Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 21 November 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २१ नोव्हेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
भारताचे नवे कॅग अर्थात नियंत्रक आणि
महालेखापरीक्षक म्हणून के. संजय मूर्ती यांनी आज पदाची शपथ घेतली. नवी दिल्लीत
राष्ट्रपती भवन इथं आयोजित औपचारिक समारंभात, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
यांनी, मूर्ती यांना शपथ दिली. भारताचे चौदावे कॅग गिरीश चंद्र मुर्मू काल
सेवानिवृत्त झाले.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या
गयाना दौऱ्यावर असून,
ते आज गयाना संसदेच्या विशेष सत्राला संबोधित करणार आहेत.
तसंच तिथल्या भारतीय समुदायाशीही संवाद साधणार आहेत. पंतप्रधान गयाना आणि इतर
कॅरेबियन देशांच्या क्रिकेटपटूंचीही भेट घेणार असून, गयाना मधल्या
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मारकाला भेट देऊन आदरांजली वाहणार आहेत.
गयानामधल्या भारतीय संस्कृतीवर आधारित सरस्वती विद्यानिकेतन शाळेला देखील
पंतप्रधान भेट देणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती
दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईत हुतात्मा स्मारकाला
पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर आणि
मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई महानगरपालिका आयुक्त
भूषण गगराणी,
मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर उपस्थित होते.
****
विकसनशील देशांच्या आर्थिक गरजा पूर्ण
करण्यासाठी सहमती दर्शवलेल्या आश्वासनांची पूर्तता विकसित देशांनी करावी, असं
आवाहन, भारतानं काल कॉप 29 या हवामानविषयक जागतिक परिषदेत केलं. विकसित देशांमध्ये मोठ्या प्रमाणात
कार्बन उत्सर्जन होतं,
त्यामुळे जागतिक तापमानवाढ आणि हवामानातले अनियमित बदल घडून
येत आहेत आणि त्याचा सर्वाधिक फटका विकसनशील देशांना सहन करावा लागतो. विकसनशील
देशांतल्या लोकांचं जगणं आणि आयुष्य, यामुळे धोक्यात येत
असल्याचं भारतानं कॉप 29 मधल्या उच्चस्तरीय मंत्री परिषदेत निवेदनाद्वारे सांगितलं.
****
प्रतिरोधक संसर्गासाठी असलेल्या
नॅफिथ्रोमायसिन या पहिल्या स्वदेशी प्रतिजैविक औषधाचं अनावरण, केंद्रीय
विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंग यांनी काल नवी दिल्ली इथं केलं.
जगभरात दरवर्षी २० लाखांहून अधिक मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या औषध- प्रतिरोधक
असलेल्या न्यूमोनिया आजाराविरूद्ध, नॅफिथ्रोमाइसिनची तीन
दिवसीय उपचार पद्धती उल्लेखनीय ठरेल, असं सिंग यांनी यावेळी
सांगितलं. मेड इन इंडिया असलेलं नॅफिथ्रोमायसिन अँटीबायोटिक हे जैवतंत्रज्ञान
विभागाच्या बायोटेक्नॉलॉजी इंडस्ट्री रिसर्च असिस्टन्स कौन्सिलच्या समर्थनाने
विकसित करण्यात आलं असून मिकनाफ या नावाने ते बाजारात आणण्यात आलं आहे. प्रतिजैविक
प्रतिकार-एएमआर चा सामना करणारं हे देशातलं पहिलं स्वदेशी विकसित प्रतिजैविक आहे.
****
पंचावन्नाव्या भारतीय आंतरराष्ट्रीय
चित्रपट महोत्सव - इफ्फीच्या उद्घाटन समारंभात काल प्रसारभारतीच्या ओटीटी मंचाचा
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हस्ते प्रारंभ करण्यात आला. केंद्रीय माहिती
प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यावेळी उपस्थित होते. वेव्ज नावाच्या या
मंचावर अभिजात आणि समकालीन अशा दोन्ही प्रकारच्या कार्यक्रमांचा संगम झालेला दिसून
येईल. रामायण,
महाभारत, शक्तिमान अशा पूर्वीच्या लोकप्रिय
कार्यक्रमांचा आस्वाद प्रेक्षकांना पुन्हा घेता येईल. भारताच्या भूतकाळाशी
सांस्कृतिक आणि भावनिक नातं घनिष्ट करण्याच्या उद्देशानं यातल्या कन्टेन्ट म्हणजे
आशयाची निवड करण्यात आली आहे. विविध भाषांमधल्या वाहिन्यांवरच्या बातम्यांबरोबरच
मनोरंजन, चित्रपट,
दूरचित्रवाणीवरचे कार्यक्रम आणि खेळ असे वैविध्यपूर्ण
कार्यक्रम या मंचावर उपलब्ध असतील.
****
वक्फ सुधारणा विधेयकासंदर्भात नियुक्त
संयुक्त संसदीय समितीची आज नवी दिल्लीत बैठक होणार आहे. या बैठकीनंतरचा अहवाल
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सादर केला जाईल, असं समितीचे अध्यक्ष
जगदंबिका पाल यांनी सांगितलं. या समितीनं नऊ ते १४ नोव्हेंबर दरम्यान गुवाहाटी
भुवनेश्वर,
कोलकाता, पटना, लखनौचा दौरा करून
वक्फ सुधारणा विधेयकाचा अभ्यास केला होता.
****
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ -
सीबीएसईच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा १५ फेब्रुवारी २०२५ पासून सुरू
होतील असं मंडळानं कळवलं आहे. दहावीच्या परीक्षा १८ मार्च रोजी संपतील तर
बारावीच्या परीक्षा चार एप्रिल रोजी संपणार आहेत.
****
चीनमध्ये शेनझेन इथं सुरू असलेल्या चीन
मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू, मालविका
बनसोड यांनी महिला एकेरीच्या आणि लक्ष्य सेननं पुरुष एकेरीच्या उप -उपांत्यपूर्व
फेरीत प्रवेश केला आहे. या फेरीत आज लक्ष्य सेनचा सामना डेन्मार्कच्या रासमस
गेम्के सोबत,
पी व्ही सिंधुचा सामना सिंगापूरच्या येओ जिया मिन बरोबर, तर
मालविकाचा सामना थायलंडच्या सुपानिडा काटोथोंग सोबत होणार आहे.
****
भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान पाच
सामन्यांच्या बॉर्डर - गावस्कर चषक कसोटी क्रिकेट मालिकेतला पहिला सामना
उद्यापासून पर्थ इथं सुरु होणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी सात वाजून ५०
मिनिटांनी या सामन्याला सुरुवात होईल.
****
No comments:
Post a Comment