Sunday, 2 June 2024

TEXT-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 02.06.2024 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 02 June 2024

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ० जून २०२४ सायंकाळी ६.१०

****

·      देशभरातली रुग्णालयं तसंच सार्वजनिक ठिकाणांची विद्युत सुरक्षेबाबत खबरदारी घेण्याची पंतप्रधानांची सूचना

·      अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला तर सिक्किम विधानसभा निवडणुकीत सिक्किम क्रांतीकारी मोर्चाला स्पष्ट बहुमत

·      पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिरात पदस्पर्श दर्शनाला आजपासून पुन्हा प्रारंभ

·      नांदेडनजिक वाडी बुद्रुक इथं सापडलेली ४३७ काडतुसं निकामी-पोलिसांचा खुलासा

आणि

·      टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला प्रारंभ-अमेरिका संघाची विजयी सलामी

****

देशभरातली रुग्णालयं तसंच सार्वजनिक ठिकाणांची विद्युत सुरक्षेबाबत खबरदारी घेण्याची सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर आज दिल्लीत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. आगीच्या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी तसंच अशा घटनांच्या निवारणासाठी पुरेसा सराव नियमितपणे करणं आवश्यक असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. राजस्थान, गुजरात तसंच मध्यप्रदेशात यंदा शेवटच्या टप्प्यात उन्हाळा अधिक तीव्र होण्याची शक्यता असल्याचं, या बैठकीत सांगण्यात आलं.

****

 

काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केंद्रीय गृहमंत्री तथा भाजप नेते अमित शहा यांच्यावर केलेल्या आरोपासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यांना सविस्तर माहिती देण्यास सांगितलं आहे. शहा यांनी दीडशे जिल्हाधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून काही सूचना केल्याचा आरोप रमेश यांनी केला आहे. यासंदर्भात आज संध्याकाळपर्यंत तथ्यात्मक माहिती सादर करण्याची सूचना आयोगाने रमेश यांना केली आहे.

****

अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. ६० जागांपैकी ४६ जागांवर भाजपानं विजय मिळवला आहे. नॅशनल पीपल्स पार्टीने पाच जागा जिंकल्या असून राष्ट्रवादी काँग्रेसने ३, तर पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचलनं २ जागा जिंकल्या आहेत. तर काँग्रेसने एक जागा जिंकली असून, ३ अपक्ष उमेदवारांनी या निवडणुकीत विजय मिळवला आहे.

दरम्यान, सिक्किम विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी सिक्किम क्रांतीकारी मोर्चाला पूर्ण बहुमत मिळालं आहे. सिक्किमधल्या ३२ पैकी ३१ जागांवर सिक्किम क्रांतीकारी मोर्चाने विजय मिळवला आहे. तर सिक्किम डेमोक्रॅटिक फ्रंटला केवळ एका जागेवर विजय मिळवता आला आहे.

दरम्यान, अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तीन आमदार निवडून आल्याचा अभिमान वाटतो, असं पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार तसंच राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबई इथं प्रसार माध्यमांशी बोलत होते. नवनिर्वाचित आमदार निकील कामीन, लेखा सोनी आणि टोकू टाटम हे राज्याच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देण्यास तयार आहेत, असं राष्ट्रीय सरचिटणीस आणि मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी म्हटलं आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला एकूण १० पूर्णांक ६ टक्के मते मिळाल्याचंही त्यांनी सांगितलं.

****

लोकसभा निवडणुकीनंतर अनेक खाजगी वृत्तवाहिन्यांनी वर्तवलेले निकालांचे अंदाज काँग्रेस पक्षाने नाकारले असून हे अंदाज बोगस असल्याचं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी म्हटलं आहे. ते आज दिल्ली इथ माध्यमांशी बोलत होते. सर्व राज्यांमधल्या काँग्रेस नेत्यांनी पाठवलेल्या विश्लेषणानुसार काँग्रेस प्रणीत इंडिया आघाडीला कमीत कमी २९५ जागा मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

****

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीची मतमोजणी बीड वळण रस्त्यावरच्या एमआयटी महाविद्यालयात होणार आहे. चार जूनला पहाटे पाच वाजल्यापासून मतमोजणी संपेपर्यंत या वळण रस्त्यावरून सर्व प्रकारची जड वाहनांची वाहतूक अन्य मार्गे वळवण्यात आली आहे.

दरम्यान, उन्हाचा वाढता कडाका पाहता, नागरिकांनी मतमोजणीची आकडेवारी जाणून घेण्यासाठी या ठिकाणी गर्दी करू नये, असं आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलं आहे. निकालाची फेरीनिहाय माहिती नागरिकांना घरबसल्या ऐकता येईल यासाठी प्रशासनाने विविध माध्यमांद्वारे व्यवस्था केली असल्याचं दिलीप स्वामी यांनी सांगितलं.

****

बीड लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीची प्रक्रिया वस्तुनिष्ठपणे पार पाडावी यासाठी कर्मचाऱ्यांना योग्य ते प्रशिक्षण देण्याचं आवाहन मतमोजणी निवडणूक निरीक्षक बसवराज आर. सोमण्णा यांनी केलं आहे. बीड इथं जिल्हाधिकारी कार्यालयात आज सोमण्णा तसंच, जिल्हा निवडणूक अधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. मतमोजणीच्या प्रक्रियेतील प्रत्येक फेरीमध्ये उमेदवारांकडून नेमण्यात आलेल्या प्रतिनिधींचं समाधान होईपर्यंत पुढे जाऊ नये, यासह महत्त्वाच्या अनेक सूचना त्यांनी केल्या.

