Saturday, 2 November 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 02.11.2024 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 02 November 2024

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०२ नोव्हेंबर २०२४ सायंकाळी ६.१०

**** 

• केंद्रीय गुप्तचर यंत्रणेच्या सतर्कता इशाऱ्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत वाढ. 

• विधानसभा निवडणुकीत उमेदवाराकडून नमुना मतपत्रिका छापण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी.

• बलिप्रतिपदा अर्थात दिवाळीचा पाडवा विविध वस्तूंच्या खरेदीने सर्वत्र साजरा.

आणि

• मुंबई क्रिकेट कसोटीत न्यूझीलंडची भारताविरुद्ध दुसऱ्या डावात १४३ धावांची आघाडी. 

****

केंद्रीय गुप्तचर यंत्रणांकडून आलेल्या सतर्कतेच्या इशाऱ्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सध्या फडणवीस यांना झेड दर्जाची सुरक्षा पुरवली जाते. केंद्रीय गुप्तचर यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार फडणवीस यांच्या जीविताला धोका असून, तसे  कट रचले जात असल्याची माहिती, गुप्तचर यंत्रणांकडून राज्यातील यंत्रणांना देण्यात आली. त्यानंतर सतर्क झालेल्या राज्य पोलिस दलाने तत्काळ फडणवीस यांच्या सुरक्षेचा संपूर्ण आढावा घेत, सुरक्षेत वाढ केली. आता नेहमीच्या बंदोबस्तासोबत ‘फोर्स वन'चे १२ सैनिक देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत तैनात करण्यात आले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानी, नागपूर इथल्या निवासस्थानी तसंच त्यांच्या कार्यक्रमात सुरक्षा देण्याची सूचना पोलीस दलाला देण्यात आली आहे.

****

नवी मुंबई महापालिकेचे माजी उपमहापौर आणि काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यावेळी मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार निरंजन डावखरे आदी उपस्थित होते. फडणवीसांच्या उपस्थितीत अनिल कौशिक यांनी केलेल्या पक्षप्रवेशामुळे विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर नवी मुंबईतील काँग्रेसला मोठं खिंडार पडलं आहे.

****

भाजपाचे बंडखोर आमदार गोपाळ शेट्टी यांनी बोरीवली विधानसभा मतदारसंघातून माघार घेणार नसल्याचं स्पष्ट केलं. त्यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी ही भेट असल्याचं त्यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. आपण पक्ष सोडलेला नाही, पक्षानं आपल्याला बाहेर काढलं तरीही आपण पक्ष सोडणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली. आपलं प्रत्येक पाऊल पक्षाच्या हितासाठी, पक्षात राहून पक्षाची हानी करणाऱ्यांच्या विरोधात आहे, असं ते म्हणाले.

****

माहिमचे विद्यमान आमदार आणि महायुतीचे उमेदवार सदा सरवणकर यांनीही निवडणुकीतून माघार घेणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.  माहिम मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी माहिमची उमेदवारी जाहीर करताना विश्वासात घेतलं नसल्याचं म्हटलं आहे. 

****

विधानसभेच्या मतदानावेळी निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या कागदाच्या आकारातील मतपत्रिका, उमेदवाराला आता नमुना मतपत्रिका म्हणून छापता येणार नाहीत. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत त्यावर निर्बंध राहणार असल्याचं निवडणूक विभागाकडून सांगण्यात आलं. पॅम्प्लेट, पोस्टर, फ्लेक्स या प्रचार साहित्यावर प्रकाशक, मुद्रक आणि प्रकाशकाचे नाव, पत्ता आणि प्रतींची संख्या नसेल तर गुन्हा दाखल केला जाणार आहे. मात्र, आयोगाने निश्चित केलेल्या कागदावर नमुना मतपत्रिकेचा वापर उमेदवारांना करता येईल. दिवसा प्रचाराकरिता फिरणाऱ्या वाहनांबाबत सर्व राजकीय पक्ष, त्यांचे उमेदवार आणि इतर व्यक्तींनी निश्चित ठिकाणी ध्वनिक्षेपकाच्या वापरासंबंधी घेतलेल्या परवानगीची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यंत्रणेला कळवावी लागणार आहे.

****

दरम्यान, उमेदवारांनी आपल्या निवडणूक खर्चाकरिता स्वतंत्र बॅंक खाते उघडून त्यातूनच व्यवहार करणं आवश्यक असल्याचं, आयोगानं कळवलं आहे. उमेदवारांने निवडणूक खर्चासाठी असलेली संपूर्ण रक्कम संबंधित बँक खात्यामध्ये जमा करावी, आणि त्याच खात्यातून धनादेश, धनाकर्ष, आरटीजीएस, एनईएफटीद्वारे निवडणूक खर्च करणं आवश्यक आहे. उमेदवारांनी आपल्या विरोधात गुन्हे दाखल असल्याबाबतची जाहिरात प्रसिद्ध करणंही आवश्यक असणार आहे. जाहिरातीचा खर्च निवडणूक खर्चाची बाब म्हणून गणला जाणार आहे.  

****

अहमदनगर जिल्ह्यात सुपा टोलनाक्यावर एका गाडीतून २३ कोटी ७१ लाख रुपये किमतीची सोन्याची बिस्किटं आणि चांदी जप्त करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाचं पथक आणि पोलिसांनी या गाडीच्या संशयित हालचालींवरून गाडी थांबवून तपासणी केली असता, हा मुद्देमाल मिळाला. ही गाडी छत्रपती संभाजीनगर कडून पुण्याकडे निघाली असल्याचं चालकानं सांगितलं. याप्रकरणी पुढचा तपास सुरु आहे. 

****

येत्या २० नोव्हेंबरला होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याचं आवाहन परिवहन विभागाचे आयुक्त विवेक भीमनवार यांनी केलं आहे.

