Saturday, 2 November 2024

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: ०२ नोव्हेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 02 November 2024

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: ०२ नोव्हेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.

****

प्रकाशाचा उत्सव असलेल्या दिवाळीच्या सणामध्ये आज बलिप्रतिपदा अर्थात विक्रम संवत्सराचा पाडवा साजरा होतो आहे. पती-पत्नीच्या नात्यात दिवाळीच्या पाडव्याचं विशेष महत्त्व असून व्यापारी वर्गाच्या नवीन आर्थिक वर्षाची सुरुवातही आजपासून होते. कृषीवलांच्या संस्कृतीमध्येही बळीराजाची आगळी महती आहे. गावागावांमध्ये सुरू असणाऱ्या काकड आरतीमध्ये आज अन्नकुट अर्थात गोवर्धन पूजेची परंपरा जपली जाते.

****

दिवाळी आणि छटपूजा सणांच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रवाशांच्या संख्येत होणारी वाढ लक्षात घेऊन मध्य रेल्वेनं आज आणि उद्या म्हणजे २ आणि ३ नोव्हेंबर रोजी अतिरिक्त विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत दोन्ही दिवस मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि पनवेल या स्थानकांवरून गोरखपूर, दानापूर, छपरा, काझीपेठ या ठिकाणांसाठी प्रत्येकी ५ गाड्या सोडल्या जाणार आहेत. त्याचबरोबर हडपसर-हिसार-हडपसर दरम्यान साप्ताहिक विशेष गाडी सोडण्याचा निर्णयही मध्य रेल्वेनं घेतला आहे. ४ नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबर दरम्यान ही गाडी सोडण्यात येणार आहे.

****

प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय युवा पुरस्कार २०२२-२३ साठी अर्ज करण्याचं आवाहन केंद्रीय युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांनी युवकांना केलं आहे. १५ ते २९ वर्ष वयोगटातल्या व्यक्ती तथा संस्था-संघटनांना विकास आणि समाज सेवेच्या विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य तथा योगदानासाठी हे पुरस्कार दिले जातात. या क्षेत्रांमध्ये मानवाधिकाराला प्रोत्साहन देण्यासठी केलेलं कार्य तसंच सामुहिक सेवांचा समावेश आहे. गृह मंत्रालयाच्या पोर्टलवर येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत या पुरस्कारासाठी अर्ज करता येणार आहे. वैयक्तिक समाजसेवेसाठी १ लाख रुपये रोख, पदक आणि प्रमाणपत्र तर संस्था संघटनांना ३ लाख रुपये रोख असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. 

****

भारत-अमेरिका संयुक्त विशेष सैन्य दलाच्या वज्र प्रहार सरावाच्या पंधराव्या आवृत्तीसाठी भारतीय सैन्य दल आज अमेरिकेला रवाना झालं. हा सराव २ ते २२ नोव्हेंबर दरम्यान अमेरिकेतील इदाहो मधील ऑर्चर्ड कॉम्बॅट ट्रेनिंग सेंटर इथे आयोजित केला जाणार आहे. भारतीय आणि अमेरिकेच्या सैन्यादरम्यानचा हा या वर्षातील दुसरा सराव असेल. परस्पर सहकार्याने केलं जाणारं कार्य, संयुक्तता आणि विशेष मोहिमांच्या रणनीतींची परस्पर देवाणघेवाण वाढवून भारत आणि अमेरिका यांच्यातील लष्करी सहकार्याला चालना देणं हे वज्र प्रहार या सरावाचं उद्दिष्ट आहे. या सरावामुळे वाळवंटी आणि अर्ध वाळवंटी वातावरणात संयुक्त विशेष दलाची मोहीम राबवण्याची एकत्रित क्षमता वाढेल. उच्च दर्जाची शारीरिक तंदुरुस्ती, संयुक्त नियोजन आणि संयुक्त रणनीतिक अभ्यास यावर या सरावात भर दिला जाईल. संयुक्त सरावात भाग घेणाऱ्या दोन्ही देशांच्या तुकड्यांमध्ये प्रत्येकी ४५ जवान असतील. 

****

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे येत्या मंगळवारपासून म्हणजे ५ नोव्हेंबरपासून आपल्या प्रचार दौऱ्याला प्रारंभ करणार आहेत. पहिल्या दिवशी ते रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतील. पहिल्या टप्प्यात ८ विधानसभा मतदारसंघांचा दौरा उद्धव ठाकरे करणार आहेत. ५ नोव्हेंबर या दिवशी सायंकाळी ६ वाजता ते रत्नागिरी आणि राजापूर विधानसभा मतदारसंघांसाठी प्रचार करतील. दुसऱ्या दिवशी ६ नोव्हेंबरला दुपारी ३ वाजता भिवंडी ग्रामीण विधानसभा, सायंकाळी ७ वाजता वांद्रे-कुर्ला संकुल मैदानात महाविकास आघाडीची सभा, ७ नोव्हेंबरला दुपारी ३ वाजता दर्यापूर विधानसभा, सायंकाळी ५ वाजता बडनेरा विधानसभा, ८ नोव्हेंबर दुपारी ३ वाजता बुलढाणा विधानसभा, सायंकाळी ५ वाजता मेहकर विधानसभा, सायंकाळी ७ वाजता परतूर विधानसभा असा  उद्धव ठाकरे यांचा दौरा आहे.

दरम्यान महाविकास आघाडीच्या संयुक्त प्रचाराचा प्रारंभ येत्या बुधवारी ६ नोव्हेंबर रोजी होणार आहे. मुंबईत बीकेसी मैदानावर ६ नोव्हेंबरला महाविकास आघाडीची सभा होणार असून या सभेला  लोकसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेस नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत.

****

विधानसभा निवडणूकमध्ये आरोप-प्रत्यारोप वाढू लागले आहेत.मुंबईतील प्रतिष्ठेचा बनलेल्या माहीम विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आम्हाला विश्वासात न घेता आपल्या मुलाला उमेदवारी दिली असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. या मतदारसंघात सध्या शिवसेनेचा आमदार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर शिवसेना आमदार सदा सरवणकर यांनी आपण माघार घेणार नसल्याचे पुन्हा स्पष्ट केले आहे. 

****


No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 08.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 08 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...