Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 22 November
2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २२ नोव्हेंबर २०२४
सायंकाळी ६.१०
****
· विधानसभेच्या मतदानाची उद्या मोजणी-दुपारी बारा वाजेपर्यंत पहिला निकाल तर संध्याकाळपर्यंत
चित्र स्पष्ट होण्याची शक्यता
· निकालाच्या पार्श्वभूमीवर प्रमुख पक्षांच्या बैठकांची सत्रं सुरू नेत्यांकडून दावे
प्रतिदावे
· पैसे वाटपाच्या कथित आरोप प्रकरणी भाजप नेते विनोद तावडे यांची काँग्रेसला कायदेशीर
नोटीस
आणि
· बॉर्डर गावस्कर चषक कसोटी क्रिकेट मालिकेत पहिल्या सामन्यात पहिल्या दिवशी वेगवान
धावपट्टीचे १७ बळी
****
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची मतमोजणी
उद्या सकाळी ८ वाजल्यापासून सुरू होणार आहे. मतमोजणीची सुरुवात टपाली मतांच्या मोजणीपासून
होईल आणि त्यानंतर साधारण साडेआठ वाजल्यापासून इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावरच्या मतांची
मोजणी सुरू होईल,
अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी
दिली. २८८ विधानसभा मतदारसंघांमधल्या मतमोजणीसाठी तितकीच मोजणी केंद्रं आहेत, शिवाय
नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी एक मोजणी केंद्र स्थापन करण्यात आलं आहे.
मतमोजणी प्रक्रियेसाठी सुमारे ६ हजार ६०० पथकं नियुक्त करण्यात आली आहेत. मतमोजणी केंद्रांवर
कडक सुरक्षा व्यवस्था तैनात आहे. दुपारी बाराच्या सुमाराला पहिला निकाल हातात येण्याची शक्यता आहे, निकालाचं पूर्ण चित्र
मात्र, संध्याकाळी स्पष्ट होईल, असंही एस. चोक्कलिंगम यांनी नमूद केलं आहे.
झारखंड विधानसभा निवडणुकीच्या ८१ जागांसाठी
तसंच विविध राज्यांतल्या विधानसभा आणि लोकसभा पोटनिवडणुकीची मतमोजणीदेखील उद्याच होणार
आहे.
****
विधानसभा निवडणुकीच्या उद्या होणाऱ्या मतमोजणीसाठी
आज छत्रपती संभाजीनगर इथे निवडणूक निर्णय अधिकारी आणि मतमोजणीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना
प्रशिक्षण देण्यात आलं. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी यावेळी दूरदृष्यप्रणालीद्वारे
मार्गदर्शन केलं. मतदान यंत्रं स्ट्राँगरूममधून बाहेर आणून ती उघडताना निवडणूक निरीक्षक
आणि उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित असणं आणि या पूर्ण प्रक्रियेचं व्हिडिओ चित्रण आवश्यक
असल्याचं त्यांनी सांगितलं. मतमोजणी प्रक्रिया अचूक आणि पारदर्शक पद्धतीनं राबवावी, असे
निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी यावेळी दिले. या प्रशिक्षणानंतर प्रत्येक विधानसभा
मतदार संघात नियुक्त असलेल्या कर्मचाऱ्यांना स्थानिक पातळीवर प्रशिक्षण देण्यात आलं.
उद्याच्या मतमोजणी आणि निकालाच्या पार्श्वभूमीवर
छत्रपती संभाजीनगरचे पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी नागरिकांना शांतता आणि कायदा सुव्यवस्था
राखण्यात सहकार्याचं आवाहन केलं आहे.
मतमोजणीच्या बंदोबस्ताचं नियोजन
योग्य पध्दतीने केलेलं आहे. जमावबंदीचे आदेश ही आहे. शहरामध्ये
महत्वाचे जे काही संवेदशील ठिकाणं आहेत तर त्याच्यावरती आमचं लक्ष आहे आणि कायदा आणि सुवस्था मोडणाऱ्यांवर
निश्चितच कडक आणि प्रभावी कारवाई केली जाईल.
****
छत्रपती संभाजीनगर शहरात असलेल्या तीन विधानसभा
मतदारसंघांच्या मतमोजणी केंद्राच्या परिसरात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी काही मार्गात
बदल करण्यात आले आहेत. नागरिकांना या बदलाची नोंद घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
****
मतमोजणीसाठी परभणी जिल्हा प्रशासनही सज्ज
झालं असून,
जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आज मतमोजणी केंद्रांची पाहणी
करून मतमोजणी प्रक्रियेच्या तयारीचा आढावा घेतला. जिल्ह्यातल्या चारही मतमोजणी केंद्रांवर
CCTV कॅमेरे बसवण्यात आले असून निमलष्करी दल आणि स्थानिक पोलीसांचा चोख बंदोबस्त तैनात
करण्यात आला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
बीड जिल्हा प्रशासनही मतमोजणीसाठी सज्ज झालं
असून, पहिला निकाल परळीचा तर सर्वात शेवटचा निकाल आष्टी मतदार संघाचा लागेल अशी माहिती
जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी पत्रकार परिषदेत दिली. जिल्ह्यात शांतता ठेवावी, असं
आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे.
जालना जिल्ह्यातही पाचही विधानसभा मतदारसंघांसाठी
मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. पाच विधानसभा मतदारसंघांसाठी प्रत्येकी १४ टेबलवर
मतमोजणी होणार असून त्यासाठीची आवश्यक तयारी निवडणूक विभागाकडून करण्यात आली आहे.
