Thursday, 6 June 2024

TEXT-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 06.06.2024 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 06 June 2024

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ० जून २०२४ सायंकाळी ६.१०

****

·      एनडीएकडून नवीन सरकार स्थापनेबाबत हालचालींना वेग, भाजप-संयुक्त जनता दलाची नवी दिल्लीत बैठक

·      नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत देशात ६५ टक्के तर राज्यात ६१ टक्के मतदान

·      राज्यसभेच्या महाराष्ट्रातील एक आणि केरळच्या तीन जागांसाठी आज अधिसूचना जारी

·      रायगडासह राज्यात तीनशे पन्नासावा शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह

आणि

·      नैऋत्य मोसमी पाऊस आज महाराष्ट्रात दाखल, सिंधुदुर्ग, रत्नागिरीत पावसाच्या सरी

****

राष्ट्रीय लोकशाही आघाडी-एनडीएकडून नवीन सरकार स्थापनेबाबत हालचाली तीव्र झाल्या आहेत. याच अनुषंगानं भाजप अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी आज नवी दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीला अमित शहा, राजनाथ सिंह, विनोद तावडे आणि इतर ज्येष्ठ नेते उपस्थित होते. संयुक्त जनता दलाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पार पडली. एनडीएच्या नेत्यांनी एकमताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नेतेपदी निवड केल्याच्या एका दिवसानंतर या बैठका झाल्या. दरम्यान, एनडीएत समाविष्ट घटक पक्षाची बैठक उद्या नवी दिल्लीत होणार आहे. या बैठकीत भाजपसह मित्रपक्षांचे नवनिर्वाचित खासदार उपस्थित राहतील.

****

देशात सात टप्प्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत ६५ पूर्णांक ७९ टक्के मतदान झालं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं आज ही नवीन आकडेवारी जाहीर केली. या निवडणुकीत ६५ पूर्णांक ८० टक्के पुरुष आणि ६५ पूर्णांक ७८ टक्के महिलांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. महाराष्ट्रात एकूण ६१ पूर्णांक ३३ टक्के इतकं मतदान झालं असून ६३ पूर्णांक ४५ टक्के पुरुषांनी तर ५९ टक्के महिलांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

****

राज्यसभेच्या महाराष्ट्रातील एक आणि केरळच्या तीन जागांसाठी आज अधिसूचना जारी करण्यात आली आहे. महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी राजीनामा दिल्यामुळे एक जागा रिक्त झाली आहे. तर, केरळमधील तीन सदस्यांचा कार्यकाल पूर्ण झाला आहे. दोन्ही राज्यातील राज्यसभा सदस्यत्वासाठी १३ जूनपर्यंत नामांकन दाखल करता येणार आहेत. तर, २५ जून रोजी मतदान होणार आहे.

****

मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीत, राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल कसलीही चर्चा झाली नसून याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे निर्णय घेणार असल्याचं राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि नवनिर्वाचित खासदार सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलं. बैठकीनंतर तटकरे प्रसार माध्यमांशी बोलत होते. दिल्लीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी एनडीएने बोलावलेल्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि आपण स्वत: उपस्थित राहणार असल्याचं तटकरे यांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार शरद पवार यांच्या संपर्कात असल्याचं वृत्त तटकरे यांनी फेटाळून लावलं. पक्षाच्या सर्व आमदारांचा अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास असून सर्व आमदार बोलावलेल्या बैठकीला येणार आहेत, असंही तटकरे यांनी यावेळी स्पष्ट केलं.

****

राज्यात केंद्र सरकारपेक्षा राज्य सरकारच्या विरोधात अधिक नाराजी असून येत्या विधानसभेत राज्य सरकारला याचा मोठा फटका बसणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. अजित पवार गटाच्या आमदारांना पक्षात परत घेण्याबाबत योग्यवेळी भाष्य केले जाईल, असंही पाटील यांनी यावेळी स्पष्ट केलं. पक्षाचा स्थापना दिवस येत्या १० जून रोजी अहमदनगर इथं मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार असून महागाई, जीएसटी या प्रश्नांवर यापुढे आवाज उठवला जाईल असं जयंत पाटील यांनी यावेळी सांगितलं.

****

राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन १० जूनऐवजी २७ जूनपासून सुरू होणार असल्याची माहिती मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज दिली आहे.

****

छत्रपती शिवाजी महाराज यांचा तिनशे पन्नासावा शिवराज्याभिषेक सोहळा आज रायगडावर मोठ्या थाटात साजरा केला जात आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्यात सहभागी होण्यासाठी देशभरातून हजारो शिवभक्त रायगडावर आले आहेत. संपूर्ण रायगड फुलांनी सजविण्यात आला असून आज सकाळी ढोल ताशांच्या गजरात शिवरायांना छत्रपती संभाजी राजे यांच्या उपस्थितीत मानवंदना देण्यात आली. यावेळी मर्दानी खेळ, शाहिरी नजराणा, पालखी सोहळाही पार पडला. दरम्यान, मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनीही रायगडावर येऊन शिवरायांना अभिवादन केलं.

****

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त आज राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना आदरांजली वाहिली.

नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय कलादालनातही या सोहळ्यानिमित्त विशेष प्रदर्शन भरवण्यात आलं असून राज्यात ठिकठिकाणी शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होत आहे. छत्रपती संभाजीनगर इथं क्रांती चौक परिसरात आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास शिवभक्तांकडून अभिवादन करण्यात येत आहे. या ठिकाणी आज सायंकाळी मराठा सेवा संघाच्या वतीने शाहीर पोवाडा आणि व्याख्यानही होत आहे. परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यातही शिवराज्याभिषेक साजरा करण्यात येत आहे.

