Sunday, 3 November 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 03.11.2024 रोजीचे सकाळी 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 03 November 2024

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०३ नोव्हेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.

****

• दिवाळीत आज भाऊबीजेचा उत्साह-नानाविध प्रकारच्या खरेदीने दिवाळीचा पाडवा आनंदात साजरा

• केंद्रीय गुप्तचर यंत्रणेच्या सतर्कता इशाऱ्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत वाढ

• अहमदनगर जिल्ह्यात २३ कोटी ७१ लाख रुपये किमतीची सोन्याची बिस्किटं जप्त

आणि

• मुंबई क्रिकेट कसोटीत न्यूझीलंडची भारताविरुद्ध दुसऱ्या डावात १४३ धावांची आघाडी

****

आज कार्तिक शुद्ध द्वितीया. हिंदू संस्कृतीत यमद्वितीया नावानं ओळखला जाणारा हा दिवस, बहीण भावाच्या नात्यातला स्नेह अधिक वृद्धिंगत करणारा भाऊबीजेचा सण म्हणून सर्वत्र साजरा होतो. या दिवशी बहिणीने भावाला ओवाळण्याचा आणि भावाने बहिणीला ओवाळणी म्हणून भेटवस्तू देण्याचा प्रघात आहे. भाऊबीजेच्य पार्श्वभूमीवर काल सर्वच ठिकाणची बसस्थानकं तसंच रेल्वेस्थानकं प्रवाशांच्या गर्दीने फुलून गेली होती.

दरम्यान, बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडवा काल साजरा झाला. हा दिवस साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक मानला जातो. त्यामुळे चांगल्या उपक्रमांची सुरुवात किंवा महत्त्वाची खरेदी या मुहूर्तावर करण्याचा प्रघात आहे. त्यामुळे या दिवशी नूतन गृहप्रवेश, वाहन खरेदी किंवा आभुषणं खरेदीकडे बहुतेकांचा कल असतो. कालही भेटवस्तू, मोबाईल फोन्स, आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह इतर खरेदी करण्यासाठी बाजारपेठांमधून मोठी गर्दी झाली होती.

विक्रम संवत २०८१ ला कालपासून प्रारंभ झाला. देशाच्या अनेक भागात हा नववर्षाचा प्रारंभ मानला जातो. गुजराती नववर्षानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावर शुभेच्छा दिल्या. देशभरात गोवर्धन पूजाही काल करण्यात आली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गोवर्धन पूजेनिमित्त समाजमाध्यमावरून देशवासियांना शुभेच्छा दिल्या.

****

गेल्या अनेक वर्षांपासून एकत्र दिवाळी साजरी करण्याची बारामतीच्या पवार कुटुंबियांची परंपरा काल खंडीत झाली. बारामतीमध्ये काल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा पाडवा गोविंद बागेत तर अजित पवार यांचा पाडवा काटेवाडीत पार पडला. शरद पवारांनी माध्यमांशी संवाद साधताना, अनेक वर्षापासून चालत आलेली परंपरा कायम राहिली असती तर आनंद झाला असता, असं मत व्यक्त केलं. अजित पवार यांनी, काल ट्विट करून या कार्यक्रमाची माहिती दिली, पाडव्याचा सोहळा, मोठ्या स्नेहभावानं साजरा झाल्याचं सांगत, अनेक वर्षांचं हे नातं असंच वृध्दींगत होत राहो, अशी सदिच्छा अजित पवार यांनी व्यक्त केली.

****

दिवाळीनिमित्त रसिकांना सर्वत्र विविध सांगितिक तसंच सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी असून, या कार्यक्रमांना भरभरून प्रतिसाद मिळत आहे. नांदेड इथं आज सकाळी प्रसिद्ध गायक भीमराव पांचाळे यांचा गजल संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शासकीय विश्रामगृहात सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

संत मुक्ताबाई यांच्या जीवनकार्याचा आढावा घेणारा ब्रह्मचित्कला मुक्ताई हा आगळा कार्यक्रम काल पुण्यात सादर झाला. महाराष्ट्रातल्या संतांच्या कार्याची माहिती आणि महती कथन करणाऱ्या मालिकेअंतर्गत सादर झालेल्या या कार्यक्रमाचं हरिभक्त परायण रोहिणी माने - परांजपे यांनी निरुपण केलं. या कार्यक्रमाचं संगीत दिग्दर्शन तसंच निर्मिती पंडित हेमंत पेंडसे यांनी केली आहे.

