Tuesday, 21 July 2020

Text - AIR News Bulletin, Aurangabad 21.07.2020....Morning Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 21 July 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २१ जुलै २०२० सकाळी ७.१० मि.
****
·      कोरोना विषाणूची प्रस्तावित स्वदेशी कोवॅक्सिन लसीच्या मानवीय चाचणीसाठीची नोंदणी प्रक्रिया सुरू; स्वयंसेवकांना लसीचा पहिला डोस गुरूवारी दिला जाण्याची शक्यता.
·      महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पात्र शेतकऱ्यांना लाभ देण्याची प्रक्रिया अधिक गतिमान करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना.
·      राज्यात काल आणखी आठ हजार, २४० कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद, १७६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू.
·      औरंगाबाद जिल्ह्यात पाच कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू तर ४३८ नवे रुग्ण.
·      बीड आणि नांदेडमध्ये प्रत्येकी तीन तर उस्मानाबादमध्ये दोन रुग्णांचा मृत्यू.
·      बनावट सोयाबिन बियाणे उत्पादक आणि विक्रेत्यांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती.
आणि
·      गायीच्या दुधाला १० रुपये प्रतिलीटर तसंच दूध भुकटीला ५० रुपये प्रती किलो अनुदान देण्याच्या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाचं राज्यभर आंदोलन.
****
दिल्लीतल्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था- एम्समध्ये कोरोना विषाणूची प्रस्तावित लस - कोवॅक्सिनची मानवीय चाचणीसाठी नोंदणीची प्रक्रिया काल सुरू झाली. पहिल्याच दिवशी लोकांनी मोठा उत्साह दाखवल्याचं परीक्षण करणारे प्रमुख संशोधक डॉक्‍टर संजय राय यांनी सांगितलं. जवळपास एक हजार आठ लोकांनी या परीक्षणासाठी अर्ज केल्याचं त्यांनी सांगितलं. भारत बायोटेकनं तयार केलेल्या या स्वदेशी लसीचं एम्समध्ये केल्या जाणाऱ्या परीक्षणात पहिल्या टप्प्यात शंभर निरोगी व्यक्तींवर परीक्षण केलं जाईल. परीक्षण करून घेण्यासाठी पुढे आलेल्या स्वयंसेवकांची सुरक्षेसाठी एम्सच्या नीति समितीनं कठोर मानदंड तयार केले असल्याचं डॉक्टर राय यांनी आकाशवाणीला माहिती देतांना सांगितलं. प्रारंभीचा टप्पा पूर्ण झाल्यावर एक महिन्यानंतर मानवीय चाचण्या सुरू केल्या जातील, असं ते म्हणाले. स्वयंसेवकांना लसीचा पहिला डोस गुरूवारी दिला जाण्याची शक्यताही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
****
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पात्र शेतकऱ्यांना लाभ देण्याची प्रक्रिया अधिक गतिमान करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. यासंदर्भातल्या बैठकीत ते काल बोलत होते. या योजनेत ३२ लाख ९० हजार पात्र शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली होती. २० जुलै २०२० अखेर २७ लाख ३८ हजार खातेदारांना १७ हजार ६४६ कोटी रुपयांच्या रकमेचा लाभ देण्यात आला आहे. योजनेअंतर्गत एकूण प्रसिद्ध केलेल्या पात्र खातेदारांच्या यादीतल्या ८३ टक्के खातेदारांना योजनेचा लाभ मिळाला आहे. अद्याप पाच लाख ५२ हजार पात्र शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळाला नसल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत पात्र शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत योजनेचा लाभ देण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
****
अयोध्येतल्या बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयच्या विशेष न्यायालयासमोर माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांची साक्ष येत्या २४ जुलैला नोंदवणार आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांची साक्ष २३ जुलै रोजी, तर शिवसेनेचे माजी खासदार सतीश प्रधान यांची साक्ष २२ जुलै रोजी नोंदवली जाणार आहे. या तीनही नेत्यांच्या साक्षी दूरदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून नोंदवल्या जाणार आहेत.
