Saturday, 8 June 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक:08.06.2024 रोजीचे सकाळी 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 08 June 2024

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०८ जून २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      एनडीएचा राष्ट्रपतींकडे सत्तास्थापनेचा दावा-उद्या सायंकाळी नव्या सरकारचा शपथविधी

·      नागरिकांच्या जीवनात किमान हस्तक्षेपासह सुशासनाला प्राधान्य-काळजीवाहू पंतप्रधान नरेंद्र मोदी

·      कोकण पदवीधर निवडणुकीतून मनसेची माघार-नाशिक शिक्षक मतदार संघासाठी ४० जणांचे ५३ अर्ज

·      बियाणं तसंच खतांच्या योग्य वितरणासाठी कृती दल निर्माण करण्याचे कृषी मंत्र्यांचे निर्देश

आणि

·      ज्ञानराधा प्रकरणात कुटे दाम्पत्याला १३ तारखेपर्यंत पोलिस कोठडी

****

भाजपचे ज्येष्ठ नेते काळजीवाहू पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सलग तिसऱ्या कार्यकाळासाठी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती भवनात उद्या सायंकाळी सहा वाजता हा शपथग्रहण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मोदी यांनी काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला, यावेळी राष्ट्रपतींनी त्यांना सत्ता स्थापनेचं आमंत्रण दिलं. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नेत्यांनीही काल राष्ट्रपतींची भेट घेऊन, नरेंद्र मोदी यांची संसदीय पक्षनेतेपदी निवड झाल्याचं, तसंच त्यांना सर्व घटक पक्षांचा पाठिंबा असल्याचं पत्र सादर केलं.

काल राष्ट्रीय लोकशाही आघाडी - एनडीएच्या बैठकीत सर्वानुमते नरेंद्र मोदी यांची नेतेपदी निवड करण्यात आली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, बिहारचे मुख्यमंत्री नीतीशकुमार, तेलगूदेशम पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू, लोक जनशक्ती पक्षाचे प्रमुख चिराग पासवान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार, जनसेना प्रमुख पवन कल्याण, अपना दलच्या अनुप्रिया पटेल आणि धर्मनिर्पेक्ष जनता दल नेते एच डी कुमारस्वामी यांनी मोदींच्या नावाला पाठिंबा दर्शवला.

यावेळी बोलतांना मोदी यांनी, एनडीए फक्त राजकीय पक्षांचा गट नाही तर राष्ट्र प्रथम या तत्वानं एकत्रित आलेला कटीबद्ध समूह असल्याचं प्रतिपादन केलं. सुशासन, विकास, जीवनमान दर्जा उंचावणं आणि नागरिकांच्या जीवनात किमान हस्तक्षेप याला सरकारचं प्राधान्य असेल, असं मोदी म्हणाले.

दरम्यान, काल एनडीएच्या बैठकीनंतर मोदी यांनी, भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी तसंच माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली.

****

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात १७ जागा लढवून १४ जागांवर विजय मिळवला, हे कार्यकर्त्यांच्या एकजुटीचं यश असल्याचं, पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी म्हटलं आहे. काल मुंबईत काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदारांचा सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणूक हे आपलं लक्ष्य असून, त्यातही असाच लढा देऊ, असा निर्धार चेन्नीथला यांनी व्यक्त केला.

****

राज्य विधानपरिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं माघार घेतली आहे. मनसेतर्फे अभिजीत पानसे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र काल मुदतीच्या शेवटच्या दिवशी त्यांनी अर्ज न भरण्याचा निर्णय घेतला. या निवडणुकीसाठी शिवसेनेचे संजय मोरे, भाजपाचे निरंजन डावखरे तसंच राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार गटाचे अमित सरैय्या रिंगणात आहेत. सरैया तसंच डावखरे यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केले. मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी भाजपचे उमेदवार किरण शेलार यांनीही काल उमेदवारी अर्ज दाखल केला.

**

नाशिक विधान परीषदेच्या नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघासाठी काल अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी प्रमुख पक्षांच्या ४० उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने विधीज्ञ संदीप गुळवे यांनी तर शिवसेनेच्या वतीने विद्यमान आमदार किशोर दराडे यांनी अर्ज दाखल केला आहे. काल अखेरच्या दिवसापर्यंत ४० उमेदवारांनी ५३ अर्ज दाखल केले आहेत.

****

भारतीय रिजर्व्ह बॅंकेनं व्याजदरात कोणताही बदल केला नसून, रेपो दर सहा पूर्णांक पाच टक्के इतका कायम ठेवला आहे. मुंबईत बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढावा बैठकीनंतर गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा दर सात पूर्णांक दोन टक्के राहील, तर महागाईचा दर साडे चार टक्के राहील, असा अंदाज दास यांनी व्यक्त केला.

****

१८ वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव येत्या १५ ते २१ जून, दरम्यान मुंबईत आयोजित करण्यात आला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी ही माहिती दिली. या चित्रपट महोत्सवातील चित्रपटांचं प्रदर्शन मुंबईसोबतच दिल्ली, चेन्नई, पुणे, तसंच कोलकाता इथं केलं जाणार आहे. यंदा या महोत्सवाच्या स्पर्धा विभागात ३८ देशांमधून ६५ भाषांमधील तब्ब्ल एक हजार १८ चित्रपटांची नोंदणी झाली आहे.

****

यंदाच्या खरीप हंगामात बियाणं तसंच खतांच्या योग्य वितरणासाठी कृती दल निर्माण करण्याचे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत. काल मंत्रालयात यासंदर्भात झालेल्या आढावा बैठकीत मुंडे बोलत होते.