****

लातूर लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. ही मतमोजणी एकूण २९ फेऱ्यात होणार असून, ज्यात २८ फेऱ्या या मतदान यंत्राच्या असतील तर एक फेरी ही टपाली मतदानाची असणार आहे, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी ही माहिती दिली. दरम्यान, मतदान कक्षात कुणालाही मोबाईल घेऊन जात येणार नसून मोबाईल आढळल्यास तो जप्त करण्यात येईल, असा ईशाराही ठाकूर यांनी दिला आहे.

 

 

लातूर लोकसभा मतदारसंघासाठी मतमोजणी निरीक्षक नेमलेले सागर चक्रबर्ती यांनी आज लातूर येथील मतमोजणी केंद्राची पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रत्येक मतमोजणी कक्षातील व्यवस्थेची माहिती घेतली. तसेच जिल्हा निवडणूक यंत्रणेने केलेल्या तयारीचा आढावा घेतला.

****

पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिरात आज सकाळपासून पदस्पर्श दर्शनाला सुरुवात झाली. राज्य पुरातत्त्व खात्याच्या वतीनं मंदिराच्या जतन आणि संवर्धनाचं काम सुरू असल्यानं १५ मार्चपासून पांडुरंगाचं पदस्पर्श दर्शन बंद करण्यात आलं होतं. मात्र आता सोळखांबी आणि गाभाऱ्यातलं काम पूर्ण झालं असून, आज सकाळच्या नित्यपूजेनंतर पदस्पर्श दर्शनाला सुरुवात झाली. काही शिल्लक कामं ३० जूनपर्यंत पूर्ण होतील, असं मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितलं आहे.

****

नांदेड शहरानजिक वाडी बुद्रुक गावात एका नाल्याजवळ तब्बल ४३७ बंदुकीच्या गोळ्या सापडल्या. वाडी बुद्रुक इथल्या एका मुलानं पोलिसांना याबाबत माहिती देताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस मुख्यालयातील शस्त्रागार शाखेतील तज्ञांच्या मदतीने आज ही काडतुसं तपासण्यात आली. ही काडतुसं ४६ वर्षांपूर्वी १९७८ मधे तयार झालेली असून, ती सर्व काडतुसं निकामी झाली आहेत, अशी माहीती पोलिसांनी दिली.

****

कोल्हापूर इथल्या कळंबा कारागृहात आज एका कैद्याची हत्या झाली. मुन्ना उर्फ मोहम्मद अलीखान उर्फ मनोजकुमार भंवरलाल गुप्ता असं मृत कैद्याचं नाव आहे. तो सकाळी अंघोळीला गेला असता इतर पाच कैद्यांनी त्याला नाल्यावरच्या लोखंडी झाकणानं मारहाण केली असून, त्यातच त्याचा मृत्यू झाला. मृत कैदी मुन्ना हा १९९३ च्या बॉम्बस्फोट हल्ल्यातील आरोपीचा होता. या प्रकरणी पाच जणांविरोधात राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

****

टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषकाला आजपासून सुरुवात झाली. अमेरिकेतल्या डलास इथं आज झालेल्या पहिल्या सामन्यात अमेरिका संघानं कॅनडा संघावर सात गडी राखत विजय मिळवला. या सामन्यात कॅनडा संघानं प्रथम फलंदाजी करत निर्धारित षटकांत पाच गडी बाद १९४ धावा केल्या. १९५ धावांचं लक्ष्य अमेरिका संघानं सात गडी आणि १४ चेंडू राखत पूर्ण केलं. या स्पर्धेतला दुसरा सामना वेस्ट इंडिज आणि पापुआ न्यू गिनी यांच्यात होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री आठ वाजता सामन्याला सुरुवात होईल. दरम्यान, या स्पर्धेतला भारताचा पहिला सामना येत्या पाच तारखेला आयर्लंडविरुद्ध होणार आहे.

****

नार्वे बुद्धीबळ स्पर्धेच्या पाचव्या सत्रात भारतीय बुद्धिबळ पटू आर प्रज्ञानंद याने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या अमेरिकाच्या फॅबियानो कारुआना याला हरवत जगातल्या दहा बुद्धिबळ खेळाडूंच्या यादीत प्रवेश केला आहे. या स्पर्धेत प्रज्ञानंद सध्या साडे आठ अंक मिळवत तिसऱ्या स्थानावर आहे.

****

नांदेड शहर आणि परिसरात आज सायंकाळी ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यासाठी आजपासून ५ जूनपर्यंत येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या दरम्यान जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची, तसंच हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

 

लातूर शहरासह जिल्ह्यात अनेक भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. लातूर जिल्ह्यात १५ ते २० मिनिटे पावसाची हजेरी होती. जिल्ह्यात रेणापूर, देवणी, शिरूर अनंतपाळ, तसंच औसा तालुक्यातही पावसाने हजेरी लावली.

दरम्यान, हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार पुढील ०४ दिवस अर्थात ०३ ते ०६ जून पर्यंत लातूर जिल्ह्यात ताशी ४० ते ५० किलोमीटरच्या वेगाने वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

 

बीड जिल्ह्यात येत्या चार जूनपर्यंतच्या कालावधीत विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी पावसाची शक्‍यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने जारी केला आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 12.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 12 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...