Monday, 3 June 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक:03.06.2024 रोजीचे सकाळी 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 03 June 2024

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०३ जून २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      देशभरातली रुग्णालयं तसंच सार्वजनिक ठिकाणी विद्युत सुरक्षेबाबत खबरदारी घेण्याची पंतप्रधानांची सूचना 

·      अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला तर सिक्किम विधानसभा निवडणुकीत सिक्किम क्रांतीकारी मोर्चाला स्पष्ट बहुमत

·      हंगामी जामिनाची मुदत संपल्यानं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल न्यायालयासमोर हजर

·      नांदेड इथं सापडलेली ४३७ काडतुसं निकामी-तपासणीअंती पोलिसांचा खुलासा

·      टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला प्रारंभ-अमेरिका आणि वेस्ट इंडीजची विजयी सलामी

आणि

·      तैवान ॲथेलॅटिक्स स्पर्धेत भारताच्या अंकेश चौधरीला सुवर्णपदक

****

देशभरातली रुग्णालयं तसंच सार्वजनिक ठिकाणांची विद्युत सुरक्षेबाबत खबरदारी घेण्याची सूचना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर काल दिल्लीत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. आगीच्या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी तसंच अशा घटनांच्या निवारणासाठी पुरेसा सराव नियमितपणे करणं आवश्यक असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. राजस्थान, गुजरात तसंच मध्यप्रदेशात यंदा शेवटच्या टप्प्यात उन्हाळा अधिक तीव्र होण्याची शक्यता असल्याचं, या बैठकीत सांगण्यात आलं.

****

अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. विधानसभेच्या ६० जागांपैकी दहा जागा भाजपनं बिनविरोध जिंकल्या होत्या, त्यासह एकूण ४६ जागांवर भाजपानं विजय मिळवला आहे. नॅशनल पीपल्स पार्टीने पाच जागा जिंकल्या असून, राष्ट्रवादी काँग्रेसने तीन, तर पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचलनं दोन जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसनं एक जागा जिंकली असून, तीन अपक्ष उमेदवारांनी या निवडणुकीत विजय मिळवला आहे.

सिक्किम विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी सिक्किम क्रांतीकारी मोर्चाला पूर्ण बहुमत मिळालं आहे. सिक्किम विधानसभेच्या ३२ पैकी ३१ जागांवर सिक्किम क्रांतीकारी मोर्चाने विजय मिळवला, तर सिक्किम डेमोक्रॅटिक फ्रंटला फक्त एका जागेवर विजय मिळवता आला आहे.

दरम्यान, अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तीन आमदार निवडून आल्याचा अभिमान वाटतो, असं पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार तसंच राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबई इथं प्रसार माध्यमांशी बोलत होते. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला एकूण १० पूर्णांक ६ टक्के मतं मिळाल्याचंही त्यांनी सांगितलं.

****

लोकसभा मतदानाची मतमोजणी उद्या होणार आहे. राज्यातल्या ४८ मतदार संघात उद्या सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरू होईल. या सर्व मतमोजणी केंद्रावर एकूण १४ हजार ५०७ अधिकारी-कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. ही संपूर्ण प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीने होण्याच्या दृष्टीने यंत्रणा सज्ज असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली.

दरम्यान, मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांना आवश्यक सुविधा पुरवाव्यात, असं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्य निवडणूक अधिकारी यांना पत्र लिहून कळवलं आहे. राज्यातल्या बहुतेक जिल्ह्यात अद्याप उष्णतेची लाट कायम असून, तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या आसपास आहे. यामुळे मतमोजणी प्रक्रियेत सहभागी असणाऱ्या सर्वांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत संबंधितांना आवश्यक निर्देश द्यावेत, असं वडेट्टीवार यांनी या पत्रात म्हटलं आहे.

****

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात निवडणुकीची मतमोजणी बीड वळण रस्त्यावरच्या एमआयटी महाविद्यालयात होणार आहे. चार जूनला पहाटे पाच वाजल्यापासून मतमोजणी संपेपर्यंत या वळण रस्त्यावरून सर्व प्रकारची जड वाहनांची वाहतूक अन्य मार्गे वळवण्यात आली आहे.

दरम्यान, उन्हाचा वाढता कडाका पाहता, नागरिकांनी मतमोजणीची आकडेवारी जाणून घेण्यासाठी या ठिकाणी गर्दी करू नये, असं आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलं आहे. निकालाची फेरीनिहाय माहिती नागरिकांना घरबसल्या ऐकता येईल यासाठी प्रशासनाने विविध माध्यमांद्वारे व्यवस्था केली असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

बीड लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीची प्रक्रिया वस्तुनिष्ठपणे पार पाडावी यासाठी कर्मचाऱ्यांना योग्य ते प्रशिक्षण देण्याचं आवाहन, मतमोजणी निवडणूक निरीक्षक बसवराज आर. सोमण्णा यांनी केलं आहे. काल बीड इथं जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक अधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आलं, त्यावेळी सोमण्णा बोलत होते. मतमोजणीच्या प्रक्रियेत प्रत्येक फेरीमध्ये उमेदवारांकडून नेमण्यात आलेल्या प्रतिनिधींचं समाधान होईपर्यंत पुढे जाऊ नये, यासह महत्त्वाच्या अनेक सूचना त्यांनी केल्या.

दरम्यान, मतमोजणीच्या ठिकाणी अँड्रॉइड मोबाईल घड्याळ वापरण्यास बंदी असणार असल्याचे सक्त निर्देश जिल्हा प्रशासनाकडून जारी करण्यात आले आहेत.

