Wednesday, 24 April 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 24.04.2019 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 24 April 2019

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २४ एप्रिल २०१९ दुपारी .०० वा.

****



 लोकसभा निवडणुकीच्या उर्वरित चार टप्प्यांसाठीच्या प्रचाराला आता वेग आला आहे. विविध राजकीय पक्षांचे दिग्गज नेते आज देशभरात विविध ठिकाणी प्रचार सभा घेत आहेत. महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यात सर्व ४८ मतदार संघातलं मतदान पूर्ण होईल. या चौथ्या टप्प्यात मुंबईतल्या सर्व मतदार संघांसह ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर, धुळे, नंदुरबार, नाशिक, दिंडोरी, शिर्डी, मावळ आणि शिरुर या मतदार संघात, येत्या सोमवारी २९ तारखेला मतदान होणार आहे. त्यामुळे या चौथ्या टप्प्यासाठी उमेदवारांचा प्रचार शनिवारी संध्याकाळी थांबणार आहे. प्रचाराला काही दिवस शिल्लक असल्यानं या सर्व मतदार संघात प्रमुख राजकीय पक्षांचे नेते, आपापल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ, जाहीर सभा, प्रचार फेऱ्या, घेत आहेत.

       

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज झारखंडच्या लोहारदगा इथे जाहीर सभा घेतली. विरोधी पक्षांना आपला पराभव दिसायला लागला असून, त्यांनी अपयशाचं खापर मतदानयंत्रांवर फोडण्याची तयारी सुरू केल्याची टीका पंतप्रधानांनी यावेळी केली. पंतप्रधान आज पश्चिम बंगालमध्ये बोलपूर आणि रणघाट इथेही सभा घेणार आहेत.



 काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी उत्तर प्रदेशमध्ये लखीमपुर खीरी, उन्नाव आणि कानपूर इथे सभा घेणार आहेत. काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी, यांनी आज फतेहपूर इथे सभा घेऊन, मतदारांशी संवाद साधला. त्या आज महोबा आणि हमीरपूर इथेही सभा घेणार आहेत.



 भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी बिहारच्या मुंगेर इथे सभा घेतली. पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्याची क्षमता भाजप सरकारमध्ये असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं.



 भाजप अध्यक्ष आज बेगुसराय आणि समस्तीपूर इथेही सभा घेणार आहेत.

****



 भाजपचे वायव्य दिल्लीचे नाराज खासदार यांनी उदीत राज यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. उदीत राज यांना भाजपनं पुन्हा लोकसभेची उमेदवारी नाकारल्यानं, नाराज झालेले उदीत राज यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची आज सकाळी भेट घेतली, आणि त्यानंतर काँग्रेस पक्षात प्रवेश केला. भाजपनं वायव्य दिल्लीतून उदीत राज यांच्या ऐवजी, पंजाबी सुफी गायक हंस राज हंस यांना उमेदवारी दिली आहे.

****



 बहुचर्चित रोहित शेखर तिवारी हत्ये प्रकरणी दिल्ली पोलिसांनी, रोहित यांची पत्नी अपूर्वा तिवारी यांना अटक केली आहे. संपत्तीवरून रोहित आणि अपूर्वा यांच्यात सतत खटके उडत असल्याची माहिती समोर आल्यामुळे पोलिसांनी ही कारवाई केली. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिवंगत एन डी तिवारी यांचे पुत्र असलेले रोहित यांची सोळा तारखेला हत्या झाली.

****



 विहिरीच्या दुरुस्तीचं काम सुरू असताना विहीर खचून दोन जण मातीखाली दबल्याचं वृत्त आहे. वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा तालुक्यातल्या मसला या गावी ही घटना घडल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****



 व्यापक जनजागृती आणि प्रभावी उपाय योजनांमुळे गडचिरोली जिल्ह्यात हिवताप आटोक्यात आणण्यात हिवताप विभागाला यश आलं असून, मागच्या दोन वर्षांत जिल्ह्यातल्या हिवतापाच्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाल्याचं दिसून आलं आहे. जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.कुणाल मोडक यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. येत्या जून महिन्यात जिल्ह्यातल्या एक हजार ३१५ गावांत डास प्रतिबंधक फवारणी करण्यात येणार असून, आतापर्यंत ७२ हजार मच्छरदाण्या वितरीत करण्यात आल्या असल्याची माहितीही मोडक यांनी यावेळी दिली.

****



 चीनमध्ये वुहान इथं सुरू असलेल्या बॅडमिंटन स्पर्धेत आज पी. व्ही. सिंधू, सायना नेहवाल, किदांबी श्रीकांत आणि समीर वर्मा आपले एकेरीचे पहिल्या फेरीचे सामने खेळतील. दुहेरी स्पर्धेतही आज भारतीय बॅडमिंटनपटूंचे सामने होणार आहेत गेल्या वर्षी सायना नेहवाल आणि एच एस प्रणॉय यांनी या स्पर्धेत कांस्य पदक पटकावलं होतं. गेल्या चोपन्न वर्षांपासून भारताला या स्पर्धेच्या विजेतेपदाची प्रतीक्षा आहे.

****



 चीनमध्ये शियान इथं सुरू असलेल्या आशियायी कुस्ती स्पर्धेत भारतानं काल एक सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य पदक मिळवलं. जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या बजरंग पुनियानं सलग १० गुण मिळवत  विजेतेपद कायम राखलं. त्यानं फ्रीस्टाईल प्रकारात अंतिम सामन्यात अतिशय चुरशीच्या लढतीत कझाकस्तानच्या सयातबेक ओकासोवचा १२-७ असा पराभव केला. या स्पर्धेतलं २०१७ पासूनचं  त्याचं हे दुसरं सुवर्णपदक आहे.

*****

*** 

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 03.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 03 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...