Friday, 7 June 2024

TEXT-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 07.06.2024 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 07 June 2024

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ० जून २०२४ सायंकाळी ६.१०

****

·      एनडीएचा राष्ट्रपतींकडे सत्तास्थापनेचा दावा-रविवारी नव्या सरकारचा शपथविधी

·      सुशासनासह नागरिकांच्या जीवनात किमान हस्तक्षेपाला प्राधान्य-पंतप्रधान नरेंद्र मोदी

·      कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची माघार

·      १८व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं येत्या १५ ते २१ जून दरम्यान आयोजन

आणि

·      ज्ञानराधा पतसंस्थेचे प्रमुख सुरेश कुटे तसंच अर्चना कुटे चौकशीसाठी पोलिसांच्या ताब्यात

****

भाजपचे नेते नरेंद्र मोदी रविवारी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती भवनात सायंकाळी सहा वाजता हा शपथग्रहण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी-एनडीएच्या नेत्यांनी आज राष्ट्रपतींची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला, त्यानंतर केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ही माहिती दिली.

त्यापूर्वी, संसदेच्या केंद्रीय सभागृहात झालेल्या एनडीएच्या बैठकीत सर्वानुमते नरेंद्र मोदी यांची नेतेपदी निवड करण्यात आली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, बिहारचे मुख्यमंत्री नीतीशकुमार, तेलगूदेशम पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू, लोक जनशक्ती पक्षाचे प्रमुख चिराग पासवान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार, जनसेना प्रमुख पवन कल्याण, अपना दलच्या अनुप्रिया पटेल आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाचे नेते एच डी कुमारस्वामी यांनी मोदींच्या नावाला पाठिंबा दर्शवला.

यावेळी बोलतांना मोदी यांनी, एनडीए फक्त राजकीय पक्षांचा गट नाही तर ‘राष्ट्र प्रथम’ या तत्वानं एकत्रित आलेला कटीबद्ध समूह असल्याचं प्रतिपादन केलं. सुशासन, विकास, जीवनमान दर्जा उंचावणं आणि नागरिकांच्या जीवनात किमान हस्तक्षेप याला सरकारचं प्राधान्य असेल, असं मोदी म्हणाले.

दरम्यान, एनडीएच्या बैठकीनंतर मोदी यांनी आज भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी तसंच माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली.

****

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात १७ जागा लढवून १४ जागांवर विजय मिळवला, हे कार्यकर्त्यांच्या एकजुटीचं यश असल्याचं, पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी म्हटलं आहे. आज मुंबईत काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदारांचा सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणूक हे आपलं लक्ष्य असून, त्यातही असाच लढा देऊ, असा निर्धार चेन्नीथला यांनी व्यक्त केला

****

राज्य विधानपरिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं माघार घेतली आहे. मनसेतर्फे अभिजीत पानसे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र आज मुदतीच्या शेवटच्या दिवशी त्यांनी अर्ज न भरण्याचा निर्णय घेतला. या निवडणुकीसाठी शिवसेनेचे संजय मोरे, भाजपचे निरंजन डावखरे तसंच राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार गटाचे अमित सरैय्या रिंगणात आहेत.

दरम्यान, मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी भाजपचे उमेदवार किरण शेलार यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला.

****

भारतीय रिजर्व्ह बॅंकेनं व्याजदरात कोणताही बदल केला नसून, रेपो दर सहा पूर्णांक पाच टक्के इतका कायम ठेवला आहे. मुंबईत बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढावा बैठकीनंतर गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा दर सात पूर्णांक दोन टक्के राहील, तर महागाईचा दर साडे चार टक्के राहील, असा अंदाज दास यांनी व्यक्त केला.

****

१८ वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव येत्या १५ ते २१ जून, दरम्यान मुंबईत आयोजित करण्यात आला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी ही माहिती दिली. या चित्रपट महोत्सवातील चित्रपटांचं प्रदर्शन मुंबईसोबतच दिल्ली, चेन्नई, पुणे, तसंच कोलकाता इथं केलं जाणार असल्याचं, जाजू यांनी सांगितलं. यंदा या महोत्सवाच्या स्पर्धा विभागात ३८ देशांमधून ६५ भाषांमधील तब्ब्ल एक हजार १८ चित्रपटांची नोंदणी झाली आहे. भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेला आणि यंदा ७७ व्या कान चित्रपट महोत्सवात गौरवण्यात आलेला “सनफ्लॉवर्स वेअर द फर्स्ट वन टू नो" हा लघुपटही या महोत्सवात दाखवला जाणार आहे.

****

ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेचे प्रमुख सुरेश कुटे, अर्चना कुटे आणि संचालक आशिष पाटोदेकर यांना बीड पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. आज पहाटे बीड पोलिसांनी कुटे यांच्या पुण्यात हिंजवडी इथल्या घरी जाऊन त्यांना ताब्यात घेतलं.

‘द कुटे उद्योग समूहा’चे प्रमुख असलेले सुरेश कुटे आणि अर्चना कुटे यांच्या ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटीत महाराष्ट्राच्या विविध भागांसह इंदूरपर्यंत ५० शाखा आणि साडेसहा लाख ठेवीदार आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात कुटे समूहाची आयकर विभागाने तसंच सक्तवसुली संचालनालयाने तपासणी केल्यावर ज्ञानराधा पतसंस्थेतून ठेवीदारांनी ठेवी काढून घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर कुटे यांनी पतसंस्थेच्या सर्व शाखा बंद करत, ठराविक मुदतीत ठेवीदारांना पैसे परत करण्याची आश्वासनं दिली, मात्र त्यांची पूर्तता केली नाही. या प्रकरणी कुटे यांच्याविरोधात माजलगाव इथं दोन गुन्हे दाखल झाले.

