Saturday, 5 December 2020

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 05 December 2020 Time 18.00 to 18.10 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 05 December 2020

Time 18.00 to 18.10

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – डिसेंबर २०२० सायंकाळी ६.००

****

** हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा देशातला सर्वोत्तम महामार्ग ठरेल, - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

** सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर मराठा आरक्षण प्रकरणी सुनावणीसंदर्भात पाच वकिलांची समन्वय समिती गठीत

** भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त उद्या दादरच्या चैत्यभूमीवरून शासकीय मानवंदनेचं थेट प्रसारण

आणि

** औरंगाबाद इथं दोन कोविडग्रस्तांचा तर जालन्यात एका कोविडग्रस्ताचा मृत्यू

****

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा देशातला या प्रकारचा सर्वोत्तम महामार्ग ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. आज अमरावती तसंच औरंगाबाद जिल्ह्यात या महामार्गाच्या कामाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते, महामार्गाचं कामं गतीनं होत असून, येत्या सहा महिन्यात शिर्डीपर्यंत हा मार्ग खुला होईल, असं मुख्यमंत्री म्हणाले.

आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास मुख्यमंत्री औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर तालुक्यात गोलवाडी इथं पोहोचले, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून त्यांनी समृद्धी महामार्गाच्या प्रगती कामाचा आढावा घेतला. राज्य रस्ते विकास महामंडळ आणि एलअँडटी कंपनीच्यावतीने समृद्धी महामार्गाच्या या टप्प्याबाबत सविस्तर सादरीकरण करण्यात आलं. सुमारे ५८ किलोमीटरच्या महामार्गाच्या धावपट्टीदरम्यानचे, छोटे पूल, मोठे पूल, या भागातल्या हरणांना जाण्यासाठी रस्ता, आदींची तपशीलवार माहिती यावेळी सादर करण्यात आली.

त्यानंतर  स्वतः गाडी चालवत मुख्यमंत्र्यांनी या महामार्गाच्या कामाची पाहणी केली. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनीही प्रकल्पाच्या सद्यस्थितीबाबत मुख्यमंत्र्यांना माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पाच्या कामाबाबत समाधान व्यक्त करत, महामार्गाचा हा टप्पा येत्या महाराष्ट्र दिनापूर्वी पूर्ण करण्याची सूचना केली.

दरम्यान, समृद्धी महामार्गामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान फलक झळकावत, आपल्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधलं

****

मराठा आरक्षण प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठासमोर येत्या ९ तारखेला होणाऱ्या सुनावणीसाठी पाच वकिलांची समन्वय समिती गठीत करण्यात आली आहे. मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ही समिती जाहीर केली. विधीज्ञ आशिष गायकवाड,  राजेश टेकाळे,  रमेश दुबे पाटील, अनिल गोळेगावकर आणि अभिजीत पाटील या वकिलांचा या समितीत समावेश आहे. मराठा आरक्षणासंदर्भात होणाऱ्या या सुनावणीच्या अनुषंगाने मराठा समाजातले नागरिक, समन्वयक, जाणकार, अभ्यासक तसंच संघटनांना कायदेशीर स्वरूपाच्या सूचना मांडायच्या असतील तर त्यांना समन्वय समितीतल्या सदस्यांशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. ही समिती आलेल्या सूचनांचा अभ्यास करून त्याबाबत राज्य शासनाच्या वकिलांना माहिती देणार आहे.

****

कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिसूत्रीचं पालन करण्याचं आवाहन औरंगाबाद पदवीधर मतदार संघातले नवनिर्वाचित आमदार सतीश चव्हाण यांनी केलं आहे.

****

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागानं विशेष माहिती पुस्तिका तयार केली आहे. आज दादरच्या चैत्यभूमी परिसरात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते या माहिती पुस्तिकेचं प्रकाशन करण्यात आलं.

दरम्यान, बाबासाहेबांच्या अनुयायांना उद्या महापरिनिर्वाण दिनी दादरला चैत्यभूमीवर न येता अभिवादन करता यावं, यासाठी चैत्यभूमीवरच्या शासकीय मानवंदना तसंच पुष्पवृष्टीचं थेट प्रक्षेपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सामाजिक संपर्क माध्यमावरून तसच दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरुन करण्यात येणार आहे. सकाळी पावणे आठ ते नऊ या कालावधीत शासकीय मानवंदना आणि हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टीचं प्रसारण होईल. त्यानंतर, सकाळी ९.५०, १०.५०, ११.५० तसंच दुपारी १२ वाजून ५० मिनिटांनी असा १० मिनिटांसाठी थेट प्रक्षेपण केलं जाणार आहे, अशी माहिती दूरदर्शनच्या मुंबई केंद्राकडून देण्यात आली आहे.

