर्भात वेगवेगळे मुद्दे तपासण्याची विनंती, विधी आयोगाला केली होती.

****

देशभरात आतापर्यंत सुमारे साडे दहा हजार प्रधानमंत्री जन औषधी केंद्रं सुरू करण्यात आले असून, या माध्यमातून नागरिकांच्या औषधांच्या खर्चात सुमारे २८ हजार कोटी रुपयांहून अधिक बचत झाली आहे. रसायनं आणि खतं राज्यमंत्री भगवंत खुबा यांनी काल लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. ३१ मार्च २०२६ पर्यंत देशात २५ हजाराहून अधिक जनऔषधी केंद्रं सुरू करण्याचं सरकारचं उद्दीष्टं असल्याचं, त्यांनी सांगितलं.

****

देशभरात ३० कोटींहून अधिक आयुषमान कार्ड्स तयार करण्यात आले आहेत. आरोग्य तथा कुटुंब कल्याण राज्यमंत्री एस.पी.बघेल यांनी काल लोकसभेत ही माहिती दिली.

****

आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं नांदेड जिल्ह्यात प्रशासकीय पातळीवरील तयारीला वेग आला आहे. नांदेडमध्ये काल क्षेत्रीय अधिकाऱ्यांची कार्यशाळा घेण्यात आली. दोन सत्रात झालेल्या या कार्यशाळेत जवळपास ७०० क्षेत्रीय अधिकारी सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी यावेळी मार्गदर्शन केलं.

****

थायलंड मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या अश्मिता चलिहानं महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उपांत्यपूर्व फेरीत काल बँकॉक इथं झालेल्या सामन्यात तिनं इंडोनेशियाच्या खेळाडुचा २१-१४, १९- २१, २१-१३ असा पराभव केला. महिला दुहेरीत भारताच्या त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीला, तर पुरुष एकेरीतही भारताचा मिथुन मंजुनाथचा उपांत्यपूर्व फेरीत पराभव झाला.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 06.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 06 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...