यावर्षी खरिपाच्या क्षेत्रात एक लाख दहा हजार हेक्टरने वाढ झाली आहे. सध्याची एकूण बियाणे मागणी ही १८ लाख क्विंटल इतकी असून, त्यापैकी १३ लाख क्विंटल वितरीत केलं असून आणखी सहा लाख क्विंटल बियाणं वितरणाची तयारी असल्याची माहिती, मुंडे यांनी दिली.

****

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. आंतरवाली सराटीच्या उपसरपंचांसह ७० जणांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत जरांगे यांना आंदोलनासाठी परवानगी देऊ नये, असं म्हटलं होतं. जरांगे मात्र आजपासून पुन्हा एकदा जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं आमरण उपोषणाच्या निर्णयावर कायम आहेत.

****

राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते राज्यातल्या ११५ पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांना २०२१ च्या स्वातंत्र्य दिनी तसंच २०२२ च्या प्रजासत्ताक दिनी जाहीर झालेली पोलीस पदकं समारंभपूर्वक प्रदान करण्यात आली. यामध्ये बीड इथले पोलीस उपनिरीक्षक सूर्यकांत तुकाराम गुळभिळे यांनाही राष्ट्रपती पदक देऊन गौरवण्यात आलं.

****

ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेचे प्रमुख सुरेश कुटे, अर्चना कुटे आणि संचालक आशिष पाटोदेकर यांना न्यायालयानं १३ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. बीड पोलिसांनी काल पहाटे कुटे यांच्या पुण्यातल्या हिंजवडी इथल्या घरातून त्यांना ताब्यात घेत, माजलगाव न्यायालयासमोर सादर केलं, न्यायालयानं त्यांना येत्या गुरुवापर्यंत सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. ठेवीदारांना जादा व्याजदराचे आमिष दाखवून घेतलेल्या ठेवी परत केल्या नाहीत, या प्रकरणी कुटे यांच्यासह पतसंस्थेच्या संचालक मंडळावर जिल्ह्यात वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांत नऊ गुन्हे दाखल आहेत.

****

मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर परिसरात एक चारचाकी वाहन मालवाहू ट्रकवर पाठीमागून धडकल्याने झालेल्या अपघातात एकाच कुटूंबातील तिघांचा मृत्यू झाला, तर इतर ४ जण जखमी झाले. चालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

लातूर जिल्ह्यातल्या उमरगा तालुक्यात एका टेंपोने चारचाकीला दिलेल्या धडकेत काल दोन जण ठार तर एक जण जखमी झाला. उमरगा-लातूर मार्गावरच्या बाबळसुर पाटीजवळ हा अपघात झाला.

****

लातूर जिल्ह्यात पावसाच्या पुरात वाहून गेल्यानं एका महिलेचा मृत्यू झाला. देवणी तालुक्यातल्या कमालवाडीत गुरुवारी अलेल्या पुरामध्ये ही महिला वाहून गेली होती, काल तिचा मृतदेह सापडला.

****

बीड जिल्ह्यातल्या केज इथं एका खासगी शाळेच्या मुख्याध्यापकाला विद्यार्थाकडून ३ हजार रुपयांची लाच घेतांना काल लाचलुचपत विभागाने रंगेहात अटक केली. धनराज सखाराम सोनवणे असं मुख्याध्यापकाचं नाव असून, शाळेच्या दाखल्याची दुसरी प्रत देण्यासाठी त्याने तक्रारदार विद्यार्थाकडे लाचेची मागणी केली होती.

****

महावितरण कंपनीच्या विजेचे प्रीपेड स्मार्ट मीटर बसवण्याविरोधात छत्रपती संभाजीनगर इथं भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शाखेच्या वतीनं आंदोलन पुकारण्यात आलं आहे. समाज माध्यमांवर वीजमीटर विरोधात जन समर्थन एकत्रित करण्याचं काम याद्वारे सुरू करण्यात आलं आहे. तसंच सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र दाते पाटील यांनी मीटर विरोधात सविस्तर पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलं आहे.

****

हिंगोली जिल्ह्यात नरसी नामदेव इथल्या शेतकऱ्यांनी काल नरसी इथल्या वीज उपकेंद्रासमोर जनावरांसह ठिय्या आंदोलन केलं. या परिसरातील दोन महिन्यापूर्वी वादळी वाऱ्यामुळं शेतात विजेचे खांब पडले, वीज वाहिन्या देखील तुटून पडल्या. मात्र अद्याप हे खांब उचलण्यात आले नाहीत, असा आरोप या शेतकऱ्यांनी केला आहे. आता शेतीच्या मशागतीस त्याचा अडथळा निर्माण होत असल्यानं हे आंदोलन केल्याचं, शेतकऱ्यांनी सांगितलं.

****

पावसाळ्याच्या कालावधीत शहरात साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी लातूर शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. नागरिकांनीही कोरडा दिवस पाळण्यासह इतर उपायांच्या माध्यमातून सहकार्य करण्याचं आवाहन लातूर महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

****

नांदेड रेल्वे विभागातल्या कामांमुळे धर्माबाद-मनमाड-धर्माबाद मराठवाडा एक्सप्रेस अंशतः रद्द करण्यात आली आहे. ११ जूनपर्यंत धर्माबाद-मनमाड ही गाडी जालना ते मनमाड दरम्यान, आणि मनमाड - धर्माबाद ही गाडी मनमाड ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान रद्द करण्यात आली आहे. तसंच नांदेड निझामुद्दीन एक्सप्रेस चिकलठाणा इथून ७० मिनिटे उशिरा सुटणार असल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागानं दिली आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 25.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 25 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...