****

महावितरण कंपनीच्या वतीनं राज्यभरात लवकरच विजेचे प्रीपेड स्मार्ट मीटर बसवण्याबाबतच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर इथल्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं याविरोधात आंदोलन पुकारण्यात आलं आहे. समाज माध्यमांवर वीजमीटर विरोधात जन समर्थन एकत्रित करण्याचं काम याद्वारे सुरू करण्यात आलं आहे. तसंच सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र दाते पाटील यांनी मीटर विरोधात सविस्तर पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिले असून शासनानं याबाबत सकारात्मक निर्णय घेतला नाही तर मुंबई उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचा इशारा पाटील यांनी दिला आहे

****

तलाठी हा महसूल यंत्रणेचा गावपातळीवर काम करणारा अत्यंत महत्त्वाचा घटक असून हे पद महसूल प्रशासनाचा पाया आहे. त्यामुळे तलाठ्यांनी विश्वस्त म्हणून काम करावं अशी अपेक्षा छत्रपती संभाजीनगर चे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी व्यक्त केली. छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनात नव्यानं रुजू झालेल्या ५३ तलाठ्यांना आज जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षण देण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. नवनियुक्त तलाठ्यांना सुप्रशासन, जबाबदारी, कार्यपद्धत या विषयावर याप्रसंगी मार्गदर्शन करण्यात आलं.

 

दरम्यान, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ९ तालुक्यामधील, नवनियुक्त ३८२ शिक्षकांना नवे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी दोन दिवसीय प्रशिक्षण वर्गात मार्गदर्शन करण्यात आलं. या कार्यशाळेत शिक्षकाचं कार्य-कर्तृत्व, जवाबदारी, जिल्हा परिषदेच्या सेवा शर्ती अधिनियम, मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार, नवीन शैक्षणिक धोरण या विषयी पवित्र प्रणाली च्या माध्यमातून माहिती देण्यात आली, असं प्रशिक्षण देणारी ही राज्यातली पहिलीच जिल्हा परिषद ठरली असल्याचं, जिल्हा परिषदेनं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

****

हिंगोली जिल्ह्यात नरसी नामदेव इथल्या शेतकऱ्यांनी आज नरसी इथल्या ३३ किलोव्हॅट उपकेंद्रासमोर जनावरांसह ठिय्या आंदोलन केलं. या परिसरातील हनवतखेडा, कडती, चांगेफळ या भागात मागील दोन महिन्यापूर्वी वादळी वाऱ्यामुळं शेतात विजेचे खांब पडले, वीज वाहिन्या देखील तुटून पडल्या आहेत. मात्र दोन महिन्यापासून हे खांब उचलण्यात आले नाहीत, असा आरोप या शेतकऱ्यांनी केला आहे. आता शेतीच्या मशागतीस त्याचा अडथळा निर्माण होत असल्यानं आज हे आंदोलन केल्याचं, शेतकऱ्यांनी सांगितलं.

****

राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते काल राज्यातल्या ११५ पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांना २०२१ च्या स्वातंत्र्य दिनी तसंच २०२२ च्या प्रजासत्ताक दिनी जाहीर झालेली पोलीस पदकं समारंभपूर्वक प्रदान करण्यात आली. यामध्ये बीड इथले पोलीस उपनिरीक्षक सूर्यकांत तुकाराम गुळभिळे यांनाही राष्ट्रपती पदक देऊन गौरवण्यात आलं.

****

बुलडाणा जिल्ह्यात मुंबई-नागपूर महामार्गावर आज सकाळी एक खासगी बस उलटून झालेल्या अपघातात ३० जण जखमी झाले. यापैकी ८ जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना सिंदखेड राजा आणि जालना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं स्थानिक पोलिसांनी सांगितलं.

****

छत्रपती संभाजीनगर शहरानजिक असलेल्या फारोळा इथल्या महावितरणच्या उपकेंद्रातील विद्युत यंत्रात बिघाड झाल्यानं आज शहराला होणारा पाणी पुरवठा विस्कळीत झाला. या असुविधेसाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आलं आहे.

****

पावसाळ्याच्या कालावधीत शहरात साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी लातूर शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. नागरिकांनीही कोरडा दिवस पाळण्यासह इतर उपायांच्या माध्यमातून सहकार्य करण्याचं आवाहन लातूर महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

****

नांदेड रेल्वे विभागातल्या कामांमुळे धर्माबाद-मनमाड-धर्माबाद मराठवाडा एक्सप्रेस अंशतः रद्द करण्यात आली आहे. आजपासून ते ११ जूनपर्यंत धर्माबाद - मनमाड ही गाडी जालना ते मनमाड दरम्यान, आणि मनमाड - धर्माबाद ही गाडी मनमाड ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान रद्द करण्यात आली आहे. तसंच नांदेड निझामुद्दीन एक्सप्रेस चिकलठाणा इथून ७० मिनिटे उशिरा सुटणार असल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागानं दिली आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 25.04.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 25 April 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छ...