****

महाराष्ट्रातल्या गडचिरोली जिल्ह्यात काल पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. यात कोणीही जखमी झालं नाही. पोलिसांनी यावेळी स्फोटकं, वायर, बॅटरी, पुस्तकं आणि अन्य साहित्य जप्त केलं आहे. हे नक्षलवादी तेंदूपत्ता कंत्राटदारांकडून खंडणी वसूल करण्यासाठी आले होते, असं पोलिसांनी सांगितलं.

****

५८, ५९ आणि ६० व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांच्या प्रवेशिका सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता १४ जून पर्यंत प्रवेशिका सादर करता येणार आहेत. निर्मात्यांनी अनुक्रमे सन २०२०, २०२१ आणि २०२२ या वर्षात सेन्सॉर प्राप्त झालेल्या मराठी चित्रपटांच्या प्रवेशिका दिलेल्या विहित मुदतीत सादर करण्याचे आवाहन महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील यांनी केलं आहे.

****

नैऋत्य मोसमी पावसाचं आज महाराष्ट्रात आगमन झालं आहे. मान्सून कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी तसंच सोलापुरात पोहचला. पुणे इथल्या हवामान विभागाचे प्रमुख के. एस. हौसाळीकर यांनी ही माहिती दिली. दरम्यान, सिंधुदुर्ग इथं कालपासून तर रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून पाऊस सुरु आहे. गेल्या २४ तासांत लांजा इथं सर्वाधिक १८ पूर्णांक ८० मिलिमीटर पावसाची, तर दापोलीत १६ पूर्णांक ६२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. रत्नागिरी तालुक्यात आजही पावसाच्या सरी कोसळल्या असून वाशिम जिल्ह्यातही सायंकाळी पावसानं हजेरी लावली आहे.

****

नंदुरबार जिल्ह्यात शेती मशागतीच्या कामांची लगबग सुरु झाली आहे. जिल्ह्यात शहादा, प्रकाशा पट्ट्यात मिरची लागवडीची तयारी सुरु असून यासाठी नाशिक आणि इतर ठिकाणांहून मिरचीचे रोपं मागवण्यात आले आहेत. यंदा मान्सून चांगल्या प्रमाणात झाल्यास, भरघोस पिकाची अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे.

****

परभणी जिल्ह्यातल्या ताडकळस परिसरात आज झालेल्या अपघातात पिता पुत्राचा मृत्यू झाला तर आठजण जखमी झाले आहेत. ताडकळस परिसरात उभ्या असलेल्या बोलोरो जीपला भाजीपाला घेऊन जाणाऱ्या भरधाव पिकअपनं धडक दिल्यानं हा अपघात झाला. हे सर्वजण जिंतूर तालूक्यातल्या कोक इथले रहिवासी आहेत.

****

धुळे जिल्ह्यात आजपासून २१ जूनपर्यंत अतिसार नियंत्रण पंधरवडा राबवला जाणार आहे. जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन बोडके यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. या मोहिमेत अतिसार व्यवस्थापनासाठी जागरुकता निर्माण करणं, अतिसाराच्या प्रकरणाच्या व्यवस्थापनासाठी तरतूद करणं, ओआरएस आणि झिंग कॉर्नरची स्थापना करण्यासह मोहिम प्रभावी राबवण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी दिल्या आहेत.

****

जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्त्य साधून बीड जिल्ह्यातल्या किल्ले धारुर आणि घागरवडा इथं भारतीय सेनेच्या इको बटालियनच्या वतीनं दहा हजार वृक्षारोपण केलं जात आहे.

भारतीय सेनेची बी कंपनी १३६ इको बटालियन ही तुकडी बीड जिल्ह्यात वृक्षआच्छादन आणि वनआच्छादन वाढविण्यासाठी कार्यरत आहे. यंदा आणि पुढील वर्षात इको बटालियनमार्फत धारुर तालुक्यात किल्ले धारुर आणि घागरवडा येथे सव्वा दोन लाख वृक्ष लागवड करणार आहे.

****

महाग्रामीण नवचेतना संवाद यात्रेला छत्रपती संभाजीनगर इथून सुरुवात झाली आहे. शेतकरी वर्गाला पीक कर्ज नुतनीकरण, व्याज परतावा आणि शासनाच्या प्रोत्साहनपर योजनांचं महत्व पटवून देत यात्रेच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी संवाद साधला जाणार आहे. बीड जिल्ह्यात ही संवाद यात्रा येत्या नऊ, दहा आणि अकरा तारखेपर्यंत जनजागृती करणार आहे. बँकेची योजना, शेतकरी सन्मान योजना आणि इतर माहिती दिली जाणार आहे. ही संवाद यात्रा मराठवाड्यात ११ दिवस असेल.

****

नांदेड इथं येत्या मंगळवारी ११ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ११ वाजता पेन्शन अदालतीचं आयोजन करण्यात आले आहे. सेवानिवृत्त झालेले अधिकारी कर्मचारी यांनी अडचणी निवारण्यासाठी पेन्शन अदालतीच्या दिवशी उपस्थितीत राहून तक्रारीचे निवेदन द्यावेत, असे आवाहन नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 24.04.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 24 April 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्र...