धाराशिव जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात
मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्ह्यातील उमरगा, तुळजापूर, उस्मानाबाद
आणि परंडा या चार विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी १४ टेबलवर, एकूण
३८७ कर्मचारी मतमोजणी करणार आहेत.
****
अहिल्यानगर जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघात
मतमोजणीसाठी एकूण १ हजार २५९ अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
****
दरम्यान, उद्याच्या मतमोजणी आणि
निकालाच्या पार्श्वभूमीवर आज राज्यातल्या सगळ्याच प्रमुख पक्षांच्या विविध बैठका होत
असून नेत्यांकडून दावे प्रतिदावे होत आहेत. शिवसेनेचे नाराज उमेदवार आपल्या संपर्कात
असल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे, तर, अनेक
अपक्ष उमेदवार आपल्या संपर्कात असल्याचा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे
नेते संजय राऊत यांनी केला आहे.
दरम्यान, काँग्रेसचे महाराष्ट्र
प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी, महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदावरून कोणताही
वाद नाही, निकालानंतर महाविकास आघाडीचे प्रमुख नेते एकत्र बसून यावर निर्णय घेतील, असं
म्हटलं आहे
****
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस नेते राहुल
गांधी आणि सुप्रिया श्रीनेत यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. निवडणुकीत पैसे वाटल्याचे
खोटे आरोप करून बदनामी केल्याप्रकरणी बिनशर्त माफी मागावी अन्यथा कायदेशीर कारवाईला
सामोरे जावे,
असा इशारा या नोटीशीच्या माध्यमातून तावडे यांनी दिला आहे.
****
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण
मंडळाच्या बारावी आणि दहावीच्या परीक्षेचं अंतिम वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आहे.
त्यानुसार बारावीची लेखी परीक्षा पुढच्या वर्षी ११ फेब्रुवारी ते १८ मार्च, तर
दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च या काळात घेतली जाणार आहे. या परीक्षांचं
वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलं आहे.
****
महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं आगामी परीक्षांचं
संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध केलं आहे. महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा
एक डिसेंबर रोजी,
तर मुख्य परीक्षा २६ एप्रिल २०२५ रोजी घेण्यात येणार आहे. मुख्य
परीक्षेसाठी वर्णनात्मक तसंच वस्तुनिष्ठ बहुपर्यायी पद्धत असणार आहे. पुढची महाराष्ट्र
नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा २८ सप्टेंबर २०२५ रोजी घेतली जाईल. तर मुख्य परीक्षेचा
दिनांक नंतर जाहीर करण्यात येईल. २०२५ च्या जाहिरातीनुसारची राज्यसेवा मुख्य परीक्षा
वर्णनात्मक पद्धतीची असणार आहे. यासोबतच महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा, वनसेवा, सहायक
मोटार वाहन निरीक्षक परीक्षेचंही वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.
****
२०२२ आणि २०२३ या वर्षांसाठीचे उस्ताद बिस्मिल्ला
खाँ युवा पुरस्कार आज नवी दिल्लीत सांस्कृतिक खात्याचे सचिव अरुणिश चावला यांच्या हस्ते
प्रदान करण्यात आले. पुरस्कार विजेत्यांमध्ये अनुजा झोकरकर, सारंग
कुलकर्णी आणि नागेश अडगावकर यांचा समावेश आहे. २५ हजार रुपये आणि मानपत्र असं या पुरस्काराचं
स्वरूप आहे.
****
मंगळूरच्या विद्यापीठात नुकत्याच झालेल्या
अखिल भारतीय आंतर विद्यापीठ क्रॉसकंट्री स्पर्धेत मुंबई विद्यापीठानं उल्लेखनीय कामगिरी
करत उपविजेतेपद पटकावलं आहे. राज तिवारी या खेळाडूनं वैयक्तिक सुवर्णपदकही मिळवलं आहे.
भारतीय विद्यापीठ संघाने घेतलेल्या या स्पर्धेत देशभरातल्या १३७ विद्यापीठांतल्या ८५०
खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
****
बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेत आज पहिल्या
दिवशी पर्थच्या वेगवान खेळपट्टीवर १७ फलंदाज बाद झाले. भारतीय संघाचा कर्णधार जसप्रीत
बुमराहनं नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतली. भारताचा पहिला डाव १५० धावांत संपुष्टात आला.
पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या नितीश रेड्डीनं सर्वाधिक ४१ धावा केल्या. भारतीय गोलंदाजांनीही
उत्तम कामगिरी करत पहिल्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलियाला सात बाद ६७ धावसंख्येवर रोखलं आहे.
ऑस्ट्रेलिया अजून ८३ धावांनी पिछाडीवर आहे. कर्णधार बुमराहनं चार, सिराजनं
दोन आणि हर्षित राणानं एक गडी बाद केला.
****
येत्या २५ ते २९ नोव्हेंबर या कालावधीत दिल्ली
इथं होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सहकारिता परिषदेमध्ये इफकोच्या संचालक डॉक्टर वर्षा कस्तुरकर
या भारताच्या प्रतिनिधी म्हणून सहभागी होणार आहेत. देशातल्या सहकारी संस्थांचं काम
आंतरराष्ट्रीय सहकार क्षेत्राला जोडण्यामुळे भारताची जागतिक महासत्ता बनण्याची वाटचाल
सोपी होईल,
असा विश्वास कस्तुरकर यांनी व्यक्त केला आहे.
****
No comments:
Post a Comment