****
अयोध्येत राम मंदीर उभारण्यातला मुख्य अडथळा शिवसेनेनं दूर केला असल्याचं, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. येत्या पाच ऑगस्टला राम मंदीरच्या भूमिपूजन सोहळ्यात शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहभागी होणार का, या प्रश्नाच्या उत्तरात राऊत बोलत होते. ठाकरे यापूर्वीही अयोध्येला अनेक वेळा गेले आहेत, या दौऱ्यांमध्ये राजकारण कधीही नव्हतं. अयोध्या आणि शिवसेनेतले बंध राजकारणापलिकडचे अतूट बंध असल्याचं राऊत यांनी म्हटल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
राज्यात काल आणखी आठ हजार, २४० कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या तीन लाख, १८ हजार, ६९५ झाली आहे. तर काल, १७६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत या आजारानं मृत्यू झालेल्यांची संख्या ११ हजार, ३० झाली आहे. तर काल पाच हजार, ४६० रुग्णांना बरे झाल्यानं रुग्णालयातून सुटी देण्यात आली. राज्यात आतापर्यंत एक लाख, ७५ हजार, ०२९ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या एक लाख, ३१ हजार, ३३४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
औरंगाबाद जिल्ह्यात काल पाच कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यामधे रामगोपाल नगर मधल्या ४८ वर्षीय, सिटी चौकातल्या ७४ वर्षीय आणि एन सात सिडको मधल्या ५२ वर्षीय पुरुष रुग्णासह, बकापूर पळशी इथल्या ४५ वर्षीय महिलेचा समावेश आहे. त्याचबरोबर वाशिम इथल्या ४५ वर्षीय व्यक्तीचाही काल औरंगाबाद इथं उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात या आजारनं मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ४०० झाली आहे.
दरम्यान, जिल्ह्यातल्या कोरोना विषाणू बाधितांच्या संख्येनं ११ हजाराचा टप्पा पार केला आहे. काल आणखी ४३८ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाल्यानं जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या ११ हजार २३९ झाली आहे. काल औरंगाबाद जिल्ह्यात विविध ठिकाणी सात हजार २०७ अँटीजेन आणि आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या. त्याद्वारे शहर प्रवेश नाक्यांवर २५, फिरत्या पथकानं केलेल्या तपासणीत १३९, ग्रामीण भागात करण्यात आलेल्या तपासणी ८९ तसंच जिल्हा सामान्य रुग्णालयात केलेल्या तपासणीत १० रुग्ण आढळले. तर काल १५९ जणांना बरे झाल्यानं रुग्णालयातून सुटी देण्यात आली. औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत सहा हजार ३०० रुग्ण बरे झाले असून, सध्या चार हजार ५४१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
बीड जिल्ह्यात काल तीन कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. गेवराई इथल्या ३२ वर्षीय महिलेसह बीड मधल्या एका वृद्ध महिलेचा, बीड इथं तसंच परळी तालुक्यातल्या ४२ वर्षीय शिक्षकाचा औरंगाबाद इथं उपचारादरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण १७ रुग्णांचा या विषाणूमुळं मृत्यू झाला आहे.
दरम्यान, बीड जिल्ह्यात काल आणखी २६ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यामध्ये बीड शहरातले १६, परळी पाच, गेवराई तीन, तर अंबाजोगाई आणि आष्टी इथला प्रत्येकी एक रुग्ण आहे. त्यामुळे जिल्ह्यातली एकूण बाधितांची संख्या ३८० झाली आहे. त्यापैकी १७४ रुग्ण बरे झाले असून, सध्या बीड जिल्ह्यात १८९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
नांदेड जिल्ह्यात काल तीन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, यात नांदेड शहरातल्या हिंगोली नाका भागातली ६४ वर्षीय महिला, देगलूर नाका भागातल्या ६५ वर्षीय पुरूष आणि नायगाव तालुक्यातल्या २६ वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत या आजारामुळं ४९ जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, नांदेड काल जिल्ह्यात ५१ नव्या रुग्णांची भर पडली. यामुळे जिल्ह्यातली एकूण रूग्णसंख्या ९८६ झाली आहे. काल १५ जण या आजारातून बरे झाल्यामुळं रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आतापर्यंत या आजारातून ५१५ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या ४२३ रुग्ण उपचार घेत आहेत. यापैकी ३१ रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर निळकंठ भोसीकर यांनी दिली.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात काल दोन कोरोना विषाणू बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. उमरग्याच्या ३८ वर्षीय पुरूषाचा सोलापूरमध्ये आणि टाकळी सुंभाच्या ५९ वर्षीय पुरूषाचा उस्मानाबादमध्ये काल मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यात या आजारानं मृत्यू पावलेल्यांची संख्या २८ झाली आहे.