****

अहिल्यानगर जिल्ह्यातल्या हिवरेबाजार या आदर्श गावातल्या ग्रामस्थांनी काल दीपोत्सव साजरा केला. प्रत्येक कुटुंबातून १ दिवा किंवा पणती, प्रत्येक संस्थेची एक पणती आणि सर्व मंदिरांचा एक दिवा, असे एकूण ८५० दिवे प्रज्वलित करून जलस्रोतात सोडण्यात आले, शारिरीक आणि मानसिक स्वास्थ्य जपणूक, जलदेवतेची आराधना आणि वीजेची बचत अशा तीन तत्वांवर दरवर्षी हा दीपोत्सव साजरा केला जाणार आहे.

****

वाशिम जिल्ह्यात कारंजा इथं जिल्हा परिषद शाळेतले शिक्षक गोपाल खाडे यांनी आपल्या निवासस्थानी आकाश कंदिलाच्या माध्यमातून मतदानाची टक्केवारी वाढवण्याचा संदेश दिला आहे. खाडे कुटुंबीयांनी तयार केलेल्या या आकाश कंदिलावर विविध संदेश लिहून, मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

****

केंद्रीय गुप्तचर यंत्रणांकडून आलेल्या सतर्कतेच्या इशाऱ्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सध्या त्यांना झेड दर्जाची सुरक्षा पुरवली जाते. फडणवीस यांच्या जीविताला धोका असून, तसे कट रचले जात असल्याची माहिती, केंद्रीय गुप्तचर यंत्रणांकडून राज्यातल्या यंत्रणांना देण्यात आली. त्यानंतर सतर्क झालेल्या राज्य पोलिस दलाने तत्काळ त्यांच्या सुरक्षेत वाढ केली. आता नेहमीच्या बंदोबस्तासोबत ‘फोर्स वन'चे १२ सैनिक देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत तैनात करण्यात आले असून, त्यांच्या मुंबईतल्या शासकीय निवासस्थानी, नागपूर इथल्या निवासस्थानी तसंच त्यांच्या कार्यक्रमात सुरक्षा देण्याची सूचना पोलीस दलाला देण्यात आली आहे.

****

नवी मुंबई महापालिकेचे माजी उपमहापौर आणि काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक यांनी काल भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

नागपूर मधून पाच वेळा विधानसभा निवडणूक लढवलेले अनिस अहमद, काल काँग्रेस पक्षात परतले. काही दिवसांपूर्वी त्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला होता. या पक्षाकडून ते मध्य-नागपूर मतदारसंघातून निवडणूक लढवणार होते, मात्र निर्धारित वेळेत पोहोचू न शकल्याने, त्यांचा अर्ज दाखल होऊ शकला नव्हता. या पार्श्वभूमीवर अहमद यांनी काल मुंबईत काँग्रेस कार्यालयात महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत, काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

****

भाजपचे बंडखोर आमदार गोपाळ शेट्टी यांनी बोरीवली विधानसभा मतदारसंघातून माघार घेणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यांनी काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी ही भेट असल्याचं त्यांनी वार्ताहरांना सांगितलं. दरम्यान, शेट्टी यांनी आजपर्यंत पक्षशिस्त पाळली आहे, त्यामुळे ते बोरीवलीतून माघार घेतील, अशी आशा फडवणीस यांनी वर्तवल्याचं, वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे.

****

अहमदनगर जिल्ह्यात सुपा टोलनाक्यावर एका गाडीतून २३ कोटी ७१ लाख रुपये किमतीची सोन्याची बिस्किटं आणि चांदी काल जप्त करण्यात आली. निवडणूक आयोगाचं पथक आणि पोलिसांनी या गाडीच्या संशयित हालचालींवरून गाडी थांबवून तपासणी केली असता, हा मुद्देमाल मिळाला. ही गाडी छत्रपती संभाजीनगर कडून पुण्याकडे निघाली असल्याचं चालकानं सांगितलं. याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे.

