आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
०५ डिसेंबर २०२०
सकाळी ११.०० वाजता
****
नवीन
कृषी कायद्याबाबत केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींमध्ये आज चर्चेची पाचवी
फेरी होणार आहे. शेतकऱ्यांशी सर्व मुद्यांवर चर्चा करायला केंद्र सरकार तयार असून,
त्यांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे अशी ग्वाही केंद्रीय कृषीमंत्री
नरेंद्रसिंग तोमर यांनी दिली.
दरम्यान,
सुधारित कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांनी येत्या ८ डिसेंबर रोजी
भारत बंदची हाक दिली आहे. काल दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत शेतकरी नेत्यांनी सरकारच्या
धोरणांविरोधात रोष व्यक्त केला.
****
अन्वय
नाईक आत्महत्या प्रकरणी आज रायगड जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. या प्रकरणातले
आरोपी पत्रकार अर्णब गोस्वामी यांना पोलीस कोठडी मिळावी यासाठी रायगड पोलिसांनी न्यायालयात
दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेवर आणि इतर आरोपी नितेश, फिरोज याच्या जामिनावर ही
सुनावणी होणार आहे.
****
आयुर्वेदातल्या
शल्य आणि शालक्य पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या डॉक्टरांना शस्त्रक्रियांची परवानगी देणाऱ्या
‘भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या अधिसूचनेविरोधात 'इंडियन मेडिकल असोसिएशन’ नं देशव्यापी
आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. असोसिएशनचे मानद राज्य सचिव डॉ. पंकज बंदरकर यांनी काल
पुण्यात ही माहिती दिली. ११ डिसेंबर रोजी अत्यावश्यक नसलेल्या सेवा आणि कोविड सेवा
वगळता अन्य वैद्यकीय सेवा सकाळी सहा ते सायंकाळी सहा या कालावधीत बंद राहणार असल्याचं
त्यांनी सांगितलं.
****
औरंगाबाद
जिल्ह्यात आदिवासी विकास विभागांतर्गतल्या शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा तसंच
एकलव्य निवासी शाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांकरता
आदिवासी विभागांतर्गत असलेली शासकीय वसतीगृहं सुरु करण्यासही मान्यता देण्यात येत असल्याचं,
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितलं. संबंधितांनी कोविडसंबंधी शासनाच्या सूचनांचं
कटाक्षानं पालन करावं, असंही याबाबतच्या आदेशात नमूद करण्यात आलं आहे.
****
राज्यात
गेल्या काही दिवसांपासून तापमानात पुन्हा घट झाली आहे. नाशिक इथं आज ११ अंश सेल्सिअस
तापमानाची नोंद झाली. परभणी जिल्ह्यातही तापमानात लक्षणीय घट झाली आहे.
****
No comments:
Post a Comment