दरम्यान, उस्मानाबाद जिल्ह्यात काल आणखी ४५ कोरोना विषाणूबाधित रुग्ण आढळले. यामध्ये उस्मानाबाद शहरातला एक आणि उमरगा शहरातले २६, तुळजापूर तालुक्यातल्या काटीचे चार आणि आंदूरचे दोन, वाशी तालुक्यातल्या तेरखेडाचे दोन, परंडा तालुक्यातल्या बावची आणि भूम तालुक्यातल्या राळेसावंगीचा प्रत्येकी एक रुग्ण आहे. जिल्ह्यातले सात जण अन्य जिल्ह्यात उपचार घेत आहेत. यामुळे जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या ५५३ झाली आहे. आतापर्यंत ३३८ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. सध्या १८७ रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 
****
जालना जिल्ह्यात काल ५३ नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आले. बाधितांमध्ये जालना शहरातल्या ४९ तर ग्रामीण भागातल्या चार रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातल्या एकूण बाधितांची संख्या एक हजार ५०१ झाली आहे.
दरम्यान, जालना शहरात कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर १४ दिवसांपासून लागू करण्यात आलेली संचारबंदी काल शिथिल करण्यात आली. त्यामुळे ग्राहकांनी बाजार तसंच बँक आणि कृषीसेवा केंद्रांसमोर गर्दी केल्यानं सामाजिक अंतर राखण्याच्या नियमांचं पालन केलं गेलं नाही. त्यामुळे नियमभंग करणाऱ्या नागरिकांवर पोलिसांनी कारवाई केली.
****
हिंगोली जिल्ह्यात काल आणखी २२ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. यामध्ये हिंगोली शहरातले १३, कळमनुरी सहा, तर वसमत इथले तीन रुग्ण आहेत. त्यामुळे जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या ४३३ झाली आहे. तर काल नऊ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यास आलं. जिल्ह्यात आतापर्यंत ३१९ रुग्ण बरे झाले आहेत.
दरम्यान, कळमनुरी तालुक्यातल्या कळमकोंडा इथल्या १७ वर्षीय तरुणाचा १७ जुलै रोजी सारी या आजारानं मृत्यू झाला होता. या तरुणाचा मृत्यूनंतरचा अहवाल काल कोरोना विषाणू बाधित असा आला. 
