Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 02 June 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ०२ जून २०२४ दुपारी १.०० वा.
****
अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम विधानसभा निवडणुकांची मतमोजणी आज सकाळी सुरू झाली. यामध्ये अरुणाचल प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळालं असून, ६० पैकी ३१ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. अजूनही १४ जागांवर भाजप आघाडीवर असून, मतमोजणी अद्याप सुरू आहे. तसंच, सिक्कीममध्ये विद्यमान मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांच्या नेतृत्त्वातल्या सत्तारूढ सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा-एसकेएमला बहुमत मिळालं आहे. या पक्षानं ३२ पैकी १८ जागांवर विजय मिळवला असून, १३ जागांवर हाच पक्ष आघाडीवर आहे. मतमोजणी अद्याप सुरू आहे.
****
लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक निष्पक्षपणे आणि व्यवस्थितरीत्या पार पाडल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेचं कौतुक केलं आहे. आयोगाचं समर्पण आणि व्यवस्थित प्रयत्नांमुळे लोकांमध्ये विश्वास वाढला असून, नागरिकांनी आत्मविश्वासानं मतदान केल्याचं, पंतप्रधान मोदी यांनी आपल्या समाजमाध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. याचबरोबरच त्यांनी निवडणुकांदरम्यान सुरक्षेसाठी काम केलेल्या सुरक्षा दलाचंदेखील कौतुक केलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज विविध मुद्यांशी निगडित सात बैठकांना संबोधित करणार आहेत. पहिली बैठक ही पूर्वोत्तर राज्यांमध्ये चक्रीवादळानंतर उद्भवणाऱ्या परिस्थितीचा आढावा घेण्यासंबंधी, तर दुसऱ्या एका बैठकीत देशात वाढणाऱ्या प्रचंड उष्णतेच्या समस्येबाबत चर्चा होईल. जागतिक पर्यावरण दिवस व्यापक स्तरावर साजरा करण्याच्या तयारीचादेखील ते या संबंधित बैठकीत आढावा घेतील. तसंच नव्या सरकारचे शंभर दिवस या कार्यक्रमाच्या यादीचा आढावा घेण्यासाठी ते एक बैठक घेणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
अर्थ मंत्रालयाला चालू आर्थिक वर्षात, मे महिन्यात वस्तू आणि सेवा कर-जीएसटीमधून एक लाख ७३ हजार कोटी एवढा महसूल मिळाला आहे. अर्थ मंत्रालयानुसार दरवर्षी या संकलनात १० टक्क्यांनी वाढ होत आहे. मे महिन्यात केंद्रीय वस्तू आणि सेवा करातून सुमारे ३२ हजार कोटी रुपये, राज्य वस्तू आणि सेवा करातून सुमारे ४० हजार कोटी रुपये, तर एकीकृत सेवा आणि वस्तू करातून सुमारे ८७ हजार ७८१ कोटी रुपये इतका कर प्राप्त झाला आहे. चालू आर्थिक वर्षाचा आतापर्यंतचा एकूण वस्तू आणि सेवा कर-जीएसटी तीन लाख ८३ हजार कोटी रुपये एवढा असून, यामध्ये दरवर्षी ११ पूर्णांक तीन टक्क्यांनी वाढ होत असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
पंजाबमधल्या फतेहगढ साहिब इथं आज पहाटे दोन मालवाहू रेल्वेगाड्यांची धडक होऊन अपघात झाला. या अपघातात एका मालवाहू रेल्वेचं इंजिन उलटून बाजूच्या रुळावरून जाणाऱ्या पॅसेंजर रेल्वेगाडीला धडकलं, मात्र पॅसेंजर रेल्वेचा वेग कमी असल्यानं सुदैवानं जीवितहानी झाली नाही. या अपघातात मालगाडीचे दोन चालक जखमी झाले असून, त्यांना पतियाळा इथं उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
****
पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिरात आज सकाळपासून पदस्पर्श दर्शनाला सुरुवात झाली. राज्य पुरातत्त्व खात्याच्या वतीनं जतन आणि संवर्धनाचं काम सुरू असल्यामुळे भाविकांना १५ मार्चपासून मंदिरात पदस्पर्श दर्शन बंद करण्यात आलं होतं. मात्र आता सोळखांबी आणि गाभाऱ्यातलं काम पूर्ण झालं असून, आज सकाळच्या नित्यपूजेनंतर पदस्पर्श दर्शनाला सुरुवात झाली. काही शिल्लक कामं ३० जूनपर्यंत पूर्ण होतील, असं मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितलं आहे.
****
नांदेड शहरालगतच्या वाडी बुद्रुक गावात एका नाल्याजवळ बंदुकीची तब्बल ४३७ काडतुसं सापडली आहेत. ती गंजलेल्या अवस्थेत आहेत. वाडी बुद्रुक इथल्या एका मुलाला ही काडतुसं दिसली. याबाबत गावकऱ्यांनी भाग्यनगर पोलिसांना माहिती दिली. पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, दहशतवाद विरोधी पथक, श्वानपथक घटनास्थळी पोहोचल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषकाला आजपासून सुरुवात झाली आहे. अमेरिकेतल्या डलास इथं आज झालेल्या पहिल्या सामन्यात अमेरिका संघानं कॅनडा संघावर सात गडी राखत विजय मिळवला. या सामन्यात कॅनडा संघानं प्रथम फलंदाजी करत निर्धारित षटकांत पाच गडी बाद १९४ धावा केल्या. १९५ धावांचं लक्ष्य अमेरिका संघानं सात गडी आणि १४ चेंडू राखत पूर्ण केलं. या स्पर्धेतला दुसरा सामना वेस्ट इंडिज आणि पापुआ न्यू गिनी यांच्यात होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री आठ वाजता सामन्याला सुरुवात होईल. दरम्यान, या स्पर्धेतला भारताचा पहिला सामना येत्या पाच तारखेला आयर्लंडविरुद्ध होणार आहे.
****
No comments:
Post a Comment