बाईट – विवेक भीमनवार

****

श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी सात वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल. 

****

उत्तराखंडमधल्या उत्तरकाशी जिल्ह्यातल्या चार धामपैकी एक असलेल्या गंगोत्री धामचे दरवाजे आजपासून बंद करण्यात आले. अन्नकूट उत्सवानिमित्त आज अभिजीत मुहूर्तावर भाविकांच्या उपस्थितीत मंदिराचे दरवाजे विधीपूर्वक बंद करण्यात आले. दर वर्षी हिवाळ्यामध्ये गंगोत्री धामचे दरवाजे बंद करण्यात येतात. या वर्षी आतापर्यंत आठ लाखांहून अधिक भाविकांनी गंगोत्री धामला भेट दिली आहे. याशिवाय रुद्रप्रयागमधल्या केदारनाथ धाम आणि उत्तरकाशीतल्या यमुनोत्री धामचे दरवाजेही बंद करण्याची तयारी सुरू झाली आहे. 

****

आज कार्तिक शुद्ध प्रतिपदा, बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडवा. हा दिवस साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक मानला जातो. त्यामुळे चांगल्या उपक्रमांची सुरुवात किंवा महत्त्वाची खरेदी आज केली जाते. घर, वाहन किंवा आभुषणं खरेदीसाठी आजचा मुहूर्त साधण्याकडे बहुतेकांचा कल असतो. आज बाजारपेठांमध्ये भेटवस्तू, तसंच मोबाईल फोन्स, आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदीही मोठ्या प्रमाणात होत आहे. मोठी दुकानं, मॉल्स, घाऊक बाजारपेठा, सराफकट्टे गजबजले आहेत. याशिवाय अनेकांनी ऑनलाईन खरेदीलाही पसंती दिली आहे. 

विक्रम संवत २०८१ ला आजपासून प्रारंभ झाला. देशाच्या अनेक भागात हा नववर्षाचा प्रारंभ मानला जातो. गुजराती नववर्षानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावर शुभेच्छा दिल्या. हे नवीन वर्ष सर्वांसाठी आनंद, सफलता, आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवो, अशी कामना त्यांनी व्यक्त केली आहे. आज देशभरात गोवर्धन पूजा साजरी झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गोवर्धन पूजेनिमित्त समाजमाध्यमावरून देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.

बहीण भावाच्या नात्यातला स्नेह वृद्धिंगत करणारा भाऊबीजेचा सण उद्या साजरा होत आहे, या पार्श्वभूमीवर बस स्थानकं तसंच रेल्वे स्थानकं प्रवाशांच्या गर्दीनं फुलून गेले आहेत.

****

गेल्या अनेक वर्षांपासून एकत्र दिवाळी साजरी करण्याची बारामतीच्या पवार कुटुंबियांची परंपरा आज खंडीत झाली. बारामतीमध्ये आज दिवाळी पाडवा साजरा झाला, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा आणि उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा वेगवेगळा पाडवा उत्सव पार पडला. शरद पवार यांचा पाडवा गोविंद बागेत तर अजित पवार यांचा पाडवा काटेवाडीत पार पडला. शरद पवारांनी माध्यमांशी संवाद साधताना, अनेक वर्षापासून चालत आलेली एकत्रित पाडवा साजरा करण्याची पद्धत कायम राहिली असती तर आनंद झाला असता, असं मत व्यक्त केलं. अजित पवार यांनी, ट्विट करून या कार्यक्रमाची माहिती दिली, आजचा हा पाडवा, मोठ्या स्नेहभावानं साजरा झाल्याचं सांगत, अनेक वर्षांचं हे नातं असंच वृध्दींगत होत राहो, अशी सदिच्छा व्यक्त केली आहे.

****

अहिल्यानगर जिल्ह्यातील हिवरेबाजार या आदर्श गावातल्या ग्रामस्थांनी दीपोत्सव साजरा केला. पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते सर्व ग्रामस्थांनी प्रथम दिवे प्रज्वलित करून असा दीपोत्सव प्रत्येक वर्षी साजरा करण्याचा निर्धार केला. प्रत्येक कुटुंबातून १ दिवा किंवा पणती, प्रत्येक संस्थेची एक पणती आणि सर्व मंदिरांचा एक दिवा, अशा एकूण ८५० दिवे प्रज्वलित करून जलस्रोतात सोडण्यात आले, शारिरीक आणि मानसिक स्वास्थ्य जपणूक, जलदेवतेची आराधना आणि वीजेची बचत अशा ३ तत्वांवर प्रत्येक हा दीपोत्सव साजरा केला जाणार आहे.

****

मुंबई क्रिकेट कसोटीत न्यूझीलंडने भारताविरुद्ध दुसऱ्या डावात १४३ धावांची आघाडी घेतली आहे. आज सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताचा पहिला डाव २६३ या धावसंख्येवर संपुष्टात आला. शुभमन गिल ९० धावा करून बाद झाला. आजच्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा न्यूझीलंडने दुसऱ्या डावात नऊ बाद १७१ धावा केल्या आहेत. 

****

अमेरिकेच्या कोलोराडो इथं सुरू असलेल्या १९ वर्षांखालच्या जागतिक मुष्टीयुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या कृषा वर्मानं सुवर्णपदक जिंकलं. तिनं जर्मनीच्या लेरिका हिचा ५-० असा पराभव केला. ४८ किलो वजनी गटात चंचल चौधरी, ५७ किलो वजनी गटात अंजली सिंग, तर पुरुषांच्या ७५ किलो वजनी गटात राहुल कुंडू यांना मात्र अंतिम फेरीत पराभूत व्हावं लागल्यानं रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं. 

****



No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 07.10.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 07 October 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...