****
परभणी जिल्ह्यात काल सहा कोरोना विषाणूबाधित रुग्णांची नोंद झाली. यामुळे जिल्ह्यातल्या रुग्णांची एकूण संख्या ४०५ झाली आहे. यापैकी १८३ रुग्ण बरे झाले आहेत तर १३ जणांचा या आजारामुळं मृत्यू झाला आहे. सध्या जिल्हा शासकीय रुग्णालयात २०९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
लातूर जिल्ह्यात काल आणखी ५३ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. जिल्ह्यातली एकूण बाधितांची संख्या एक हजार १५९ झाली आहे. त्यापेकी ५८० जण बरे झाले असून, ५३ जणांचा मृत्यू झाला. लातूर जिल्ह्यात सध्या ५२६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
दरम्यान, लातूर जिल्ह्यात सध्या लागू असलेल्या संचारबंदीच्या निर्बंधांमध्ये, आजपासून येत्या २४ जुलैपर्यंत काही बदल करण्यात आले आहेत. याबाबत माहिती देताना जिल्हाधिकारी जी. श्रीकांत म्हणाले –
संपूर्ण जिल्ह्यामधे २० जुलैपासून ते २४ जुलैपर्यंत थोड्या प्रमाणात आपण शिथिलता दिलेली आहे. चार दिवसामधे आपण किराणा दुकान, भाजीपाल्याचे दुकान, कुठेही फेरीवाल नव्हे आणि फ्रुटस्‍चे दुकान, बेरीचे दुकान, हे १२ वाजेपर्यंत परवानगी दिलेली आहे. भाजीपाला खरेदीसाठी असेल, किराणा खरेदी असेल, दुचाकी वापर करता येणार नाही. त्याठिकाणी सायकल किंवा जवळ पायी जाऊन त्याठिकाणी खरेदी करावा. चार दिवसानंतर असेच physical distancing ची परिस्थिती चांगली असेल आणि तसेच कुठेही केसेसच्या वाढत्या संख्या आम्ही लक्षात घेऊन जर पुढे अजून सहा दिवस वाढ करायची किंवा नाही ते २४ तारखेला आम्ही निर्णय घेण्यात येणार आहे.
****
मुंबईत कोरोना विषाणू बाधित रुग्णांची एकूण संख्या एक लाख दोन हजार २६७ वर गेली असली, तरी यातले आतापर्यंत तब्बल ७२ हजार ६५० रुग्ण विषाणूमुक्त होऊन घरी परतले आहेत. काल दिवसभरात एक हजार ४३ नवे रुग्ण आढळले तर ४१ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबरोबरच शहरातली एकूण मृतांची संख्या पाच हजार ७५२ झाली आहे. काल दिवसभरात आजारातून बरे झाल्यानं ९६५ रुग्णांना घरी सोडण्यात आलं. शहरात आता २३ हजार ८६५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
पुणे जिल्ह्यात काल दोन हजार ६०१, रायगड ३५८, जळगाव २०८, सातारा १२८, सांगली ६१, धुळे आणि रत्नागिरी जिल्ह्यात प्रत्येकी ३७, वाशिम २५, यवतमाळ २२, बुलडाणा १३, गडचिरोली पाच, तर भंडारा जिल्ह्यात काल एक कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळला.   
दरम्यान, राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. स्वतः शेख यांनी सामाजिक संपर्क माध्यमाद्वारे काल याबाबत माहिती दिली.
****
विधान परिषद सदस्य नांदेड काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमरनाथ राजूरकर यांनाही कोरोना विषाणूची बाधा झाली आहे. त्यांनी काल केलेल्या अँटीजन चाचणीत हे निदान झालं. दोन दिवसांपूर्वी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आरोग्य विषयक आढावा बैठकीत ते उपस्थित होते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनातील काही वरिष्ठ अधिकारी स्व विलगीकरणात गेले आहेत तर काहींनी कोरोना विषाणू चाचणी करून घेतली आहे. 
****
खाजगी रुग्णालयांनी आपल्याकडे उपलब्ध असलेला अतिदक्षता विभाग, गंभीर आजारी असलेल्या रुग्णांनाच प्राधान्यानं उपलब्ध करुन द्यावा, असे निर्देश नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी दिले आहेत. कोविड-19 प्रतिबंधात्मक उपाययोजनाअंतर्गत जिल्हा प्रशासनानं जारी केलेल्या आदेशात हे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्ह्यातल्या खाजगी रुग्णालयांत उपलब्ध असलेले अतिदक्षता विभाग ही जिल्ह्यातील आरोग्यविषयक सोई-सुविधांच्या दृष्टीनं मोठी उपलब्धी असून ती सुविधा ज्यांना खरच आवश्यकता आहे अशा गंभीर आजारी असलेल्या रुग्णांना उपलब्ध व्हावी असंही यात म्हटलं आहे.
