Monday, 20 July 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 20 JULY 2020 TIME 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 20 July 2020
Time 18.00 to 18.10
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २० जुलै २०२० सायंकाळी ६.००
****
** महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा आजपर्यंत २७ लाख ३८ हजार खातेदारांना लाभ
** औरंगाबाद जिल्ह्यात आज दिवसभरात ५१ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची वाढ
** जालना शहरात कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू १४ दिवसांची संचारबंदी शिथिल
आणि
** गायीच्या दुधाला दहा रुपये प्रतिलीटर अनुदान देण्याची भाजपची मागणी
****
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा आजपर्यंत राज्यात २७ लाख ३८ हजार खातेदारांना १७ हजार ६४६ कोटी रुपयांच्या रकमेचा लाभ देण्यात आला आहे.या योजनेतील लाभ बाकी असलेल्या पात्र शेतकऱ्यांना लाभ देण्याची प्रक्रिया गतिमानपद्धतीने राबवावी अश्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. २०२०-२१ या  आर्थिक वर्षात आतापर्यंत एकूण ५६५३  कोटी रुपयांची रक्कम पात्र लाभार्थ्यांच्या कर्जखात्यात जमा करण्यात आली असून उर्वरीत ५ लाख ५२ हजार खातेधारकांचं प्रमाणीकरण पूर्ण केल्यानंतर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. 
****
औरंगाबाद जिल्ह्यात आज दिवसभरात ५१ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची वाढ झाली. यामुळे जिल्ह्यातली बाधितांची एकूण संख्या १० हजार ८५४ झाली आहे. आज आढळलेल्या रुग्णांमध्ये मनपा हद्दीतले १७ तर ग्रामीण भागातल्या २३ आणि प्रवेश नाक्यांवर करण्यात आलेल्या तत्काळ चाचण्यांतील ११ रुग्णांचा समावेश आहे.  जिल्ह्यात आतापर्यंत ६ हजार १४१ रुग्ण बरे झाले असून, ३९९ रुग्णांचा या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. सध्या ४ हजार ३१४ रुग्णांवर जिल्ह्यात उपचार सुरु आहेत.
दरम्यान, शहरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय घाटीत आज ३ कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला.यामधे रामगोपाल नगर मधील ४८ वर्षीय आणि एन ७ सिडको मधील ५२ वर्षीय पुरुष, तर बकापूर पळशी इथल्या ४५ वर्षीय महिला रुग्णांचा समावेश आहे.
****
जालना शहरात कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर १४ दिवसांपासून लागू करण्यात आलेली संचारबंदी आज सकाळी शिथिल करण्यात आली. ग्राहकांनी आज बाजार तसंच बँक आणि कृषी सेवा केंद्रांसमोर गर्दी केल्यानं सामाजिक अंतर राखण्याचे नियमांचे पालन केल गेलं नसून नियमभंग करणाऱ्या नागरिकांवर पोलिस कारवाई करत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
जालना जिल्ह्यात आज ४९ नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आले. जिल्ह्यातल्या एकूण बाधित रुग्णांची संख्या १ हजार ४८८ झाली आहे. आज आढळलेल्या रुग्णांमध्ये जालना शहरातल्या ४०, ग्रामीण भागातल्या ८ तर नांदेड जिल्ह्यातल्या लोहा इथल्या एका रुग्णाचा समावेश आहे.
****
बीड जिल्ह्यात आज एका ३२ वर्षीय महिलेचा तर काल २ जणांचा कोरोना विषाणू संसर्गानं मृत्यू झाला. आजपर्यंत जिल्ह्यात एकूण पंधरा रुग्णांचा या विषाणूमुळं मृत्यू झाला आहे. दरम्यान, बीड जिल्ह्यात आज २४ जणांचा अहवाल कोरोना विषाणू बाधित आला आहे. जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या ३५४ झाली आहे. आज आढळलेल्या रुग्णांमध्ये बीड शहरातील ९, केज इथं ५, तर गेवराई, परळी, माजलगाव, पाटोदा इथल्या प्रत्येकी २ रूग्णांचा समावेश आहे.
****
खाजगी रुग्णालयांनी आपल्याकडे उपलब्ध असलेला अतिदक्षता विभाग, गंभीर आजारी असलेल्या रुग्णांनाच प्राधान्यानं उपलब्ध करुन द्यावा, असे निर्देश नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले आहेत. कोव्हीड-१९ प्रतिबंधात्मक उपाययोजनाअंतर्गत जिल्हा प्रशासनानं निर्गमित केलेल्या आदेशात हे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्ह्यातल्या खाजगी रुग्णालयांत उपलब्ध असलेले अतिदक्षता विभाग ही जिल्ह्यातील आरोग्यविषयक सोई-सुविधांच्या दृष्टीने मोठी उपलब्धी असून ती सुविधा ज्यांना खरीच आवश्यकता आहे अशा गंभीर आजारी असलेल्या रुग्णांना उपलब्ध व्हावी असंही यात म्हटलं आहे.
दरम्यान, नांदेड जिल्ह्याला राज्य सरकारने ५०० अन्टीजन चाचणी संच उपलब्ध करून दिले आहेत. आणखी पाच हजार अँटीजेन चाचणी संच उपलब्ध होणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ निळकंठ भोसीकर यांनी दिली आहे.
****
सातारा जिल्ह्यात काल ३३ जणांना कोरोनाविषाणूची लागण झाली आहे. जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या २ हजार ४१८ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार ३०४ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत ८१ जणांचा मृत्यू झाला आहे.
