Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 05 December 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०५ डिसेंबर २०२० दुपारी १.०० वा.
****
नवीन
कृषी कायद्याबाबत केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींमध्ये आज चर्चेची पाचवी
फेरी होणार आहे. शेतकरी चर्चेला प्रतिसाद देत असून, ते आंदोलन मागे घेतील, असा विश्वास
केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी व्यक्त केला आहे. ते आज नवी दिल्ली इथं
वार्ताहरांशी बोलत होते. शेतकऱ्यांशी सर्व मुद्द्यांवर चर्चा करायला केंद्र सरकार तयार
असून, त्यांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असं सांगून कृषी मंत्र्यांनी,
विवादात्मक मुद्यांवर चर्चा करण्याचं आवाहन केलं. किमान आधारभूत किंमत प्रणाली कायम
राहील, असं आश्वासन त्यांनी शेतकऱ्यांना दिलं आहे.
दरम्यान,
सुधारित कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांनी येत्या ८ डिसेंबर रोजी
भारत बंदची हाक दिली आहे. काल दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत शेतकरी नेत्यांनी सरकारच्या
धोरणांविरोधात रोष व्यक्त केला.
****
हिंदूहृदयसम्राट
बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री आज अमरावती आणि
औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. अमरावती जिल्ह्यातल्या शिवणी रसूलापूर इथं महामार्गाच्या
कामाचा आढावा घेतल्यानंतर दुपारी दोन वाजेदरम्यान मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने औरंगाबाद
जिल्ह्याच्या वैजापूर तालुक्यातल्या मौजे गोळवडी इथं येणार असून, महामार्गाची पाहणी
करणार आहे.
****
देशात
काल दिवसभरात ३६ हजार ६५२ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर ५१२ जणांचा उपचारादरम्यान
मृत्यू झाला. देशातली एकूण रुग्णसंख्या ९६ लाख आठ हजार २११ झाली आहे. देशात आतापर्यंत
या विषाणू संसर्गानं एक लाख ३९ हजार ७०० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशाचा मृत्यूदर
एक पूर्णांक ४५ शंतांश टक्के इतका आहे. तर काल ४२ हजार ५३३ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना
घरी सोडण्यात आलं. देशात आतापर्यंत ९० लाख ५८ हजार ८२२ रुग्ण बरे झाले असून, देशात
रुग्ण बरे होण्याचा दर ९४ पूर्णांक २० शतांश टक्के इतका आहे. सध्या चार लाख नऊ हजार
६८९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. काल ११ लाख ५७ हजार ७६३ कोविड चाचण्या करण्यात आल्या,
देशभरात आतापर्यंत १४ कोटी ५८ लाख ८५ हजार ५१२ चाचण्या करण्यात आल्याचं भारतीय वैद्यकीय
संशोधन परिषदेनं सांगितलं.
****
मुंबईत
काल ८१३ नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर १४ जणांचा मृत्यू झाला.
मुंबईत आतापर्यंत एकूण रुग्णांची संख्या दोन लाख ८४ हजार ५०२ झाली असून, एकूण मृतांचा
आकडा दहा हजार ८७१ वर पोहचला आहे. रुग्णवाढ दिसत असली तरी काल दिवसभरात एक हजार २५
रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. मुंबईत आतापर्यंत दोन लाख ५९ हजार १३७
रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या १२ हजार ९२६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
राज्यात
रोहित्रे नादुरुस्त होण्याचं प्रमाण खूप असल्यानं त्याची कारणं शोधून तत्काळ उपाययोजना
करण्याचे निर्देश ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी महावितरणला दिले आहेत. मुंबईत यासंदर्भातल्या
बैठकीत ते काल बोलत होते. रब्बी हंगामात सिंचन सुरळीत होण्यासाठी नादुरुस्त रोहित्रे
तातडीने बदलून द्या, असंही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलं. नवीन कृषी धोरणात
शेतकऱ्यांना तात्काळ वीज जोडणी देण्याचं धोरण असल्यानं शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा
सरकारचा प्रयत्न राहील, असं ते म्हणाले. रोहित्र नादुरुस्त होण्याच्या कारणांचा शोध
घेण्यासाठी रोहित्रांचं सर्वेक्षण ३१ डिसेंबर पर्यंत पूर्ण करून अहवाल सादर करावा,
वाढलेल्या वीज वापरामुळे अतिभारीत झालेल्या रोहित्रांची क्षमता वाढ करावी, योग्य नियोजन
करून रोहित्र नादुरुस्तीचे प्रमाण नगण्य करावं, असे निर्देशही राऊत यांनी दिले.
****
भारतरत्न
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं होणारे कार्यक्रम कोविड
प्रतिबंधात्मक नियम पाळून साध्या पद्धतीने घेण्याचं आवाहन औरंगाबादचे जिल्हाधिकारी
सुनील चव्हाण यांनी केलं आहे. दादर इथल्या चैत्यभूमीवरच्या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण
करण्यात येणार असल्यानं, बाबासाहेबांच्या अनुयायांनी आपापल्या घरातूनच बाबासाहेबांना
अभिवादन करण्याचं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे.
****
जागतिक
मृदा दिनानिमित्त उस्मानाबाद तालुक्यातल्या किणी इथं मृदा आरोग्य पत्रिका शेतकरी प्रशिक्षण
कार्यक्रम घेण्यात आला. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उमेश घाडगे, तालुका कृषी अधिकारी
ज्ञानेश्वर जाधव यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केलं.
****
विशेष
घटक योजनेअंतर्गत अहमनदगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यातल्या अनुसूचित जाती प्रवर्गातल्या
१४ लाभार्थ्यांना पावणे नऊ लाख रुपयांचं अनुदान वितरीत करण्यात आलं. विशेष घटक योजना
जिल्हा परिषदे अंतर्गत २०१९-२० नुसार ही निवड करण्यात आली असून, शेती पूरक व्यवसाय
म्हणून हे अनुदान देण्यात येत आहे.
****
परभणी
जिल्ह्यात तापमानात मोठी घट झाली असून आज सकाळी आठ पूर्णांक आठ अंश सेल्सिअस तापमान
नोंदवलं गेलं. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागानं ही
माहिती दिली.
****
No comments:
Post a Comment