दरम्यान, नांदेड जिल्ह्याला राज्य सरकारने ५०० ॲन्टीजन चाचणी संच उपलब्ध करून दिले आहेत. आणखी पाच हजार अँटीजेन चाचणी संच उपलब्ध होणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर निळकंठ भोसीकर यांनी दिली आहे.
****
सोयाबिन बोगस बियाणे कंपन्या, पुतवठादार आणि बियाणे निरिक्षकांचा शोध घेऊन त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं यासंदर्भात स्वत:हून जनहित याचिका दाखल करुन घेतली होती. न्यायालयाच्या या निर्णयाला काही कंपन्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं असून, न्यायालयानं याचिकाकर्त्यांचं अपिल सुनावणीसाठी दाखल करुन घेत नंतरची सुनावणी होईपर्यंत उच्च न्यायालयाच्या आदेशास स्थगिती दिली आहे.
****
केंदीय लोकसेवा आयोगाच्या २०१९ या वर्षी व्यक्तीमत्व चाचणी फेरीसाठी निवड झालेल्या उर्वरित उमेदवारांची परिक्षा येत्या २० ते ३० जुलै दरम्यान घेण्यात येणार आहे. कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर लागू टाळेबंदीमुळं ही परिक्षा स्थगित करण्यात आली होती. देशात सध्या पुरेशी रेल्वे सेवा उपलब्ध नसल्यानं उर्वरित ६२३ उमेदवारांना दोन्ही बाजूच्या विमान प्रवासाचं भाडं दिलं जाईल, असं आयोगानं म्हटलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २६ तारखेला ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवाशियांसी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमासाठी श्रोत्यांनी आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी प्रेरणादायी सामूहिक प्रयत्नांचे अनुभव पाठवावेत असं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे. मन की बात या कार्यक्रमाचा हा ६७ वा भाग असेल.
****
गायीच्या दुधाला १० रुपये प्रतिलीटर अनुदान तसंच दुध भुकटीला ५० रुपये प्रती किलो अनुदान द्यावं, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षानं काल राज्यात आंदोलन केलं. औरंगाबाद, उस्मानाबाद, परभणी, बीड, सांगली, नाशिक इथं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. शासनानं एक ऑगस्टपूर्वी दूध दरवाढीचा निर्णय न घेतल्यास भाजप, रयत क्रांती संघटना, शिवसंग्राम, राष्ट्रवादी समाज पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षांनी एकत्रितरित्या राज्यव्यापी दूध आंदोलनाचा इशारा दिला आहे.
औरंगाबाद इथं भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय औताडे, उस्मानाबाद इथं जिल्हाध्यक्ष नितीन काळे, नांदेड इथं महानगराध्यक्ष प्रवीण साले आणि परभणीत जिल्हाध्यक्ष डॉ.सुभाष कदम, बीड इथं शिवसंग्राम संघटनेचे प्रभाकर कोलंगडे यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाला निवेदन देण्यात आलं.
नाशिक जिल्हा आणि शहर भाजपच्या वतीनंही काल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून निवेदन देण्यात आलं. अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर इथं भाजप आणि मित्र पक्षाच्या वतीनं प्रांताधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं.
सांगली जिल्ह्यात बंगळुरु महामार्गावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं दूध दरवाढीसाठी आंदोलन सुरु असून, आज पहाटे आंदोलकांनी गोकुळ दूध संघाचा टँकर उडवून रस्त्यावर ओतून दिला. 
दरम्यान, दूध दरप्रश्नी चर्चा करण्यासाठी आज दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला महानंदचे अध्यक्ष, दुग्ध व्यवसाय विभागाचे प्रधान सचिव, आयुक्त, विविध शेतकरी संघटनेचे प्रमुख, तसंच राज्यातल्या विविध दूध संघांचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक उपस्थित राहणार आहेत.