****

येत्या २० नोव्हेंबरला होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याचं आवाहन परिवहन विभागाचे आयुक्त विवेक भीमनवार यांनी केलं आहे. 

[Byte- विवेक भिमनवार, आयुक्त परिवहन - ] 

****

श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी सात वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज बुलडाणा जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.

****

विधानसभेच्या मतदानावेळी निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या कागदाच्या आकारातल्या मतपत्रिका, उमेदवाराला आता नमुना मतपत्रिका म्हणून छापता येणार नाहीत. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत त्यावर निर्बंध राहणार असल्याचं, निवडणूक विभागाकडून सांगण्यात आलं आहे. मात्र, आयोगाने निश्चित केलेल्या कागदावर नमुना मतपत्रिकेचा वापर उमेदवारांना करता येईल. छापील प्रचार साहित्यावर प्रकाशक आणि मुद्रकाचं नाव, पत्ता आणि प्रतींची संख्या नसेल तर गुन्हा दाखल केला जाणार आहे. 

****

दरम्यान, उमेदवारांनी आपल्या निवडणूक खर्चाकरता स्वतंत्र बॅंक खाते उघडून त्यातूनच व्यवहार करणं आवश्यक असल्याचं, आयोगानं कळवलं आहे. उमेदवारांनी आपल्या विरोधात गुन्हे दाखल असल्याबाबतची जाहिरात प्रसिद्ध करणंही आवश्यक असून, जाहिरातीचा खर्च निवडणूक खर्चाची बाब म्हणून गणला जाणार आहे.

****

क्रिकेट

मुंबई क्रिकेट कसोटीत न्यूझीलंडने भारताविरुद्ध दुसऱ्या डावात १४३ धावांची आघाडी घेतली आहे. काल सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताचा पहिला डाव २६३ धावांवर संपुष्टात आला. शुभमन गिल ९० धावा करून बाद झाला. कालच्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा न्यूझीलंडने दुसऱ्या डावात नऊ बाद १७१ धावा केल्या आहेत.

****

अमेरिकेच्या कोलोराडो इथं सुरू असलेल्या १९ वर्षांखालच्या जागतिक मुष्टीयुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत, भारताच्या कृषा वर्मानं जर्मनीच्या लेरिका हिचा पाच - शून्य असा पराभव करत सुवर्णपदक पटकावलं. मात्र महिलांच्या स्पर्धेत चंचल चौधरी आणि अंजली सिंग, तर पुरुषांच्या स्पर्धेत राहुल कुंडू यांना मात्र रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं.

****

पुण्यात म्हाळुंगे बालेवाडी इथल्या क्रीडा संकुलात येत्या १२ ते १६ नोव्हेंबर दरम्यान दिव्यांगांच्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा होणार आहेत. दहा मीटर रायफल, २५ मीटर एअर पिस्टल, ५० मीटर एअर पिस्टल, ५० मीटर रायफल या प्रकारात होणाऱ्या या स्पर्धेत देशभरातले सुमारे ६०० नेमबाज सहभागी होणार आहेत.

****

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नांदेड दक्षिण मतदार संघातल्या उमेदवारांची निवडणूक खर्चाची प्रथम तपासणी येत्या सात तारखेला, दुसरी तपासणी ११ तारखेला, तर तिसरी तपासणी १५ तारखेला होणार आहे. चिखलवाडी इथं ही तपासणी होणार आहे.

****

महाराष्ट्रासाठी भारत निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले विशेष निवडणूक निरीक्षक राम मोहन मिश्रा यांनी काल अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक तयारी आढावा बैठक घेतली. प्रशासनाची पूर्वतयारी आणि निवडणुका मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं.

****

चालू महिन्यात देशभरात पेन्शन विभाग आणि ॲम्प डिजिटल जीवन प्रमाणपत्र योजना राबवण्यात येत आहे. पहिल्याच दिवशी एक लाख ८० हजारांहून अधिक पेन्शनधारकांनी या योजनेचा लाभ घेतला. या योजनेत पेन्शनधारक स्मार्टफोन कॅमेऱ्याने स्वत:चा चेहरा स्कॅन करुन हे प्रमाणपत्र जमा करू शकतात.

****


No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 08.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 08 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...