Wednesday, 16 December 2020

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 16.12.2020 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

१६ डिसेंबर २०२० सकाळी ११.०० वाजता

****

भारत पाकिस्तान दरम्यान १९७१ मध्ये झालेल्या युद्धात १६ डिसेंबर रोजी भारतानं विजय मिळवला, आणि बांगलादेशची निर्मिती झाली, हा दिवस आज विजय दिवस म्हणून साजरा होत आहे. या विजयाचं हे सुवर्ण महोत्सवी वर्ष असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्वर्णिम विजय मशाल प्रज्वलित करून भारत-पाक युद्धाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचा प्रारंभ केला. चार मशाली पंतप्रधानांनी प्रज्वलित केल्या असून, त्या देशाच्या कानाकोपर्यात फिरवण्यात येणार आहेत.

१३ दिवस झालेल्या या युद्धाअखेर ९० हजार पाकिस्तानी सैनिक भारताला शरण आले. इतक्या मोठ्या प्रमाणावर सैनिक शरण येण्याची दुसऱ्या महायुद्धानंतरची ही पहिलीच घटना. या युद्धात भारताचे तीन हजार ९०० जवान धारातीर्थी पडले तर दहा हजार जवान जखमी झाले. भारतीय सैन्यानं रणांगणावर शौर्य तर गाजवलंच पण बांगलादेश मुक्ती वाहिनीला प्रशिक्षणही दिलं.

पंतप्रधान मोदी यांनी आज सकाळी राष्ट्रीय समर स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करुन या युद्धातल्या हुतात्म्यांना अभिवादन केलं. 

देशाचं सार्वभौमत्व आणि मानवी सन्मानाचं रक्षण करण्यासाठीच्या वचनबद्धतेची पूर्ती करणार्या आपल्या जवानांचं स्मरण करण्याचा हा दिवस असल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे.

विजय दिनानिमित्त भारतीय सेनेच्या शौर्य आणि पराक्रमाला नमन करत असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.

भारतीय सेनेनं आपल्या अदम्य साहस आणि पराक्रमानं मानवीय स्वातंत्र्याच्या सार्वभौमिक मुल्यांचं रक्षण करत वैश्विक मानचित्रावर एक ऐतिहासिक बदल घडवला. इतिहासात सुवर्ण अक्षरात अंकित ही शौर्यगाथा प्रत्येक भारतीयासाठी गौरवपूर्ण बाब असल्याचं सांगत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विजय दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

****

देशात अन्न प्रक्रिया उद्योगात गुंतवणुकीच्या खूप संधी असून, २०२४ पर्यंत अन्न प्रक्रिया उद्योगांमध्ये ३३ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक अपेक्षित असल्याचा विश्वास केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. अॅग्रोव्हिजनतर्फे अन्न प्रक्रियेवर आयोजित एका चर्चासत्रात ते काल बोलत होते. केंद्र सरकारनं मेगा फूड पार्क योजनेअंतर्गत ३७ फूड पार्क मंजूर केले असून, यापैकी २० पार्कचं काम सुरू झालं आहे. २०३० पर्यंत खाद्य वस्तूची मोठ्या प्रमाणात आवश्यकता भासणार असून, भारत जगातला पाचवा सर्वांत मोठा ग्राहक असणार आहे, असं गडकरी यांनी यावेळी सांगितलं. 

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 23.04.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 23 April 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्र...