****

शेतकऱ्यांकडे असलेल्या दुभत्या गायींचं उत्पादन वाढवण्यासाठी भ्रूण जैवतंत्रज्ञान प्रयोगशाळेचा लाभ होईल, असं राज्याचे पशु संवर्धन, दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय गोकुळ मिशनच्या सहकार्याने नागपुरात तेलंगखेडी इथं उभारण्यात आलेल्या भ्रूण जैवतंत्रज्ञान प्रयोगशाळेच्या उद्घाटन समारंभात ते आज  बोलत होते. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. हे भ्रूण जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या गायींपर्यंत पोहोचवण्यासाठी केंद्र तसंच राज्य शासनाच्या समन्वयातून पशुवैद्यकांना प्रशिक्षण देण्याची सूचना गडकरी यांनी केली. तीन कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या प्रयोगशाळेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना उपयोग होऊन, त्याचं जीवनमान - आर्थिक स्तर उंचावला जावा, असंही गडकरी म्हणाले.  

****

चंद्रपूर जिल्ह्यात बल्लारपूर आणि गोंडपिपरी तालुक्यातल्या कन्हाळगाव वन्यजीव अभयारण्याला राज्य वन्यजीव मंडळानं मान्यता दिली आहे. कन्हाळगाव अभयारण्य हे राज्यातलं पन्नासावं अभयारण्य ठरलं आहे.

****

मृदा आरोग्याच्या क्षेत्रात भारतानं अन्य देशांसमोर आदर्श स्थापन केला असल्याचं, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे. आजच्या जागतिक मृदा दिनाच्या पार्श्वभूमीवर एका ट्विट संदेशात जावडेकर यांनी, संपूर्ण जगभरात मृदा आरोग्याबाबत जागरुकता निर्माण करणं आवश्यक असल्याचं मत व्यक्त केलं. फक्त जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठीच नव्हे, तर पर्यावरण संतुलनासाठीदेखील ही बाब महत्त्वपूर्ण असल्याचं जावडेकर यांनी या ट्विटमध्ये नमूद केलं आहे.

****

जागतिक मृदा दिनानिमित्त उस्मानाबाद तालुक्यात किणी आणि तडवळा इथं शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिकांचं वाचन आणि त्यानुसार काढलेल्या सुपीकता निर्देशांकाप्रमाणे खत देण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उमेश घाडगे, यांच्यासह अनेक तज्ज्ञांनी या प्रशिक्षण कार्यक्रमात विविध मुद्यांवर सविस्तर मार्गदर्शन केलं. रासायनिक खतांचा वापर प्रकर्षाने टाळण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं.

****

औरंगाबाद इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात आज दोन कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर उपचारानंतर बरे झालेल्या सहा रुग्णांना सुटी देण्यात आली. जिल्ह्यात या संसर्गामुळे मृत्यूंची एकूण संख्या आता एक हजार १५६ झाली आहे, तर संसर्गातून मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ४१ हजार ६८६ झाली आहे. जिल्ह्यात कोविडग्रस्तांची एकूण संख्या ४३ हजार ७६० झाली असून सध्या ९१८ जणांवर उपचार सुरू आहेत.

****

जालना जिल्ह्यात आज एका कोविडबाधित रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात या संसर्गामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या आता ३२४ वर पोहोचली आहे. दरम्यान, आज दिवसभरात जिल्ह्यात २१ नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आले. जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता बारा हजार ६५८ झाली आहे. उपचारानंतर कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झालेल्या आठ रुग्णांना आज सुटी देण्यात आली. आजपर्यंत जिल्ह्यातले अकरा हजार ८४८ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत.

****

हिंगोली येथील प्रतिष्ठित व्यापारी रामप्रकाश देवडा यांचं आज पहाटे हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं, ते ७४ वर्षांचे होते. हिंगोली इथल्या ओमप्रकाश देवडा बँकेचे संचालक तसंच गांधी सेवा ट्रस्टचे ते उपाध्यक्ष होते. त्यांच्या पार्थिव देहावर कयाधू नदीच्या तीरावरच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

****

लातूर इथल्या स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. वंदना प्रदीप उगीले यांचं आज अल्पशा आजारानं निधन झालं. देशातल्या पहिल्या खाजगी एचआयव्ही एड्स रुग्णालयाच्या उभारणीत त्यांचं मोठं योगदान आहे. पती डॉ. प्रदिप उगीले यांच्या निधनानंतर डॉ वंदना यांनी या एचआयव्ही एड्स रुग्णालयाची धुरा समर्थपणे सांभाळली. त्यांच्या पार्थिव देहावर आज

सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

****

परभणी जिल्ह्याच्या पाथरी शहरातून पोलिसांनी साडे चार लाख रुपयांचा गुटख्याचा साठा जप्त केला. मुर्तुजा मोहल्ला परिसरात काल रात्री उशीरा ही कारवाई करण्यात आली.

****////****

 

 

 

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 20.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 20 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...