****
नांदेड जिल्ह्याच्या देगलूर तालुक्यातील हणेगाव आणि परीसरात काल दुपारी एक तास मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे शेतातील सकल भागात पाणी साचलं. काल लोहा तालुक्यातही मुसळधार पाउस झाला यामुळं हाडोळी इथल्या नदीला पुर आला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
परभणीहून जिंतूरला जाणारी एसटी महामंडळाची बस काल रस्त्यावरच्या चिखलावरून घसरली. या अपघातात सुदैवानं एकही प्रवासी गंभीर जखमी झाला नसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
हिंगोली - औंढा मुख्य रस्त्यावर येहळेगाव सोळंके शिवारात काल सायंकाळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं राजहंस दुध घेऊन जाणारा ट्रक जाळण्याचा प्रयत्न केला. आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत वाहनाच्या टायरवर पेट्रोल ओतून ट्रक पेटवून दिला.
****
शेतकरी, व्यापारी, छोटे व्यावसायिक तसंच घरगुती वीज ग्राहक यांना आलेलं वाढीव वीज बिल माफ करावं या मागणीसाठी बीड इथं भारतीय जनता पक्षाच्या वतीनं काल हालगी बजाओ आंदोलन करण्यात आलं. यामागणीसह विजेच्या ताराला चिकटून मृत्यू झालेल्या दोन शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दहा लाख रूपयांची मदत द्यावी या मागण्यांचे निवेदन यावेळी अधीक्षक अभियंत्यांना देण्यात आलं.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग मनाई आदेशांचं उल्लंघन केल्याप्रकरणी तीन गुन्हे नोंदवण्यात आले. जिल्ह्यातल्या कळंब इथं विनापरवाना धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केल्यामुळे, तर उमरगा तालुक्यातील कवठा इथं विवाह सोहळ्यात ५० पेक्षा जास्त व्यक्तीं असल्यानं आणि कोरोना विषयक कोणतीही खबरदारी न घेतल्यानं वधु-वरासह मंगल कार्यालय व्यवस्थापकावर गुन्हा दाखल झाला. उस्मानाबाद शहरात भाजी विकतांना नाका तोंडाला मास्क न लावलेल्या एका विक्रेत्यांवरही गुन्हा दाखल झाला आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या पाटोदा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी शशिकांत भोसले आणि त्यांच्या वाहनचालकास ६० हजार रुपयांची लाच घेताना काल रंगेहात पकडण्यात आलं. नगर पंचायतीच्या स्वच्छता विभागातलं बील काढण्यासाठी भोसले याने तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली होती. 
****
नांदेड जिल्ह्याच्या देगलूर तालुक्यातल्या हणेगाव आणि परिसरात काल दुपारी एक तास मुसळधार पाऊस झाला. बीड शहरात रात्रभर पावसाची संततधार सुरु होती. जिल्ह्यात अनेक भागात रिमझिम पाऊस झाला. अंबाजोगाई शहर आणि परिसरातही आज पहाटेपर्यंत पाऊस सुरु होता.
****
शेतकऱ्यांनी ३१ जुलैपर्यंत पिक विमा काढून घेण्याचं आवाहन औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी केलं आहे. खरीप पीक विमा बाबतच्या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत काल ते बोलत होते. शेतकऱ्यांनी कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पीक विमा भरण्यासाठी एकाच वेळी गर्दी करु नये, तसंच त्या दृष्टीनं संबंधित यंत्रणांनी योग्य ती खबरदारी घ्यावी अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
****
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेचं आयोजन पुढे ढकलण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेनं घेतला आहे. यजमान ऑस्ट्रेलियानं या स्पर्धेचं आयोजन करण्याबाबत असमर्थतता दर्शवल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. १८ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर दरम्यान या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं.
****
वाशिम जिल्ह्यात सर्व भागात हिरवी पाने खाणाऱ्या अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसत असून ही अळी संत्र्याची पाने खात असल्यानं झाडांच्या पोषणाला मोठी बाधा पोहोचत आहे. संत्र्याच्या बहराला त्याचा फटका बसून उत्पादनात घट होण्याची भिती शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
****
कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून वाशिम जिल्ह्यातली कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती अनिश्चित काळासाठी बंद करण्याचा निर्णय बाजार समिती प्रशासनानं घेतला आहे.
****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.06.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 01 June 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्...