****
अहमदनगर जिल्ह्यात आज १११ रुग्ण कोरोनाविषाणू मुक्त झाले आहेत. आतापर्यंत १ हजार १३६ रुग्ण संसर्गमुक्त झाले असून सध्या ६३९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
धुळे जिल्ह्यात काल ८५ जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. यामधे धुळे शहरातील ३६, शिरपूर तालुक्यातील १६, साक्री इथं ११ आणि शिंदखेडा तालुक्यातील ४ रुग्ण आहेत. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या २ हजार ३४ झाली आहे.
****
दूध दर वाढी संदर्भात आज राज्यात औरंगाबाद, उस्मानाबाद, परभणी, सांगली इथं जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करण्यात आली. गायीच्या दुधाला १० रुपये प्रतिलीटर अनुदान तसंच दुध भुकटीला ५० रुपये प्रती किलो अनुदान द्यावं, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं करण्यात आली आहे. शासनाने १ ऑगस्ट पूर्वी दूध दरवाढीचा निर्णय न घेतल्यास भाजप, रयतक्रांती संघटना, शिवसंग्राम, राष्ट्रवादी समाज पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षांनी एकत्रितरित्या राज्यव्यापी दूध आंदोलनाचा इशारा दिला आहे.
औरंगाबाद इथं भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजय औताडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यासंदर्भातील मागणीचं निवेदन दिलं आहे.
उस्मानाबाद इथं आज भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना या मागणीचं निवेदन देण्यात आले.
नांदेड इथं आज भारतीय जनता पक्षाचे महानगराध्यक्ष प्रवीण साले यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने नांदेडच्या तहसीलदारांकडे याबाबतचे निवेदन दिले.
परभणी इथं भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ.सुभाष कदम यांच्या नेतृत्वात इतर मान्यवरांच्या उपस्थितीत प्रशासनास याबाबतीत निवेदन सादर करण्यात आलं.
****
माजी खासदार राजू शेट्टीचं दुधाबाबत आंदोलन हे मॅच फिक्सिंग प्रमाणे दूध फिक्सिंगचे आंदोलन असल्याची टीका माजी कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली. ते सांगली इथं प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
****
मुंबई पुणे द्रूतगती महामार्गावर वेगमर्यादेचा भंग केल्यास एक हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. या मार्गावरच्या दोन पथकर नाक्यांमधलं पन्नास किलोमीटरचं अंतर ३७ मिनिटांपेक्षा कमी वेळेत पार करणाऱ्या वाहन चालकांना हा दंड ठोठावण्यात येणार आहे. येत्या एक ऑगस्टपासून या नियमाची अंमलबजावणी होणार आहे. वाहनांच्या वेगाला मर्यादा घालण्यासाठी महामार्ग पोलिस विभागाने हा निर्णय घेतल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. या नियमाचं वारंवार भंग केल्यास दंडाच्या रकमेतही वाढ होणार आहे.
****
अयोध्येतल्या बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयच्या विशेष न्यायालयासमोर माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांची साक्ष येत्या २४ जुलैला नोंदवण्यात येणार आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते मुरलीमनोहर जोशी यांची साक्ष २३ जुलै रोजी, तर शिवसेनेचे माजी खासदार सतीश प्रधान यांची साक्ष २२ जुलै रोजी नोंदवली जाणार आहे. या तीन ही नेत्यांच्या साक्षी दूरदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून नोंदवल्या जाणार आहेत.
****
अयोध्येत राम मंदीर उभारण्यातला मुख्य अडथळा शिवसेनेनं दूर केला असल्याचं, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. येत्या पाच ऑगस्टला राम मंदीरच्या भूमिपूजन सोहळ्यात शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहभागी होणार का, या प्रश्नाच्या उत्तरात राऊत बोलत होते. ठाकरे यापूर्वीही अयोध्येला अनेक वेळा गेले आहेत, या दौऱ्यांमध्ये राजकारण कधीही नव्हतं. अयोध्या आणि शिवसेनेतले बंध राजकारणापलिकडचे अतूट बंध असल्याचं राऊत यांनी म्हटल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
१५ व्या वित्त आयोगाच्या निधीमधून पंचायत समिती सदस्य आणि जिल्हा परिषद सदस्यांना प्रत्येकी १० टक्के निधी खर्चाचे आर्थिक अधिकार महाराष्ट्र राज्य सरकारचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शासकीय अध्यादेश काढून जाहीर केले आहेत. या निधीच्या माध्यमातून या संस्थांमधील लोकप्रतिनिधींना आता विकासकामांसाठी पुरेसा निधी मिळणार असून विकासकामाला गती देता येणार असल्याचं उस्मानाबाद पंचायत समिती सदस्य गजेंद्र जाधव यांनी म्हटलं आहे. या निर्णयाचे उस्मानाबाद जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांनी स्वागत केलं आहे.
****
नांदेड जिल्ह्याच्या देगलूर तालुक्यातील हणेगाव आणि परीसरात आज दुपारी एक तास मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे शेतातील सकल भागात पाणी साचल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २६ तारखेला मन की बात या कार्यक्रमातून देशवासीयांसी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमासाठी श्रोत्यांनी आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी प्रेरणादायी सामुहीक प्रयत्नांचे अनुभव पाठवावेत असं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे. मन की बात या कार्यक्रमाचा हा ६७ वा भाग असेल.
****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.05.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 01 June 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...