****

लातूर लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. ही मतमोजणी एकूण २९ फेऱ्यात होणार असून, ज्यात २८ फेऱ्या या मतदान यंत्राच्या असतील तर एक फेरी ही टपाली मतदानाची असेल. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी ही माहिती दिली. दरम्यान, याठिकाणी मोबाईल आढळल्यास तो जप्त करण्यात येईल, असा इशाराही ठाकूर यांनी दिला आहे.

लातूर लोकसभा मतदारसंघासाठी मतमोजणी निरीक्षक नेमलेले सागर चक्रबर्ती यांनी काल मतमोजणी केंद्राची पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रत्येक मतमोजणी कक्षातल्या व्यवस्थेची माहिती घेऊन, जिल्हा निवडणूक यंत्रणेने केलेल्या तयारीचा आढावा घेतला.

****

पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिरात काल सकाळ नित्यपूजेनंतर पदस्पर्श दर्शनाला पुन्हा सुरुवात झाली. राज्य पुरातत्त्व खात्याच्या वतीनं मंदिराच्या जतन आणि संवर्धनाचं काम सुरू असल्यानं १५ मार्चपासून पांडुरंगाचं पदस्पर्श दर्शन बंद करण्यात आलं होतं. राहिलेली कामं ३० जूनपर्यंत पूर्ण होतील, असं मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितलं आहे.

****

आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल काल त्यांच्या हंगामी जामिनाची मुदत संपल्यानंतर न्यायालयासमोर हजर झाले. त्यांना पाच जून पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्याआधी केजरीवाल यांनी पक्षाचे नेते, कार्यकर्ते आणि जनतेशी संवाद साधला.

****

पुण्यातल्या कल्याणी नगर पोर्शे कार अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीचे आई -वडील शिवानी अगरवाल आणि विशाल अगरवाल यांना न्यायालयानं पाच जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. रक्ताच्या नमुन्यात फेरफार करून पुराव्यांमध्ये छेडछाड केल्याप्रकरणी शिवानी अगरवाल यांना, तर पोलीस कामात अडथळा आणला म्हणून विशाल अगरवाल याला अटक केली आहे, असं पोलीस सहाय्यक आयुक्त सुनील तांबे यांनी सांगितलं.

****

नांदेड शहरानजिक वाडी बुद्रुक गावात काल एका नाल्याजवळ बंदुकीच्या तब्बल ४३७ गोळ्या सापडल्या. वाडी बुद्रुक इथल्या एका मुलानं पोलिसांना याबाबत माहिती देताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस मुख्यालयातल्या शस्त्रागार शाखेतील तज्ञांच्या मदतीने ही काडतुसं तपासण्यात आली. ही काडतुसं ४६ वर्षांपूर्वी १९७८ मधे तयार झालेली असून, ती सर्व निकामी झाली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

****

टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला कालपासून सुरुवात झाली. अमेरिकेतल्या डलास इथं काल झालेल्या पहिल्या सामन्यात अमेरिका संघानं कॅनडा संघावर सात गडी राखत विजय मिळवला. काल अन्य एका सामन्यात वेस्ट इंडिजनं पापुआ न्यू गिनी संघाचा पाच गडी राखून पराभव केला. आज या स्पर्धेत नामिबिया आणि ओमान संघात सध्या सामना सुरु आहे.

दरम्यान, या स्पर्धेतला भारताचा पहिला सामना येत्या पाच तारखेला आयर्लंडविरुद्ध होणार आहे.

****

नार्वे बुद्धीबळ स्पर्धेच्या पाचव्या सत्रात भारतीय बुद्धिबळपटू आर प्रज्ञानंद यानं जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या अमेरिकाच्या फॅबियानो कारुआना ला हरवत, जगातल्या दहा बुद्धिबळ खेळाडूंच्या यादीत प्रवेश केला आहे. या स्पर्धेत प्रज्ञानंद सध्या साडे आठ अंक मिळवत तिसऱ्या स्थानावर आहे.

****

तैवान ॲथलॅटिक्स खुल्या स्पर्धेत ८०० मीटर शर्यतीत भारताच्या अंकेश चौधरीनं सुवर्णपदक तर सोमनाथ चौहाननं रौप्य पदक पटकावलं. अंकेशनं एक मिनिट ५० पूर्णांक ६३ सेकंदात तर सोमनाथला १ मिनिट ५० पूर्णांक ८८ सेकंदात आठशे मीटरचं अंतर पूर्ण केलं.

****

भारताचा मुष्टीयोद्धा अमित पंघाल याचा पॅरिस ऑलिम्पिकमधला प्रवेश निश्चित झाला आहे. अमितनं बँकॉकमध्ये सुरु असलेल्या जागतिक मुष्टियुद्ध पात्रता स्पर्धेत पुरुषांच्या ५१ किलो वजनी गटात, चीनच्या लियू चुआंग याच्यावर पाच - शून्य अशी मात केली.

****

नांदेड शहर आणि परिसरात काल सायंकाळी ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यासाठी पाच जूनपर्यंत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

लातूर शहरासह जिल्ह्यात अनेक भागात काल हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. रेणापूर, देवणी, शिरूर अनंतपाळ, तसंच औसा तालुक्यातही पावसाने हजेरी लावली.

**

नैऋत्य मोसमी पावसाने काल आणखी काही भाग व्यापला असून, येत्या दोन तीन दिवसात अरबी समुद्राच्या पुढच्या भागात दाखल होण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचं, हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, येत्या पाच जूनपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 13.04.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 13 April 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्र...