Thursday, 17 December 2020

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 17.12.2020 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 17 December 2020

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १७ डिसेंबर २०२० दुपारी १.०० वा.

****

कोरोना विषाणूवरील स्वदेशी लस ‘कोवॅक्सिन’च्या पहिल्या टप्प्यातल्या चाचण्यांचे चांगले निष्कर्ष समोर आले आहेत. हैदराबादची भारत बायोटेक कंपनी ‘कोवॅक्सिन’ची निर्मिती करत आहे. ‘कोवॅक्सिन’च्यापहिल्या टप्प्यातल्या वैद्यकीय चाचणीमधून सकारात्मक परिणाम समोर आले असून, कोणत्याही वयोगटातल्या स्वयंसेवकांवर गंभीर किंवा प्रतिकूल परिणाम झाले नाही. या लसीला दोन ते आठ अंश सेल्सिअसमध्ये ठेवता येतं, हे प्रमाण राष्ट्रीय लसीकरण योजनेप्रमाणे असल्याचं भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेनं सांगितलं.

****

देशात काल दिवसभरात २४ हजार दहा नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर ३५५ जणांचा मृत्यू झाला. देशातली एकूण रुग्णसंख्या ९९ लाख ५६ हजार ५५८ झाली आहे. देशात आतापर्यंत या विषाणू संसर्गानं एक लाख ४४ हजार ४५१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल ३३ हजार २९१ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. आतापर्यंत ९४ लाख ८९ हजार ७४० रुग्ण बरे झाले असून, सध्या तीन लाख २२ हजार ३६६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. देशभरात आतापर्यंत १५ कोटी ७८ लाख पाच हजार २४० चाचण्या करण्यात आल्याचं भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं सांगितलं.

****

अभियांत्रिकी अभ्यासक्रमांसाठीची संयुक्त प्रवेश परीक्षा - जेईई आता वर्षातून चारवेळा घेतली जाणार आहे. फेब्रुवारी, मार्च, एप्रील आणि मे महिन्यात परीक्षा होईल. त्यामुळे विद्यार्थ्याना आपल्या सोयीच्या वेळी परीक्षा देणं तसंच पुन्हा परीक्षा देऊन गुण सुधारणं शक्य होईल, असं शिक्षणमंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांनी काल दिल्लीत सांगितलं. फेब्रुवारीतली परीक्षा २३ ते २६ या तारखांदरम्यान होणार आहे. आता ही परीक्षा नव्या शैक्षणिक धोरणानुसार होणार असून, प्रथमच मराठीसह १३ भारतीय भाषांमध्ये परीक्षा देता येणार आहे.

****

शेतकऱ्यांनी कृषिपंपांना ऑटोस्विचऐवजी कॅपॅसिटर बसवून सहकार्य करावं, असं आवाहन महावितरण कंपनीनं केलं आहे. महावितरणकडून कृषिपंपांना दिवसा आणि रात्री अशा चक्राकार पद्धतीनं वीजपुरवठा करण्यात येतो. वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर शेतात जाऊन कृषिपंप चालू करण्याचा त्रास वाचवण्यासाठी, अनेक ठिकाणी कृषिपंपांना ’ऑटोस्विच’ लावले आहेत. त्यामुळे वीज येताच कृषिपंप आपोआप चालू होतो. त्यामुळे रोहित्रांवरचा भार एकाचवेळी वाढल्यानं रोहित्र जळण्याचं किंवा नादुरुस्त होण्याचं प्रमाण वाढत आहे. ऐन हंगामात रोहित्र जळाल्यास त्याची झळ शेतकऱ्यांनाही सोसावी लागते, त्यामुळे कृषिपंपांना कॅपॅसिटर बसवावेत आणि ऑटोस्विचचा वापर करू नये, असं औरंगाबाद विभागीय कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्याच्या सोयगांव तालुक्यातल्या फर्दापूर इथं छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारण्याचा मानस असल्याचं, महसूल राज्यमंत्री उब्दुल सत्तार यांनी सांगितलं. मुंबईत काल या स्मारक उभारणीसंदर्भात चर्चा करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजांसरख्या वीर लढवय्याच्या कार्याची प्रेरणा युवा पिढीला मिळत रहावी, यासाठी हे स्मारक महत्वपूर्ण ठरणार असल्याचं ते म्हणाले. टप्प्या-टप्प्यानं तयार होणारं हे स्मारक दहा एकरच्या परिसरात उभारलं जाणार असून, पहिल्या टप्प्यात २१ कोटी रुपये एवढा निधी अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे स्थानिक आमदार आणि खासदार यांच्या निधीतला दहा टक्के निधी या कामासाठी राखून ठेवण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवणार असल्याचं सत्तार यांनी सांगितलं.

****

माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचं लातूर इथं स्मृति संग्रहालय उभारण्यात येणार असून, त्यासाठी लातूर पंचायत समितीच्या सभापतींचं निवासस्थान जिल्हा परिषदेनं सांस्कृतिक कार्य विभागाकडे हस्तांतरित करण्याच्या सूचना, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या. मुंबईत यासंदर्भातल्या बैठकीत ते काल बोलत होते. सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यावेळी उपस्थित होते. दक्षिण मराठवाड्याचं दर्शन घडवणारं प्रादेशिक शासकीय संग्रहालय नव्याने निर्माण करण्याचा सविस्तर आराखडा सांस्कृतिक कार्य विभागाच्या पुरातत्व संचालनालयामार्फत तयार करण्यात येईल, या आराखड्यात प्रामुख्याने विलासराव देशमुख यांची संपूर्ण राजकीय कारकीर्द दाखवण्याबरोबरच मराठवाड्याचा इतिहास, गौरवगाथा, माराठवड्यातले किल्ले, शिल्पे, पुरातन वास्तू, ऐतिहासिक ठेवा आदींचा समावेश असेल, असं सांस्कृतिक कार्यमंत्री देशमुख यांनी यावेळी सांगितलं.

****

उस्मानाबाद प्रादेशिक परिवहन कार्यालयातला एजंट महंमद उर्फ बाबा हैदर अली शेख याला काल एक हजार रुपये लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली. तक्रारदाराला वाहन चालवण्याचा परवाना मिळवून देण्यासाठी त्यानं साडे तीन हजार रुपये लाच मागितली होती.

****

भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान ॲडलेड इथं सुरु असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या आजच्या पहिल्या दिवशी शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या     षटकांत दोन बाद ६६ धावा झाल्या होत्या. चेतेश्वर पुजारा २६, तर विराट कोहली १६ धावांवर खेळत आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 21.04.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 21 April 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छ...