Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date: 05 June 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०५ जून २०२४ दुपारी १.०० वा.
****
केंद्रीय मंत्रिमंडळाची आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरु आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह मंत्रिमंडळातले इतर सदस्य या बैठकीला उपस्थित आहेत.
दरम्यान, आज राष्ट्रीय लोकशाही आघाडी - एनडीए तसंच इंडिया आघाडीचीही दिल्लीत बैठक होणार आहे.
****
लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार अशोक चव्हाण, मंत्री गिरीश महाजन, आशिष शेलार, आदी नेते यावेळी उपस्थित होते.
****
ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी आज राज्यपाल रघुवर दास यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सुपुर्द केला. राज्य विधानसभा निवडणुकीत पटनाईक यांच्या बिजू जनता दलाचा पराभव झाल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. या निवडणुकीत भजापनं १४७ पैकी ७८ जागा जिंकू एकहाती सत्ता मिळवली आहे.
****
लोकसभा निकालांच्या पार्श्वभूमीवर काल पडझड झाल्यानंतर, आज सकाळच्या सत्रात भारतीय शेअर बाजार काहीसा सावरला आणि त्यात तेजी दिसून आली. बाजार सुरू होताना मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात ४०२ अंकांनी वाढ होऊन, तो ७२ हजार ४८२ अंकांवर पोचला होता, तर, निफ्टी १०२ अंकांनी २१ हजार ९८७ झाला होता.
****
२०२३-२४ या आर्थिक वर्षात देशातलं एकूण अन्नधान्य उत्पादन तीन हजार २८८ लाख टनांपेक्षा जास्त असल्याचा अंदाज आहे. कृषी मंत्रालयानं प्रमुख पिकांच्या उत्पादनाचा तिसरा अंदाज आज जारी केला. त्यानुसार तांदळाचं एकूण उत्पादन एक हजार ३६७ लाख टन असल्याचा अंदाज आहे. गव्हाचं उत्पादन एक हजार १२९ लाख टनांपेक्षा अधिक, तर तूर उत्पादन ३४ लाख टन असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
****
जागतिक पर्यावरण दिवस आज साजरा होत आहे. पर्यावरणविषयक तातडीच्या समस्यांवर जनजागृती आणि कृती करण्याच्या उद्देशानं हा दिवस पाळला जातो. १९७२ मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेच्या मानव पर्यावरणावरील स्टॉकहोम परिषदेदरम्यान या दिवसाचा आरंभ करण्यात आला होता. यावर्षी जागतिक पर्यावरण दिनाची संकल्पना, जमिनीचं पुन:स्थापन, वाळवंटीकरण आणि दुष्काळावर मात, अशी आहे.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नागरीकांना, शाश्वततेवर आधारित एक चांगलं आणि हरित जग निर्माण करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याचं आवाहन केलं आहे. पृथ्वीचं रक्षण करणं ही आपली मुख्य जबाबदारी असल्याचं, त्यांनी सामाजिक माध्यमावरच्या संदेशात नमूद केलं.
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा देताना, मानवता आणि निसर्ग यांच्यातील सुसंवाद हा शाश्वत जीवनाचा पाया असल्याचं सांगितलं.
यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीत 'एक पेड माँ के नाम' या मोहिमेअंतर्गत बुद्ध जयंती उद्यानात वृक्षारोपण केलं. देशभरात करोडो झाडं लावण्यासाठी एक प्रकारे जनआंदोलन उभारण्याच्या उद्देशानं ही मोहिम सुरु करण्यात आली आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव आणि दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यावेळी उपस्थित होते.
जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं आज आंब्याच्या कोयी संकलनाची विशेष मोहीम राबवली जात आहे.
****
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसनं रमेश कीर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आज मुंबईत ही माहिती दिली.
****
राज्यसभेचे सदस्य प्रफुल्ल पटेल यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागी महाराष्ट्र विधानसभेच्या निर्वाचित सदस्यांकडून एका सदस्याची निवडणूक घेण्यासाठीची सूचना महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयानं जारी केली आहे. त्यानुसार उमेदवार अथवा त्याच्या सूचकाला १३ जून पर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार असून, निवडणूक लढवली गेल्यास २५ जून रोजी मतदान होणार आहे.
****
खासदार म्हणून लोकांच्या विश्वासाला पात्र ठरणं ही आपली नैतिक जबाबदारी असून, महामार्ग, पिण्याचं पाणी, रत्नागिरी विमानतळ आणि उद्योगधंदे यांना प्राधान्यक्रम देणार असल्याचं, रत्नागिरी - सिंधुदुर्गचे नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांनी म्हटलं आहे. त्यांच्या विजयाची अधिकृत घोषणा झाल्यानंतर ते काल वार्ताहरांशी बोलत होते.
****
टी - ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारताचा पहिला सामना आयर्लंड विरुद्ध होणार आहे. न्यूयॉर्क इथं होणारा हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता सुरु होईल.
****
नैऋत्य मोसमी पाऊस मध्य अरबी समुद्राचा आणखी काही भाग, तसंच गोव्यात पुढे सरकला आहे. येत्या तीन ते चार दिवसांत राज्यात मोसमी पाऊस दाखल होण्यासाठी स्थिति अनुकूल असण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
No comments:
Post a Comment