Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date: 03 June 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०३ जून २०२४ दुपारी १.०० वा.
****
देशात लोकसभा निवडणुकीत आतापर्यंत सर्वाधिक मतदानाची नोंद झाली असल्याचं मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितलं. ते आज नवी दिल्ली इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. या निवडणुकीत ६४ कोटीहून अधिक नागरीकांनी मतदानाचा हक्क बजावला असल्याचं सांगून कुमार यांनी, विक्रमी मतदान झाल्याबद्दल सर्व मतदारांचे आभार मानले.
दरम्यान, उद्या होणाऱ्या मतमोजणीसाठी निवडणूक आयोगाची तयारी पूर्ण झाल्याची माहितीही कुमार यांनी यावेळी दिली.
आंध्र प्रदेश आणि ओडिशामधल्या विधानसभा निवडणुकांची तसंच विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी देखील उद्या होणार आहे.
राज्यातल्या ४८ लोकसभा मतदार संघात मतमोजणीची प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीने होण्याच्या दृष्टीने यंत्रणा सर्व तयारीनिशी सज्ज असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिली आहे. या सर्व मतमोजणी केंद्रावर एकूण १४ हजार ५०७ अधिकारी-कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.
****
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात निवडणुकीची मतमोजणी बीड वळण रस्त्यावरच्या एमआयटी महाविद्यालयात होणार आहे. उद्या पहाटे पाच वाजल्यापासून मतमोजणी संपेपर्यंत या वळण रस्त्यावरून सर्व प्रकारची जड वाहनांची वाहतूक अन्य मार्गे वळवण्यात आली आहे.
जालना इथं औद्योगिक वसाहतीमधल्या सरस्वती ऑटो कम्पोनन्ट्स इथं मतमोजणी होणार आहे. मतमोजणीसाठी सुमारे तेराशे कर्मचारी असून, सहा विधानसभा मतदारसंघनिहाय प्रत्येकी १४ अशा एकूण ८४ टेबलवर मतमोजणी होणार आहे. तर पोस्टल मतदान पत्रिकेसाठी एकूण दहा टेबल असतील.
लातूर लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. ही मतमोजणी एकूण २९ फेऱ्यात होणार असून, ज्यात २८ फेऱ्या या मतदान यंत्राच्या असतील तर एक फेरी ही टपाली मतदानाची असेल.
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी धाराशिव इथल्या तुळजापूर रोडवरील शासकीय तंत्रनिकेतन इमारतीमध्ये होणार आहे. ८४ टेबलवर ही मतमोजणी होणार असून, जवळपास पंधराशे कर्मचारी ही प्रक्रिया पार पाडणार आहेत.
हिंगोली इथं लिंबाळा मक्ता इथल्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाकडून एम. एस. अर्चना आणि एम. पी. मारोती यांची विशेष मतमोजणी निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
****
राज्य विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं आज उमेदवारांची यादी जाहीर केली. कोकण पदवीधर मतदारसंघातून निरंजन डावखरे यांना, मुंबई पदवीधर मतदारसंघातून किरण शेलार यांना, तर मुंबई शिक्षक मतदारसंघातून शिवनाथ दराडे यांना भाजपनं उमेदवारी दिली आहे.
****
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं देशभरात पथकरात पाच टक्क्यांची वाढ केली आहे. ही करवाढ आजपासून लागू झाली.
****
नांदेड जिल्ह्यात खरीप हंगामाच्या मशागतीची कामं अंतिम टप्प्यात आली आहेत. देगलूर इथल्या मोंढा बाजारात खत आणि बियाणे खरेदीसाठी आज सकाळपासूनच शेतकऱ्यांनी गर्दी केली आहे. शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करु नये, चांगला पाऊस झाल्यानंतरच कृषी विभागाच्या सल्ल्यानंतर पेरणी करावी, असं कृषी विभागाने सांगितलं आहे.
****
नागपूर - मुंबई समृद्धी महामार्गावर वाशिम जिल्ह्यात मालेगांवच्या रिधोरा इंटरचेंज जवळ नागपूर लेनवर उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव कारने धडक देऊन झालेल्या अपघातात कार चालकासह तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातग्रस्त कार ही अमरावती जिल्ह्यातली असण्याची शक्यता असून, मृतकांची अद्याप ओळख पटली नसल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे.
****
धुळे जिल्ह्यात नागपूर-सुरत महामार्गवर नायट्रोजन गॅस टँकरने अचानक पेट घेतल्याची घटना आज सकाळी घडली. दोन्ही बाजूची वाहतूक थांबवून अग्निशमक बंबाच्या माध्यमातून ही आग आटोक्यात आणल्याने कुठलाही अनुचीत प्रकार घडला नसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताचा रोहन बोपन्ना आणि त्याचा ऑस्ट्रेलियन जोडीदार मॅथ्यू एब्डन यांनी तिसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. काल झालेल्या दुसऱ्या फेरीच्या सामन्यात या जोडीने ब्राझीलच्या मार्केलो झोरमन आणि ऑरलान्डो लुज या जोडीचा सात - पाच, चार - सहा, सहा - चार असा पराभव केला. आता तिसऱ्या फेरीत बोपन्ना - एब्डेन जोडीचा सामना आज भारताचा एन श्रीराम बालाजी आणि मेक्सिकोचा मार्टिनेझ या जोडीबरोबर होणार आहे.
****
टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज बार्बाडोस इथं झालेल्या सामन्यात नामिबियानं ओमानचा सुपर ओव्हरमध्ये ११ धावांनी पराभव केला. या स्पर्धेतला आजचा दुसरा सामना श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान न्यूयॉर्क इथं होणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता सामन्याला सुरुवात होईल. या स्पर्धेतला भारताचा पहिला सामना येत्या पाच तारखेला आयर्लंडविरुद्ध होणार आहे.
****
No comments:
Post a Comment