Wednesday, 16 December 2020

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 16.12.2020 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 16 December 2020

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १६ डिसेंबर २०२० दुपारी १.०० वा.

****

भारतात कोविड १९ मुळे होणाऱ्या मृत्यूचा दर जगात सगळ्यात कमी असून, तो एक पूर्णांक चार पाच शतांश टक्के असल्याचं केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितलं. देशात कोरोना विषाणूचे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढलं असून, ते आता ९५ पूर्णांक २१ शतांश टक्के इतकं झालं आहे. कोविड १९ च्या लसीशी संबंधित कामासाठी देशात बहुस्तरीय प्रणाली काम करत असल्याचं राजेश भूषण यांनी सांगितलं. केंद्र आणि राज्यांच्या २३ मंत्रालयांना लसीकरणाचं काम सोपवण्यात आल्याचं ते म्हणाले. शीतगृहासंबंधी दिशानिर्देश जारी केले असल्याचंही आरोग्य सचिवांनी सांगितलं.

****

देशात काल दिवसभरात २६ हजार ३८२ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर ३८७ जणांचा मृत्यू झाला. देशातली एकूण रुग्णसंख्या ९९ लाख ३२ हजार ५४८ झाली आहे. देशात आतापर्यंत या विषाणू संसर्गानं एक लाख ४४ हजार ९६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल ३३ हजार ८१३ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. आतापर्यंत ९४ लाख ५६ हजार ४४९ रुग्ण बरे झाले असून, सध्या तीन लाख ३२ हजार दोन रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

२०२१ च्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. ब्रिटनचे परराष्ट्र सचिव डॉमॅनिक राब यांनी या वृत्तास दुजोरा दिला. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी काल राब यांची बैठक झाल्यानंतर त्यांनी ही घोषणा केली. द्विपक्षीय चर्चेसाठी राब हे भारत भेटीवर आहेत. प्रजासत्ताक दिनाला येण्याचे निमंत्रण जॉन्सन यांनी स्वीकारलं असून, दोन्ही देशांमधले संबंध यामुळे आणखी वृद्धींगत होतील, असं जयशंकर म्हणाले.

****

कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर संसदेचं हिवाळी अधिवेशन यंदा रद्द करण्यात आलं आहे. संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी ही माहिती दिली. हिवाळ्याच्या प्रारंभी कोविड संसर्गात दिसून आलेली वाढ पाहता, हिवाळी अधिवेशन बोलवू नये, यावर सर्वपक्षीय नेत्यांसोबत झालेल्या चर्चेत, एकमत झाल्याचं जोशी यांनी सांगितलं. येत्या जानेवारी महिन्यात संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन बोलावण्यात येईल, असं जोशी यांनी सांगितलं आहे.

****

भारत-पाकिस्तान दरम्यान १९७१ मध्ये झालेल्या युद्धात १६ डिसेंबर रोजी भारतानं विजय मिळवला आणि बांगलादेशची निर्मिती झाली, हा दिवस आज विजय दिवस म्हणून साजरा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्वर्णिम विजय मशाल प्रज्वलित करून भारत-पाक युद्धाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचा प्रारंभ केला. चार मशाली पंतप्रधानांनी प्रज्वलित केल्या असून, त्या देशाच्या कानाकोपऱ्यात फिरवण्यात येणार आहेत. तत्पूर्वी पंतप्रधानांनी राष्ट्रीय समर स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करुन या युद्धातल्या हुतात्म्यांना अभिवादन केलं.

****

महिलांवरील होणाऱ्या लैंगिक अत्याचाराला प्रतिबंध करण्यासाठी प्रस्तावित शक्ती विधेयकावर चर्चा करण्यासाठी २१ सदस्यांची संयुक्त समिती स्थापन करण्यात आली आहे. पुढच्या अधिवेशनात या विधेयकावर चर्चा केली जाणार असल्याचं, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं.

****

मुंबईत काल ५२१ नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर सात जणांचा मृत्यू झाला. मुंबईत आतापर्यंत रुग्णांची एकूण संख्या दोन लाख ८५ हजार ५८० झाली आहे, तर मृतांचा आकडा दहा हजार ९९५ वर पोहोचला आहे. काल ४३० रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. मुंबईत आतापर्यंत दोन लाख ६४ हजार ८५१ रुग्ण बरे झाले असून, सध्या आठ हजार ८१२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

औरंगाबाद जिल्ह्यात सध्या ४९३ कोरोना विषाणू बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या ४४ हजार ५२२ झाली असून, त्यापैकी ४२ हजार ८५२ रुग्ण बरे झाले आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात काल ९३ रुग्णांची नव्यानं भर पडली, तर दोन जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात या विषाणू संसर्गानं आतापर्यंत एक हजार १७७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

****

चंद्रपूर जिल्ह्यात चंद्रपूर-मूल मार्गावर अजयपूर इथं ट्रॅक्टर आणि कारची धडक होऊन झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. काल रात्री हा अपघत झाला. चंद्रपूर-मूल मार्ग राष्ट्रीय महामार्गत परिवर्तित होत असल्यानं मोठ्या प्रमाणात कामं सुरू आहेत. सध्या हा मार्ग विस्कळीत असून यामुळे अपघातांमध्ये वाढ झाली आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २७ डिसेंबरला आकाशवाणीवरच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेच्या दुसऱ्या टप्प्यातला हा एकोणिसावा भाग आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.

****

भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान चार कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना उद्या ॲडिलेड इथं खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी नऊ वाजता सामन्याला सुरुवात होईल. बॉर्डर - गावस्कर चषकाचा हा दिवस रात्रीचा सामना गुलाबी चेंडूनं खेळला जाणार आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 23.04.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 23 April 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्र...